'युद्धस्य कथा अपि न रम्या' (युद्धच काय, युद्धाच्या कथादेखील रम्य नसतात)

 'अनुभव ' मासिकात (ऑगस्ट २०१७) मी पहिल्या महायुद्धावर लेख  लिहिला होता. निराळ्याच शीर्षकाखाली तो छापण्यात आला. काही महत्त्वाचे फेरफार करून तो लेख पुनःप्रकाशित करत आहे:
 

'War is the spectacular and bloody projection of our everyday life, is it not?'  - J. Krishnamurti

'...The act of defense is already an attack. The calamity of war comes from the strengthning and magnifying of empty distinctions of self and other, strong and weak, attack and defense.' - Masanobu Fukuoka

काही काळापासून दोन्ही महायुद्धांबद्दल सतत काही ना काही वाचते, पाहते. का बरं? - ती विषण्ण वर्णनं वाचून, आत्मक्लेश करून घेऊन 'युद्ध' नामक कायदेसंमत, लोकसंमत गुन्ह्याला बळी पडलेल्या / पडणाऱ्यांसाठी अखिल मानवजातीच्या वतीने आपण प्रायश्चित्त करत आहोत' अशी उदात्त भावना मी उगाच कुरवाळत असेन का? की एकीकडे हिंसेची घृणा करताना मानवातील अंगभूत हिंस्रपणाबद्दलचं, त्याच्या संहारसामर्थ्याबद्दलचं कुतूहल शमवणं मला आवडत असावं? माझ्यातल्या जराश्या चिथावणीने डिवचल्या जाण्यास उत्सुक पशूचं काय करायचं? .....युद्ध का होतात? पुन्हापुन्हा नवी शीर्षकं देऊन, नवी मिमांसा करून, करकरीत आवरणं चढवून त्याच अश्लील अध्यायाची पुनरावृत्ती आपण का होऊ देतो? ...उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत.

महायुद्धाच्या कारणांचा सविस्तर उहापोह इथे देणे न लगे.

  १९१४ च्या अखेरीस दोस्त राष्ट्रे (allied powers) व केंद्रीय सत्तांच्या (central powers) फौजांनी युद्धाच्या पश्चिम आघाडीवर (western front) शेकडो मैल लांब परस्पराभिमुख खंदक (trench) खणण्यास सुरूवात केली. खंदकांत राहून शत्रूची ठाणी काबीज करत पीछेहाट घडवण्याचा इरादा त्यामागे होता. परंतु या तंत्रामुळे पुढची जवळपास अडीच-तीन वर्षं युद्ध गतिहीन झालं, कुणाचीच निर्णायक सरशी होईना. ब्रिटिश, अमेरिकन, जर्मन, ऑस्ट्रियन - सर्व सत्ता, त्यांची लष्करी नेतृत्वं आडमुठेपणाने (काहीवेळा तर फुटबॉल-ग्राउंडइतक्या भूमीकरता!-) सैनिकांना  झुंजवत, कवडीमोल असल्याप्रमाणे लाखो प्राण उधळत राहिली.

खंदक म्हणजे जमिनीत खोदलेली साधारण २ x ३ मीटरची बिळंच. रेतीने भरलेली पोती, लाकडाचे वासे इ. सामग्री वापरून खंदक बऱ्यापैकी टिकाऊ होतील यात संदेहाला फारशी जागा नव्हती. पण घडे भलतंच. पश्चिम आघाडीचा भाग समुद्रसपाटीजवळ असल्याने जमिनीत थोडं खोल शिरताच पाणी लागत असे. पाय जखडून ठेवणाऱ्या चिकट चिखलाचं साम्राज्य. हेल्मेट, कपडे, बूट, शरीराचे उघडे भाग सतत मातीच्या थराने जडावलेले. आंघोळ प्रकरण दुर्लभ. अल्पावधीत जणू बासरीवाल्याने साद घातल्याप्रमाणे हजारो उंदीर या घाणीत येऊन दाखल झाले. सैनिकांच्या तुटपुंज्या, नित्कृष्ट रसदीतून आपला वाटा हिसकावून घेऊ लागले. अन्य परपोषी जीवदेखील जातीने हजर झाले. खंदकात फक्त अर्धा दिवस घालवला तरी सैनिकाच्या गणवेषात असंख्य उवा बुजबुजत. कराकरा अंग खाजवता-खाजवता वेड लागण्याची पाळी येई. रक्त-घाम-मातीने बरबटलेल्या शरीराचं मुटकुळं करून सैनिक तसल्या चिंचोळ्या बिळांत बसून असत - पहारा देत, आक्रमण करण्याच्या प्रतीक्षेत. तोफा-बंदुकांच्या कानठळ्या बसवणाऱ्या गडगडाटाखाली विश्रांती घेण्याचा क्षीण प्रयत्न करत.




 पहिल्या महायुद्धासंबंधित बहुतांश पत्रं, पुस्तकं, रोजनिश्यांमधे उंदरांचे, उवांचे, चिखलाचे हमखास यणारे उल्लेख मला विलक्षण वाटतात. म्हणजे युद्धाचं तांडव इतकं हाहाकारी होतं की मानवी अस्तित्वच नव्हे, तर अन्य नैसर्गिक घटकदेखील विचकट, विकृत अवतार धारण करू लागले.

आधुनिक लांब पल्ल्याच्या मशीनगन्स, रायफल्स, संगिनी (bayonet), तोफा (trench mortars), रणगाडे, विषारी वायूच्या नळकांड्यांची ताकद जुन्या अस्त्रांहून अत्यधिक भीषण होती. त्यांचं फलित 'मॅन-टू-मॅन' लढाईच्या जुन्या तंत्राहून कसं कैकपटींनी हिडीस असू शकतं यावर पूर्वविचार करण्याची गरज एकाही धोरणकर्त्याला वाटली नव्हती.
प्रत्यक्ष युद्धरेषेवर, तसंच दोन्ही पक्षांच्या 'नो मॅन्स लँड'मधे रोज प्रेतांचा खच पडत असे. खंदकांपुढे शत्रूला अटकाव करण्यासाठी रोवलेल्या तार-कुंपणांवर गणवेषांच्या, मानवी अवयवांच्या चिथड्या लटकत. जखमींना शोधून आणायला, प्रेतं उचलायला, दफनविधी करायला कधीच पुरेशी माणसं नसत. कित्येकदा चढाई करून गेलेल्या शेकडो सैनिकांपैकी मूठभर अक्षत परत येत.
स्टुअर्ट कोलेट सांगतो - 'इतक्या मृतंदेहांची विल्हेवाट लावणं अशक्य होतं. उन्हामुळे प्रेतं फुगून येत आणि विषवायूचा हल्ला झाल्यास निळ्याशार रंगाची हऊन जात.  वायूचा प्रभाव नाहीसा झाल्यावर ती बैठ्या, उभ्या, आडव्या, वाकलेल्या, असतील त्या स्थितीत गोठून जात. कावळे त्यांचे डोळे काढून घेत आणि उंदीर त्यांचं मांस फस्त करीत.'
...एकदा अशी वेळ आली की कोलेटच्या बटालियनला हजारो प्रेतांची व्यवस्था लावण्याविना गत्यंतर नव्हतं. माश्यांची, अळ्यांची जणू जाड चादर अंथरलेली होती त्या प्रेतांवर. माश्यांचा काळा पडदा दूर झाल्यावर जणू रंगपालट होऊन ती हिरवी दिसू लागली. एकही अवयव अखंड उचलता येत नव्हता. उलट्यांमागून उलट्या करत त्यांनी तो कुजका राडा हाताळला. हे सारं अनुभवताना कोलेटचं वय होतं अवघं एकोणीस वर्षं! का त्या कोवळ्या जीवाच्या वाट्याला हे यावं?!

इथे मला रिमार्कच्या 'ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट'मधील नायक पाउल बेउमर आठवतो: '.. लष्करात भरती होण्यास नकार देणाऱ्यावर थुंकण्यासाठी 'भेकड ' हा शब्द प्रत्येकाच्या जीभेवर टपून असे. आमच्यापुढे नक्की काय वाढून ठेवलंय ह्याची कोणालाही तिळमात्र कल्पना नव्हती. ..जाणत्या पिढीच्या शब्दांवर विश्वास ठेवून आम्ही इथे आलो खरे, परंतु पहिला मृत्यू पाहताच त्या साऱ्याचा चक्काचूर झाला. .. मी वीस वर्षांचा उमदा तरूण आहे आणि मुडदे, मृत्यूचा आतंक, हताशा, दुःखाचं कृष्णविवर याखेरीज आयुष्याची चव मला मिळालेली नाही.'

माणसाच्या जगण्या-मरण्यावरील किमान प्रतिष्ठा कशी सोलवटून काढली जाते, विजयपताका म्हणून तिची लक्तरं अज्ञानी, उन्मादांध जनतेपुढे कशी फडकावली जातात याची महागाथा म्हणजे पहिलं महायुद्ध (वस्तुतः कोणतंही युद्ध), सैनिकांचं खंदकांतील वास्तव्य. 

 
Wilhelm Heinrich Otto Dix, ''The trench''
  
मृतांच्या मांसावर पोट भरून उंदीर मांजराइतके, सशाइतके मोठे होत. एक जोडी वर्षाला किमान नऊशे पिले पैदा करे. मृतांवर तर त्यांची नजर असेच, शिवाय स्वतःचं रक्षण करू न शकणाऱ्या जखमींवरही ते हल्ला चढवत. रोगांचा प्रसार करत. खंदकात मुडपून बसलेल्या कुणा सैनिकाच्या कपड्यांत अन्नाचं पुडकं असल्यास त्याच्या अंगावर नाच-नाचून ते अन्न मिळवू पाहत. पावसाळ्यात खंदकात साचलेल्या मांडी-छातीभर पाण्यातून पोहून जिवंत आणि मृत सैनिकांचा माग काढत. या महाभागांना आटोक्यात आणण्यासाठी सैनिकांनी आणवलेल्या मांजरींनाही ते सहज लोळवू लागले! उंदीरच कशाला, युद्धक्षेत्रातील सुनसान, उध्वस्त खेड्यावस्त्यांतून भटकणारे कुत्रे वगैरे प्राणीसुद्धा फेकून देण्यात आलेल्या / मृत जिन्नसांवर गुजराण केल्याने अतिहिंस्त्र झाले होते. जिथेतिथे, ज्यात-त्यात युद्धक्रौर्य पुरतं भिनलं होतं. ..उंदरासारखा प्राणी मृतांची चटक लागल्याने जिवंत माणसांचा तिरस्कार करू लागला होता!

सामान्यतः उंदरांना माणसांची भीति वाटते, मांजरांचा जिवानिशी धाक वाटतो - इथे खंदकांत 'सामान्य' असं उरलंच काय होतं! मृतदेह 'मृतदेहा'सारखे राहिले नव्हते, जिवंत माणसांची मनं तर कधीच ठेचली गेली होती; जखमांच्या तऱ्हा इतक्या, की मानवी देहातून निराळाच प्राणी कोरून निघालाय असा भास व्हावा!

 सामान्यत्वातील स्थैर्य, श्रम-विश्रमाचं चक्र, मूलभूत गरजांच्या पूर्तेतील समाधान हे माणसाला जगण्याचं, असामान्यत्वाकडे झेपावण्याचंसुद्धा बळ देत असतं.
युद्धघोषणा होताच दोन्ही पक्षांतील सदस्य राष्ट्रांत धडधाकट तरूणांची जी उदंड लष्करभरती झाली त्याला संबंधित सत्तांचं अत्यंत कुटिल प्रचारतंत्र (propaganda) कारणीभूत होतं. '१९१४ च्या ख्रिसमसपर्यंत युद्ध आटोपेल' असं रेटून सांगितलं जात असल्याने 'एका अनोख्या अनुभवाचा थरार चाखण्याकरता' युवावर्गाला प्रोत्साहित करण्यात आलं. 'शत्रू'ला स्वहस्ते नामोहरम करण्याची खुमखुमी होती, सक्तीचा (conscription) बडगा तर होताच. आणखीही कारणं होती.  कोणाला युनिव्हर्सिटीतील प्रवेश लांबणीवर टाकण्याकरता ठोस सबब हवी होती. तर लेन थॉम्प्सनसारख्या शेतावर राबणाऱ्या कुण्या गरीब तरूणाला मजूरीतील काबाडकष्ट, शोषणापासून अंमळ मोकळीक हवी होती. तीनवेळा जेवण, लष्करी भत्त्याचं सुख खुणावत होतं - प्रशिक्षणकाळ संपला तसा थॉम्प्सनचा सुखावधीदेखील संपला. आपला कामधंदा तात्पुरता गुंडाळून एखाद्या पिकनिकला निघावं तशी माणसं युद्धावर निघाली होती. 'काही महिन्यांत मायदेशी परतून आपण नेहेमीच्या उद्योगाला लागलेले असू' अशी खात्रीच होती साऱ्यांना. पहिल्या महायुद्धाने अद्भुताचं (the extraordinary) आमिष दाखवून माणसांच्या आयुष्यातला हक्काचा सामान्यपणा (ordinariness) हिरावून घेतला. 

 ..एकीकडे 'देशासाठी लढणाऱ्या सुपुत्रांना सकस अन्न मिळावं' म्हणून लोकांना अर्धपोटी रहायला सांगितलं जात होतं, रेशनच्या रांगेत उभं केलं जात होतं आणि तिकडे भेसळयुक्त, हिणकस अन्न खाऊन सैनिकांना जुलाब होत होते. मधल्या मधे गणवेष, रसद पुरवण्याऱ्या कंत्राटदारांचे, शस्त्र-उत्पादकांचे खिसे मात्र चांगले गरम होत होते. सिदोनि सोय्य आपल्या आजोबांच्या अनुभवांना उजाळा देते - '..फ्रेंच सरकार त्यांच्या सैनिकांना जणू विसरून गेलं होतं. रसद-पुरवठा बंद होता. ..भुकेने व्याकूळ होऊन काहीजण आपले लेदरचे बूट खाण्याचा प्रयत्न करीत. '

खंदकांत राहून प्रत्यक्ष लढणाऱ्या सैनिकांना हालअपेष्टा सोसाव्या लागत असताना रणांगणापासून काही मैल दूर असलेल्या 'हेडक्वार्टर्स' मधे वरिष्ठ अधिकारी बऱ्याचदा तुलनेने आरामशीरपणे राहताना आढळत. अंग टाकायला पुरेशी जागा, खाण्यापिण्याची नियमित व्यवस्था, दिमतीला नोकर, करमणुकीसाठी सांगीतिक उपकरणं असा जामानिमा असे. सामान्य आयुष्यात  ही सगळी वाणी, शेतकरी, पोस्टमन, क्लार्क, विद्यार्थी वगैरे नगण्य, निरुपद्रवी माणसं होती. पण युद्धाने पछाडलेल्या साऱ्याच आयुष्यांना जणू हलकट नख्या उगवून आल्या होत्या. 'प्रत्येक माणूस आपल्यापेक्षा कनिष्ठ हुद्द्याच्या माणसांवर दमदाटी करत, जणू ती बिनडोक जनावरं असल्याप्रमाणे त्यांना ढोसत होता. अनन्वित दैन्य, कष्ट, क्षुल्लक आगळिकींसाठी ठोठावल्या जाणाऱ्या अन्याय्य शिक्षा.. कोणत्याही पक्षातील माणसांच्या झुंडी खरंच स्वेच्छेने लढत होत्या का? ते जर्मन्स  - त्यांनाही 'हौतात्म्य पत्करण्याची' सक्तीच होती ना! गुलामांप्रमणे फरफटवणाऱ्या ताबेदारांविरुद्ध त्यांनी बंड पुकारलंच तर त्यांना ठार करण्याकरता त्यांच्याही पाठींवर मशीनगन्स रोखलेल्या होत्याच ना!'  - फिलिप गिब्स, ब्रिटिश युद्धपत्रकार (खंदकांतील परिस्थितीचं वास्तवदर्शी वार्तांकन करण्याचं दुःसाहस केल्यावर गिब्स यांना तडकाफडकी 'सेवामुक्त' करण्यात आलं.)

आपली (जनतेची) युद्धविषयक कल्पना अगदी 'रोम्यांटिक' असते, फिल्मी दृष्यांची सुघड झालर असते तिला, अलंकारिक शब्दांची तोरणं बांधलेली असतात. सत्य काय असतं? - बाँबच्या माऱ्याने नुसताच आगमातीचा लोळ उठत नाही, माणसांच्या, झाडांच्या चिंधड्या कागदाच्या कपट्यांसारख्या चहूदिशांना भिरकावल्या जातात. संगिनीच्या घावाने नुसताच रक्ताचा ओघळ वाहत नाही, किंवा त्यावर दोन मिनिटांत मलमपट्टी तर अजिबातच होत नाही. बाहेर आलेली आतडी सावरत, सरपटत एखाद्या ताज्या 'हुतात्म्याच्या' आडोशाला लपून रहावं लागतं. तोफगोळ्याची ह्रदयभेदी 'सूं-भडाम्' पहिल्यांदा कानी पडताच काही कळायच्या आत चड्डी ओली होते आणि घासून लख्ख केलेले 'धैर्य', 'शौर्य' असले शब्द रक्त-धुराच्या दर्पाने भरलेल्या अंधारात कायमचे विरून जातात. ..होय, सैनिकाला भीति वाटते. त्याला भीति वाटते तोफांचा राक्षसी गडगडाट कधी थांबलाच तर निर्माण होणाऱ्या उद्विग्न, एकाकी शांततेची; युद्धात जिवंत राहिलोच तर भविष्याने त्याच्यासाठी राखून ठेवलेल्या स्मशानवत आयुष्याची. चिखलात, पावसात राहून पाय सडले आणि पूयुक्त, निकामी पायाच्या बँडेजवर 'ती' विशिष्ट चिठ्ठी डकवण्यात आली की रडू कोसळतं त्याला. 




खंदकात परतताच स्वतःच्याही नकळत पिसाटल्यासारखं अंग खाजवत टचटचा उवा माराव्या लागणं, मांसामुळे चिकट झालेल्या चिखलात पाय रुतला म्हणून समोरून येणाऱ्या गोळीपासून बचाव न करता येणं, विषवायू-हल्ल्याच्या यातना असह्य होऊन कित्येक दिवस मृत्यूची भीक मागत, घशातल्या घशात अस्फुट विव्हळत विझून जाणं.. ह्यात कसला 'सन्मान' होता?
'नवा अधिकारी आला तेव्हा त्याचं स्वागत करण्यासाठी त्याला खंदकातल्या मोक्याच्या जागी बऱ्यापैकी अंथरूण देण्यात आलं. ..टॉर्च पेटवताच असं दिसलं, की दोन गलेलठ्ठ उंदीर त्या अंथरुणावर एका तुटक्या मानवी हाताशी खेचाखेची करत होते ' - हे दृष्य पाहून कुणाला 'स्फुरण' चढेल?

ज्यो मरे याच्या एका गार्डस्मन मित्राला जुलाब जडल्यापासून त्याची अवस्था दयनीय झाली. 'चिखलाने माखलेली पँट लोळवत, रांगत-खुरडत तो वारंवार संडासला जात असे. एकदा त्याला आधार देत कसंबसं शौच-खंदकाजवळ नेलं गेलं, मात्र तो अशक्त जीव खाली बसल्या-बसल्या मैल्याने भरलेल्या खड्डयात कलंडला. कोणाच्याही अंगात त्याला बाहेर काढण्याइतके त्राणच नव्हते त्यामुळे त्याला मैल्यात बुडून मरू द्यावं लागलं ' - असा केविलवाणा अंत म्हणजेच का 'वीरमरण'?

पहिल्या महायुद्धात सैनिकांचं हे 'असैनिकी', निखळ मानवी दैन्य, व्यथा आपल्यापासून झाकून ठेवल्या जात होत्या. घरात बसून बातम्या चघळणाऱ्या हरेक देशातील जनतेला 'आपली सेना अतुलनीय पराक्रम गाजवत जोमाने लढत असल्याचं' सांगितलं जात होतं. लष्करभरतीच्या पत्रकांतून चितारल्या जाणाऱ्या रुबाबदार सैनिकांच्या चेहऱ्यावर कर्तव्य बजावत असल्याचं हसू कायम होतं, किरकोळ जखमांची भर पडली होती इतकंच. सैनिकांची पत्रं काटेकोरपणे 'सेन्सॉर' केली जात, 'देशवासीयांचं मनोबल खचवू शकणारा' मजकूर शाई फासून मिटवण्यात येई. 'मला जे सांगावसं वाटतं ते लिहून काही उपयोग नाही कारण ते तुझ्यापर्यंत कधीच पहोचणार नाही ' - जेम्स मिचेलच्या पत्रातील ही ओळ किती 'बोलकी' आहे!





 महायुद्ध आरंभल्यापासून वर्षभरानंतर समस्त खंदकांतून सीगफ्रिड ससूनने वर्णलेली 'सैनिक हा केवळ मृत्यूच्या भस्मधूसर प्रांताचा नागरिक ' असल्याची विवश संवेदना दृढ होऊ लागली. आपला वा शत्रूचा मृत्यू ही गौरवास्पद गोष्ट न राहता खंदकांच्या नरकातून सुटण्याची आशा होऊन गेली. परस्परसहानुभूती वाढीस लागली. कधी एखादा ब्रिटिश कुणा कोसळलेल्या जर्मनाला पाणी पाजे. कधी तर दोन विरोधी लष्करी तुकड्यांमधे गुपचूप 'युद्धविराम' होत असे. आज्ञाभंगाची कारवाई टाळण्यासाठी त्या एकमेकांच्या दिशेने केवळ निरुपद्रवी, दिखाऊ गोळीबार चालू ठेवत. 'आपण अनोळखी माणसं एकमेकांना यातना देत आहोत हे किती निरर्थक, निष्फळ आहे' असा सूर खाजगीत का होईना उमटू लागला. स्टेफान वेस्टमान या जर्मन तरूणाने लिहून ठेवलं आहे - 'शत्रूच्या खंदकावर चढाई करताना एक फ्रेंच सैनिक माझ्या पुढ्यात उभा ठाकला. त्याची संगिन माझ्यावर रोखलेली होती, माझी त्याच्यावर. मी चपळाई दाखवून प्राणान्तक वार केला. तो कोलमडत असता पुन्हा एकदा भोसकलं. तोंडातून रक्ताचा चुळका बाहेर टाकत तो मेला. ..मला डचमळून आलं. गुडघे थरथरू लागले. (संगिनी नसत्या तर) त्याचा हात कदाचित हस्तांदोलनासाठी पुढे होऊ शकला असता. मला कित्ती बरं वाटलं असतं ! मीही त्याच्याशी हात मिळवला असता, आम्ही घट्ट मित्र होऊ शकलो असतो. माझ्याच वयाचा होता तो. परक्या देशाचा गणवेष चढवलेला, परकी भाषा बोलणारा; पण त्याच्याही मागे आई-वडील, परिवार होता. '

ह्या मागे उरलेल्या लोकांच्या, "आपला मुलगा, भाऊ, प्रियकर, नवरा, वडील हे 'किंग अँड कंट्री'साठी लढत आहेत" या अभिमानाच्या धुंदीत ताठ मानेने वावरणाऱ्या सर्वदेशीय नागरिकांच्या, मृत सैनिकांवर 'शहीद' आदि उपाध्यांची पुष्पवृष्टी करणाऱ्या, त्यांच्या गणवेषावरील 'सन्मानचिन्ह' म्हणवणारे धातुचे तुकडे बघून हरखून जाणाऱ्यांच्या मनांवर झापडं बांधण्यात आली होती.. की ती त्यांनी स्वतःहून बांधून घेतली होती? 
''धड मिसरूडही न फुटलेल्या, जीवनातुर डोळ्यांच्या मुलग्यांना तुच्छ मृत्यूच्या खाईत उडी घेण्यास आपणच उत्तेजन देत होतो;  सरकारी पत्रकांतून 'देशप्रेम', 'पौरुषत्व' सिद्ध करण्याची आवाहनं पाहून  आपण चवताळत होतो, वृत्तपत्रांतून परकीयांबद्दलचा द्वेष धगधगता ठेवत होतो, युद्धात सहभागी होण्याकरता गर्दी करत होतो; जीविताच्या, निसर्गाच्या, मूल्यांच्या, निरागसतेच्या या महाध्वंसाला आपणच सर्वथा जाबदार आहोत'' या किळसवाण्या सत्याचा संपूर्ण स्वीकार करणं किती भयंकर, पीडादायी तरीही मुक्तीदायी ठरू शकलं असतं! कितीजण या सत्याच्या दिशेने पावलं टाकण्याच्या दशेत होते? किती ज्ञात-अज्ञात माणसांनी हा कडू घोट तत्काळ रिचवला असेल?  

खंदकांतील बिभत्स दृष्यं पाहून मानसिक धक्का बसलेले सैनिक 'पळपुटे' आहेत म्हणून त्यांना इलेक्ट्रिक शॉक देऊन 'वठणीवर आणलं' जाई, 'ट्रेन्च फूट' होऊन पाय कुजलेल्या सैनिकांची 'रणांगणातून पळ काढायचं निमित्त हवं म्हणून त्यांनीच स्वतःला इजा करून घेतल्यात' अशी हेटाळणी केली जाई. युद्धाची शिसारी येऊन रणभूमीचा त्याग करणारी माणसं हाती लागताच 'देशद्रोही' म्हणून त्यांचा खात्मा करण्यात येई. युद्धसमाप्तीनंतर घरी परतलेल्या सैनिकांना असंख्य मनोशारीरिक व्याधी जडल्या होत्या. वैफल्य (depression) आलं होतं. कित्येकांच्या कुटुंबियांनी त्यांना मनोरुग्णालयांत कायमचं सोडून दिलं. १९२० साली अमेरिकेत दररोज किमान दोन माजी सैनिक आत्महत्या करत होते. तर कुटुंबातील अनेक सदस्य गमावल्याच्या दुःखाने सैरभैर झालेल्या स्त्रियांच्या आत्महत्यांची लाट आल्याचेही उल्लेख आढळतात.  

Trench foot

 "ती शस्त्रसज्जता, ती समरगीतं, लकाकती पदकं, त्या तालबद्ध कवायती, ते ऐटदार गणवेष,.. या साऱ्याचा 'क्लायमॅक्स' कधीच गौरवास्पद, अभिमानास्पद नसतो. 'रणभूमीवरील बलिदान' म्हणजे कत्तलखान्यातल्या जनावराहून वेगळं मरण नसतं..." वगैरे कानीकपाळी ओरडून सांगणारी शेकडो उद्धरणं (quotes) इथे नमूद करता येतील. प्रश्न असा आहे की आपण त्यांतील सत्य पचवू शकतो का? पहिलं महायुद्ध संपताच युद्धभूमीवरील दारूण अनुभवांची कथनं, कविता प्रकाशित होऊ लागल्या. दोन्ही महायुद्धांवर आधारित साहित्य, सिनेमांचा ओघ आजही आटलेला नाही.  पण त्यांचं सार आजतरी आपल्याला उमगलंय का?

राज्यकर्ते, शस्त्र उत्पादकांच्यात सौदे होतात,  "अमुक-तमुक शत्रूपासून देश असुरक्षित" असल्याची भाषा कानी पडताच  आपण बिथरून जातो, अनोळखी माणसांविरुद्ध नीचतम अपराध करण्यास पुढे सरसावतो इतकंच काय, या जुगारात आप्तस्वकीयांना, स्वतःलाही पणाला लावतो. धान्याच्या सुंदर शेतातून युद्धासाठी खंदक खणले जात असताना शेतकरी मान खाली घालून निःशब्द उभे असल्याच्या प्रसंगाचं वर्णन एका कॅनेडिअन सैनिकाने केलं आहे. यात हतबलता तर आहेच, पण अज्ञान, सरकारवरचा अंधविश्वास, भविष्यातील कथित 'सुरक्षितते'साठी वर्तमानाची राखरांगोळी करण्याचीही तयारी दिसते. 'वरून' ऑर्डर्स येतात, साधीसुधी माणसं प्रशिक्षित होऊन नियोजनबद्ध कत्तल करतात.
शांतता, सलोखा टिकवण्याच्या विश्वव्यापी प्रक्रियेतील आपली जबाबदारी दैनंदिन जीवनात आपल्याला समजावून घ्यावीशी वाटते का?


...स्वप्नील डोळ्यांच्या उमलत्या तरुणांना, प्रियजनांना युद्धाच्या होळीत लोटून जल्लोष करणारे एकूणएक सामान्य नागरिक; 'फ्रीडम अँड लिबर्टी'च्या नावाखाली शक्तिप्रदर्शनाचा षौक पुरा करणारे राष्ट्रप्रमुख, लष्करप्रमुख; नफेखोर व्यावसायिक.. आपण सारे आहोत मृतांच्या मांसावर पुष्ट होणारे उंदीर! 


निवडक संदर्भसूची:

•    'अ ब्रोकन वर्ल्ड: लेटर्स, डायरीज अँड मेमरीज ऑफ दि ग्रेट वॉर ', (संपा. सबेस्टिअन फोव्क्स, होप वुल्फ) २०१४
•    'ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट ', एरिख् मारिया रिमार्क (अनु. ए. डब्ल्यू. व्हीन), १९२९
•    'रिअॅलिटीज ऑफ वॉर ', फिलिप गिब्स, १९२०
•    'ट्रीटिंग दी ट्रॉमा ऑफ दि ग्रेट वॉर: सोल्जर्स, सिव्हिलिअन्स अँड सायकिअॅट्री इन फ्रान्स, १९१४-१९४० ', ग्रेगरी एम. थॉमस, २००९
•    'काउंटर-अटॅक अँड अदर पोएम्स ', सीगफ्रिड ससून, १९१९
•    'दि लास्ट फाइटिंग टॉमी ', हॅरी पॅच, रिचर्ड व्हॅन एमडेन, २००७
•    'अ टेस्टामेंट ऑफ यूथ ', व्हेरा ब्रिटन, १९३३
•    (पेंटिंग्ज व स्केचेस) विल्हेम हाइनरिख् ओट्टो डिक्स (१८९१-१९६९)
•    (लेख) 'दि ग्रेटेस्ट कॅटॅस्ट्रोफ दि वर्ल्ड हॅज सीन ', आर. जे. डब्ल्यू. इव्हान्स, २०१४
•    (वेबसाइट) spartacus-educational.com

John Singer Sargent, ''Gassed''