"अस्सं"
हाकुइन एकाकु - सतराव्या शतकातील झेन गुरु. जपानी झेन बौद्ध परंपरेतील अतिशय प्रभावशाली व्यक्तिंमध्ये त्यांची गणना होते.
हाकुइनच्या घराजवळ वाण्याचं दुकान होतं. वाण्याची मुलगी अतिशय रूपवान. एके दिवशी तिच्या पालकांना आपली ही अविवाहित कन्यका गरोदर असल्याचं समजलं. घरात कोण हाहाकार माजला! 'कुणी केलं हे? कुणाबरोबर शेण खाल्लंस? नाव सांग त्या हरामखोराचं!' पण पोरगी काही केल्या तोंड उघडेना. अखेर घरच्यांचा छळ असह्य होऊन तिनं हाकुइनचं नाव घेतलं.
संतापदग्ध वाणी व त्याची बायको हाकुइनच्या घरी गेले. त्याला घडल्या प्रकाराचा जाब विचारला.
हाकुइननं त्यांची आरडाओरड शांतपणे पाहिली, ऐकून घेतली. "अस्सं?" इतकाच उद्गार बाहेर पडला त्याच्या तोंडून.
'काय निर्लज्ज, नीच माणूस आहे! हा कसला डोंबलाचा गुरु!'
मूल
जन्माला आल्यानंतर वाण्याने ते हाकुइनकडे सोडून दिलं. दरम्यानच्या काळात
या प्रकरणामुळे हाकुइनची पुष्कळ छी-थू झाली होती - जवळपास सर्व शिष्य सोडून
गेलेले, धर्मसंस्थेनं आर्थिक सहाय्य थांबवलेलं. मात्र हाकुइनला या
गोष्टींचं शल्य नव्हतं. तो बाळाचा प्रेमाने सांभाळ करू लागला. भिक्षा मागून
बाळाच्या संगोपनाकरता आवश्यक त्या चीजवस्तूंची व्यवस्था तो करत असे.
वर्ष
सरलं, वाण्याच्या मुलीला राहवेना. मोठ्या धाडसानं तिनं आईबापाला सत्य
सांगितलं: मासळी विकणाऱ्या एका तरुणाशी तिचं प्रेम होतं, व हे मूल त्या
संबंधाचं अपत्य होतं. प्रियकराच्या जीवाला धोका नको म्हणून तिनं पटकन्
हाकुइनचं नाव पुढं केलं होतं.
अरे देवा! अत्यंत खजील होऊन वाणी पती-पत्नी हाकुइनपाशी गेले. त्यांनी माफी मागितली, व बाळाचा ताबादेखील.
"अस्सं!" हाकुइन उत्तरला. आनंदानं त्याने ते बाळ त्यांना सुपुर्द केलं.
Comments
Post a Comment