'ब्रा' न घालण्यातलं सुख
* मी स्त्रीवादी नाही, परंतु लेखिकेच्या स्त्रीवादाला माझा आक्षेप नाही. *
मूळ लेख - 'द न्यू यॉर्कर' (ऑनलाइन आवृत्ती ) ऑक्टोबर २०१७
भाषांतर प्रथम-प्रकाशन - 'मिळून साऱ्याजणी' मासिक (फेब्रुवारी २०२०), लेखिकेच्या संमतीने
'ब्रा' न घालण्यातलं सुख
हिलरी ब्रेनहाउस
मराठी भाषांतर: मुक्ता 'असरार' ( भाषांतर © मुक्ता असनीकर)
पेरुमधील सेक्रेड व्हॅलीत राहत असताना एके सकाळी लुईसानं (माझी मैत्रिण)
मला विचारलं: "तू ब्रा का घालतेस?"
भाड्याने घेतलेल्या घराच्या
स्वयंपाक-खोलीत आम्ही उभ्या होतो. चहाचं आधण उकळत होतं. टीशर्टच्या आत मी
स्पेशल अंडरवायर ब्रा घातली होती - स्ट्रॅप्स घट्ट अॅडजस्ट केलेले, दोन्ही
डीडीडी कप्स पूर्ण ओथंबलेले. तिच्या अंगावर करड्या रंगाचा ढगळ स्वेटशर्ट
होता. आत काहीच नव्हतं.
"- घालावी लागते म्हणून." उत्तर देताना किंचित हसू फुटलं मला. प्रश्नाचा सूर असा होता की जणू ही ऐच्छिक बाब असावी. "अगं, ब्रेस्ट्स खूप मोठ्ठे आहेत माझे."
"माझेही," ती म्हणाली. मग तिनं आपला शर्ट वर उचलला. तिचेही स्तन चांगलेच मोठ्ठे होते, दोन पांढरट

बोयां१सारखे तरंगत होते. खरंच की, माझं लक्ष गेलं नव्हतं कधी.
१९९७ सालापासून, म्हणजे वयाच्या बाराव्या वर्षापासून मी ब्रा वापरू लागले - ट्रेनिंग ब्रा होती ती, नायलॉनचा रुंद गुलाबी पट्टा - नुकतीच आकारत असलेली माझी स्तनाग्रं कपड्यांशी घसटून दुखावू नयेत म्हणून, किंवा न जाणो, स्कूलबसमधे माझ्याशेजारी बसणाऱ्या मुलीच्या भावना दुखावू नयेत म्हणूनही असेल! कपड्यांमधून दिसणाऱ्या माझ्या स्तनाग्रांच्या अस्पष्ट रेषा पाहून मी ब्रा घातलीय की नाही याबद्दल ती मुलगी मोठमोठ्याने तर्कवितर्क करायची, नि लहानपणी गादी ओली केल्यावरही वाटली असेल इतकी लाज आणायची मला! सतरा महिन्यांपूर्वी, दक्षिण अमेरिकेच्या सफरीवर असताना मी ब्रा वापरणं थांबवलं. सुरुवातीला मनात धाकधूक असायची त्यामुळे कधीकधी बाहेर पडताना मी कपड्यांखाली काहीतरी पातळसर घालायचे. आता घालत नाही - कारण मी ब्रा न घालता वावरले आणि मला ते आवडलं. राजकीय निर्णय नव्हता तो. आपण आपल्या शरीराशी कसं वागावं हे इतरांना ठरवू न देता बाई स्वतःबद्दल जे निर्णय घेते ते सारेच एकप्रकारे राजकीय असतात, हा मुद्दा निराळा.

इंटरनेट मला सांगतं की गेल्या काही वर्षांपासून अनेक मुली-महिला 'ब्रा'ला
अलविदा म्हणताहेत व त्याबद्दल जाहीररित्या 'ब्र काढताहेत'. यूट्यूबवर
'व्हाय आय डोन्ट वेअर अ ब्रा ' वा तत्सम शीर्षकाच्या व्हिडीओजची लांबलचक यादीच येते समोर. याप्रकारच्या व्हिडिओजमधून ब्रा परिधान न करणाऱ्या एकविसाव्या
शतकातील तरुणी आपल्या निर्णयाची कारणमीमांसा करतात. पैकी बऱ्याच
व्हिडीओजमधे २०१३ साली प्रकाशित झालेल्या बजाँसॉ, फ्रान्स येथील संशोधनाचा
उल्लेख करण्यात येतो. 'ब्राझिअर' ऊर्फ 'ब्रा' ह्या अंतर्वस्त्राचा वापर
थांबवल्यास तरुण स्त्रियांच्या शरीरात कॉलेजन निर्मिती वाढते, त्याचबरोबर
स्तनांतील उतींची ताकद वाढते (अर्थात स्तनांचा उभार वाढतो) असं या संशोधनात
आढळून आलंय. मी नुकतेच 'केंडल जेनर' आणि 'रिहाना'वर ढीगभर लेख वाचले - त्यांच्या गेल्या उन्हाळ्यात ब्रा न घालता हिंडण्या-फिरण्यावर बातम्यांमधे पुष्कळ चर्चा
झाली होती. अशा घटनांमुळे 'आय वेन्ट ब्रा-लेस फॉर अ वीक अँड धिस इज व्हॉट
हॅपन्ड-!' छापाच्या उथळ लिखाणाला ऊत येतोय. (मी सांगू? - 'नथिंग. नथिंग
हॅपन्ड.' )
माझी भरगच्च, लोंबकळणारी छाती कुणालाही फॅशनेबल वाटणार नाही. तरुणपणी मी माझ्या लहान छातीवाल्या मैत्रिणींची "..किती लकी आहेस, तुला ब्रा घालावी लागत नाही" असली विचित्र तारीफ करायचे. माझ्याकडे पाहून तसं कुणीही म्हणणार नाही. माझ्या छातीचा विचार करणारे लोक - हो, खूप लोक असतात - 'ही बाई एकतर हिप्पी अथवा आक्रमक स्त्रीवादी अथवा दोन्ही असावी; हिने नक्कीच ब्रा जाळून२ टाकल्या असणार, जाताजाता सहज ड्रॉवरमधे ठेवून दिल्या नसणार' इ. निष्कर्ष काढून मोकळे होतात. ब्रा न घालण्याला त्यांचा आक्षेप नसतो. 'हा निर्णय, हा मार्ग आपल्याला, आपल्या परिचितांना झेपणारा नाही; तिरसट, स्वैराचारी बायकांनाच असलं वागणं शोभतं' वगैरे स्वतःची ठाम समजूत करून घेतल्याने खरंतर त्यांना हायसं वाटतं. जाहीररित्या नाक मुरडणारे स्त्री-पुरुषसुद्धा भेटतात. आणि 'पोटच्या पोरीचा निर्लज्जपणा पाहण्याचे नरकप्राय दिवस आले रे देवा!' म्हणून दुःख करणाऱ्या माझ्या आईसारख्या माणसांचा विशेष वर्गदेखील असतोच.

अमेरिकेत पहिल्या महायुद्धादरम्यान 'ब्रा' झपाट्याने लोकप्रिय झाली कारण कॉर्सेट३
बनवण्याकरता वापरल्या जाणाऱ्या धातूंचा पुरवठा युद्धकाळात
दारुगोळा-उत्पादनाकडे वळवण्यात आला होता. अत्यल्प वा शून्य गरज असताना
ज्यांची गरज भासवण्यात येते अशा आधुनिक जीवनातील असंख्य उत्पादनांपैकी हे
एक उत्पादन. बायका जे परिधान करतात व ते ज्यापद्धतीने परिधान करतात त्यावर
झडणाऱ्या चर्चा ह्या मुख्यतः उपयुक्तता आणि आरामदायकतेच्या मुद्द्यांभोवती
फिरतात - 'ब्राझिअर'संबंधीच्या चर्चादेखील याच मुद्द्यांभोवती केंद्रित
असतात, पण ते केव्हापर्यंत? - 'हा कपडा माझ्याकरता उपयुक्त नाही व
आरामदायीसुद्धा नाही' असं एखादीनं जाहीर करेपर्यंतच. तदनंतर मात्र चर्चेचा
ओघ शिष्टाचाराकडे वळतो. ब्रा उपयुक्त नसली तरी किमान प्रसंगोचित नक्कीच आहे
आणि ह्यात (खासकरून तुम्ही 'विशाल छातीच्या' असाल तर) निर्णयस्वातंत्र्य
वगैरेचा प्रश्नच उद्भवत नाही, असं सामान्यपणे मानलं जातं. हीच विचारपद्धती
असंही ठरवून टाकते की स्वतःच्या शरीराबद्दल काही निर्णय घेत असताना
(प्रत्यक्षात निर्णय झाला नसला तरी) तुम्ही एकतर विवादास्पद वर्तन करता किंवा त्याहूनही भयंकर काहीतरी करता.
ब्रा न घालण्याला वेढून असलेला हा काळिमा मला नेहेमीच विचारात पाडतो. नेमकी
काय अडचण असावी? ब्रा न घातलेली भारदस्त छातीची बाई स्तन लोंबत आहेत,
स्तनाग्रं उठून दिसताहेत अशा अवस्थेत अतिमादक, 'ओव्हरसेक्सी' दिसते का? की ती पुरेशी
सेक्सी दिसत नाही? पुरेशा आधाराविना तिचे स्तन प्रचंड अ-गोल, निमुळते
दिसतात; दोन स्तनांमधील फरक स्पष्टपणे जाणवतात, हे खटकतं का?
मला वाटतं प्रॉब्लेम हा
असतो की ती 'योग्यरित्या' सेक्सी दिसत नाही - ती 'प्रमाणबंद' नसते.
गुरुत्वाकर्षणाविरुद्ध तिची धडपड चाललेली नसते. अशी बाई भलतीच खोचक ग्राहक
असते. सुयोग्यरित्या मादक दिसण्याकरता मनात सुयोग्यरित्या मादक दिसण्याची इर्ष्या असावी लागते, आणि त्यानुसार खरेदीसुद्धा करावी लागते!
कालपरवाच मी 'साइनफिल्ड ' या जुन्या टी.व्ही. मालिकेचा तो भाग पुन्हा पाहिला - एलेनची आपल्या हायस्कूलमधल्या मैत्रिणीशी, सू एलेन मिश्की हिच्याशी रस्त्यात अचानक गाठ पडते. 'ही पहा बिगर-ब्रावाली बया! आम्ही येडेखुळे वाटलो की काय हिला? बघा कशी मोकाट सुटलीय,' एलेन स्वतःशीच म्हणते. त्याच भागात पुढे एलेन सू एलेनला शुभ्र, नक्षीदार ब्रा भेट म्हणून देते. सू एलेन उघड्या कोटाच्या आत नुसतीच ब्रा घालते व अशा पोशाखात तिला रस्त्यावरून चालताना पाहून क्रेमर या पात्राचा गाडीवरला ताबा सुटतो, गाडी खांबावर आदळते. नुकसानभरपाईच्या अपेक्षेने क्रेमर सू-एलेनविरुद्ध खटला दाखल करतो. थोडक्यात काय, ब्रा घातली अथवा घातली नाही तरी आम्हा बायांना विघातक ठरवलं जाण्याचा धोका आहेच.
आपण माणसं वस्तूंना प्रतीकात्मक शक्ती
बहाल करतो. आपण जे परिधान करतो अथवा करत नाही त्यातून दमन सूचित होणार आहे,
मुक्तत्व सूचित होणार आहे की खरंतर काहीच सूचित होणार नाही, हे ठरवणारे
आपणच असतो. हे 'खरंतर काहीच सूचित न होणं' - ज्यांच्यामागे काही ठोस कारण
नसतं असे निर्णय, म्हणजे वास्तविक आपल्या आवडीनिवडींवर, मनाच्या लहरीवर
आधारलेले निर्णय, जे कित्येकदा आपल्याला सुखावहच वाटतात - हा असतो रोजच्या,
सहजशांत निवडीतला स्त्रीवाद.
सिल्कचे कॅमिसोल्स, जाड विणीचे स्वेटर्स, आजीकडून मिळालेले नक्षीदार
ब्लाउज-टॉप्स अशा निरनिराळ्या कपड्यांचा उघड्या त्वचेला होणारा स्पर्श मला
आवडतो. धावतपळत पायऱ्या उतरताना माझे स्तन बरगड्यांवर थापटले जाऊन जो आवाज
निर्माण होतो - कार्यक्रम आवडला नसला तरी केवळ शिष्टतेखातर वाजवलेल्या
टाळ्यांसारखा - तो आवडतो मला. डोलकाठ्यांवर शिडं उभारावीत तसे खेचून
बांधलेले नसताना, दामटून बसवलेले नसताना माझे स्तन किती निगर्वी होऊ
शकतात! मला त्यांचा खराखुरा, मोकळा आकार आवडतो, अंड्यातलं पांढरं छान फेटलं
की वर येणाऱ्या मऊसूत टोकासारखी त्यांची ओघळती टोकं आवडतात. संपूर्ण
शरीराबरोबरच स्तनांचाही भार वाहणं मला आवडतं. आता क्वचित कधी ब्रा घातलीच
तर धडधाकट हातात प्लॅस्टर घालून तो गळ्यात अडकवल्यावर जसं वाटेल तसं वाटतं.
अप्पर वेस्ट साईड मधल्या मोठ्या छातीवाल्या बायकांसाठीच्या खास दुकानात
जाणं, वाडग्यांइतके खोलगट कप्स असलेली साधीशी ब्रा घेणं आणि खिसा पार हलका
करून घेऊन बाहेर पडणं या जुन्या सवयीची मला अज्जिबात आठवण येत नाही. मी
उत्साहाने मान डोलावते तेव्हा स्तनसुद्धा होकारार्थ डुलतात. जेव्हा
गर्दीतल्या कुणालातरी उद्देशून हात हालवते तेव्हा तेसुद्धा हालतात. स्तन
चुळबुळतात, उसळतात, त्यांभोवती साचणारा घाम खाली बेंबीपर्यंत ओघळतो.
जगात वावरताना, व्यक्त होताना कधीकधी माझे हावभाव न जाणवण्याइतके सूक्ष्म असताीलही, मात्र माझ्या शरीराचं एक अंग नेहेमीच नाचत असतं.
तळटीपा:
१. बोया = buoy, बोटी-जहाजांच्या वा पोहणाऱ्यांच्या दिशादर्शनार्थ पाण्यात तरंगत ठेवला जाणारा खुणेचा गोळा
२. Bra burning (ब्रा बर्निंग) = ब्रा जाळण्याच्या कृतीचा संबंध आक्रमक स्त्रीवादाशी लावला जातो. १९६०च्या दशकात स्त्रीवादी चळवळ बाईच्या 'गृहिणी' अथवा 'प्रदर्शनीय बाहुली' या साचेबद्ध प्रतिमांना प्रखर विरोध करू लागली. १९६८ साली अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यात 'मिस अमेरिका' सौंदर्यस्पर्धेविरुद्ध निदर्शने झाली. बाईने कसं रहावं, आपल्या शरीराचं प्रदर्शन कसं करावं यावर अधिकार गाजवणाऱ्या ब्रा, सौंदर्यप्रसाधने, कृत्रिम आयलॅशेस, उंच टाचांची पादत्राणे, 'प्लेबॉय'सारखी मासिके इ. 'फ्रीडम ट्रॅशकॅन'मधे गोळा करून निदर्शनकर्त्या स्त्रियांनी ठिकठिकाणी त्या वस्तूंना आगी लावल्या.
३. कॉर्सेट = corset, अंदाजे सोळाव्या शतकापासून पाश्चिमात्य जगात प्रचलित झालेलं स्त्रियांचं एक घट्ट अंतर्वस्त्र

![]() |
रेखाचित्र: मुक्ता 'असरार' |
Comments
Post a Comment