कूसा-हिबारी
मूळ इंग्रजी लेखक: लेफ्कादिओ हर्न ऊर्फ कोइझुमि याकुमो (१८५० - १९०४ )
मराठी संपादन व भाषांतर: मुक्ता असनीकर
Lafcadio Hearn AKA Koizumi Yakumo |
हर्न यांच्याबद्दल: 'पाश्चात्त्य जगाला जपानची ओळख करून देणारा कथाकार' असा लेखक -पत्रकार लेफ्कादिओ हर्न ऊर्फ कोइझुमि याकुमो यांचा मुख्य लौकिक म्हणता येईल. १८९० पासून आपल्या मृत्यूपर्यंत (१९०४) ते जपानमधे राहिले, जपानी भाषा, संस्कृती आत्मसात केली, विविध स्तरांतील लोकांशी संवाद साधून जपानी लोकसाहित्याचा संग्रह व अनुवाद केला, जपानी स्त्रीशी विवाह केला, जपानी नागरिकत्व स्वीकारलं. यामागे व्यावहारिक कारणं असतीलही परंतु गूढ श्रद्धांनी, वैचित्र्यपूर्ण चालीरितींनी नटलेल्या, निसर्गाशी नातं सांगणाऱ्या तत्कालीन जपानी जीवनशैलीबद्दल त्यांना जिव्हाळा होता हे तितकंच खरं. आधुनिक पाश्चात्त्य औद्योगिकतेच्या प्रभावाखाली ही संस्कृती नष्ट होणार याची त्यांना खंत वाटे.
कोणताही धूर्त राजकीय, धार्मिक वा व्यापारी हेतू न बाळगणारा, साम्राज्यवादाचा तिटकारा असलेला, वंशभेद न मानणारा 'गोरा' म्हणून जपान्यांनीही त्यांच्यावर माया केली.
जपानमधे विविध प्रकारचे कीटक पाळण्याची फार जुनी प्रथा आहे. हर्न यांनी एक रातकिडा पाळला होता. 'कोत्तो ' नामक आपल्या पुस्तकात त्यांनी लिहिलेली ही आठवण :
'इस्सुन् नो मुशि नि मो गोबु नो तामाश्शी' - जपानी म्हण
(छोट्ट्याशा किड्यातदेखील आत्म्याचा अंश असतो)
(छोट्ट्याशा किड्यातदेखील आत्म्याचा अंश असतो)
जपानी मापांनुसार 'त्याच्या' पिंजऱ्याची रुंदी बरोब्बर दीड इंच आणि उंची दोन इंच भरते. पिटुकल्या फिरत्या लाकडी दरवाजातून माणसाच्या करंगळीचं पेरसुद्धा आत शिरणार नाही, पण त्याला उडण्या-बागडण्याकरता आतमधे ऐसपैस जागा आहे. पिंजऱ्याच्या तपकिरी जाळीतून अगदी बारकाईने पाहिलं तरच आपल्याला त्याची झलक दिसते इतका 'तो' लहान आहे. लख्ख उजेडात पिंजरा थोडा वेळ गोल गोल फिरवल्यानंतर जाळीदार छताला उलटा लटकलेल्या स्थितीत मला त्याचं दर्शन होतं.
कल्पना करा, साधारण डासाएवढ्या आकाराचा एक किडा - एकूण देहमानापेक्षा पुष्कळ लांबोड्या असलेल्या याच्या मिश्या इतक्या सूक्ष्म, की स्पष्ट प्रकाशातच दृष्टीस पडतात. जपानी भाषेत या किड्याला 'कूसा-हिबारी' अर्थात् 'तृण-चंडोल ' म्हणतात. याची बाजारातील किंमतः बारा सेंट्स फक्त - नखाहून छोट्या गोष्टीचे पुरे बारा आणे मोजावे लागतात बरं!
दिवसा ही स्वारी निद्रा घेते, ध्यान लावते किंवा अन्नग्रहण करते. त्याकरता रोज सकाळी पिंजऱ्यात वांग्याची वा काकडीची छोटी फोड पेश करावी लागते. या प्राण्याची निगा राखणं, त्याला योग्य आहार देणं तसं जिकिरीचं काम. या किड्याला पाहून (जर तुम्ही त्याला पाहू शकलात तर-) इतक्या क्षुल्लक जीवाकरता काही व्याप करणं म्हणजे खुळचटपणा वाटेल तुम्हाला.
पण सूर्य मावळताच त्याचा अणुवत् आत्मा जागृत होतो. मधु-कोमल अशा झपाटलेल्या, अवर्णनीय संगीताने, जणू इवल्याशा घंटांच्या चमचमत्या, मंजुळ, तरंगित किणकिणाटाने खोली भरून जाते. रात्र चढते तसा हा स्वर - कधी घरभर घुमणारा तर कधी ध्वनिच्या अतिसूक्ष्म तंतूंत विरणारा हा स्वर - गोडगहिरा होत जातो. हा आवाज मोठा असला, बारीक असला तरी मनात विचित्रपणे खोल खोल शिरतो.
कूसा-हिबारी रात्रभर गातो नि पहाटेच्या पारी मंदिरात घंटा वाजल्यावरच शांत होतो.
* * *
हे प्रेमगीत आहे - अदृष्टाप्रतीचं, अज्ञाताप्रतीचं सन्दिग्ध प्रेम. आमच्या किड्याला वा त्याच्या पूर्वजांच्या कित्येक पिढ्यांना रानोमाळ जगणं ठावूक असेल, आपल्या गाण्याचं श्रुंगारिक मोल ठावूक असेल याची मुळी शक्यता नाही. कुणा कीटक-विक्रेत्याकडे मातीच्या हंड्यांत उबवलेल्या अंड्यांतून ही मंडळी जन्मतात व जन्मानंतर पिंजऱ्यांतूनच राहतात, वाढतात. मात्र हा जीव आपल्या प्रजातीची कित्येक वर्षांपूर्वीची गायकी आजही सांभाळतो; प्रत्येक स्वराचा नेमका आशय ठावूक असल्याप्रमाणे अगदी स्वच्छ गातो. हजारो-लाखो जीवांची गभीर, धूसर स्मृती या गीतात सामावलेली आहे. टेकड्यांवरल्या ओल्या गवतात कोणेएकेकाळी याचं भूत साद घालत असावं. आपल्या गायनानं तो प्रीतिस व त्यानंतर मृत्यूस पात्र होई. आज तो मृत्यूबद्दल सारंकाही विसरला आहे, पण त्याला प्रीति आठवतेय. जी कधीच येणार नाही अशा प्रियतमेसाठी तो गात आहे.मीलनानंतर कूसा-हिबारींची गुणगुण बंद होते व ते लवकरच मरतात याबद्दल मला पूर्वकल्पना देण्यात आली होती. पण रात्रीमागून रात्री चालल्या तशी ती मधुर, व्याकूळ, अनुत्तरित साद जणू धिक्कारागत मनाला डाचू लागली. ते शल्य खुपू लागलं, सद्सद्विवेक स्वस्थ बसू देईना आणि मी मादी हिबारी विकत घ्यायचं ठरवलं. मात्र ऋतू सरल्यामुळे बाजारात कूसा-हिबारी उपलब्ध नव्हते. एक दुकानदार हसून म्हणाला, "अहो, सप्टेंबरमधल्या विसाव्या दिवसानंतर जगत नाहीत हे किडे!" (एव्हाना ऑक्टोबरचा दुसरा दिवस उजाडला होता) पण माझ्या खोलीत उत्तम प्रतीची शेगडी आहे, खोलीतलं तापमान २३-२४ डिग्रीच्या वर ठेवलं जातं हे त्या पठ्ठ्याला माहित नव्हतं. नोव्हेंबर संपत आला तरी आमचा 'तृण-चंडोल' गातोय. हिवाळा अतितीव्र होईपर्यंत त्याला जिवंत ठेवू शकेन अशी मला आशा आहे*. मात्र त्याच्या पिढीतील त्याचे बहुसंख्य जातभाई आतापावेतो मेले असणार. आमच्या हिबारीचं प्रेम व माझा पैसा पणाला लावूनही आम्हाला त्याच्याकरता जोडीदारीण मिळू शकली नाही. त्यानं स्वतःच आपली जोडीदारीण शोधावी म्हणून त्याला पिंजऱ्याबाहेर सोडावं तर तो एक रात्रही जिवंत राहायचा नाही - मुंग्या, गोमा, कोळी अशा बागेतल्या असंख्य नैसर्गिक शत्रूंपासून त्यानं कसाबसा जीव वाचवला तरी त्याचा टिकाव लागणार नाही.
काल (नोव्हेंबरची एकोणतीस तारीख) टेबलाशी बसलेलो असताना काहीतरी चमत्कारिक जाणवलं - खोली ओकीबोकी वाटतेय. चटकन् लक्षात आलं की तृण-चंडोलाचा आवाज येत नाहीय. खरंतर ही त्याची गाण्याची वेळ. मी त्या स्तब्ध पिंजऱ्याजवळ गेलो - वाळून खडा झालेल्या वांग्याच्या फोडीशेजारी तो मरून पडला होता. 'आकी'ला - हा माझा विद्यार्थी - किड्यांची फार आवड आहे, आमच्या हिबारीला तोच खाऊ घालायचा. पण आठवड्याची सुटी घेऊन आकी गावी गेल्यामुळे हिबारीला खाऊ घालण्याची जबाबदारी आमच्या नोकराणीवर म्हणजे 'हाना'वर पडली. किड्याबद्दल तिच्या ध्यानात होतं पण घरात वांगी नव्हती असं तिचं म्हणणं. वांगं नव्हतं तर कांदा किंवा काकडीची फोड ठेवावी इतकंसुद्धा सुचू नये तिला? मी हानाला फैलावरच घेतलं जरा, तिनंही कर्तव्यबुद्धीनं खेद व्यक्त केला. पण जादुई संगीत आता थांबलं आहे, सुनेंपण जाचतंय, शेगडी पेटलेली असूनही खोली थंड वाटतेय.
* * *
हे म्हणजे अतिच झालं. धान्याच्या अर्ध्या दाण्याएवढ्या किड्यापायी मी त्या गुणी मुलीला बोल लावला. ती अणुएवढी प्राणज्योत मालवल्याने मला कल्पनेहून अधिक दुःख होतंय. एखाद्या जिवाचं हवंनको पाहण्याची सवय झाल्यावर - मग तो रातकिडा का असेना - कसा कोण जाणे हळूहळू आपल्याला त्याच्या आयुष्यात रस वाटू लागतो, आपले नकळत बंध जुळतात त्याच्याशी, आणि नात्यात खंड पडल्यावरच नात्याची प्रकर्षानं जाणीव होते. शिवाय रात्रीच्या नीरवतेत तो नाजूक, मोहक स्वर ऐकताना मला कितीकाही जाणवलं होतं, भावलं होतं! असा प्राणी अन्नावाचून काही दिवस तडफडला हा विचार सहन होत नाही. उपाशीपोटीच तो अखेरपर्यंत गात राहिला. त्याची अखेर तरी किती भयंकर - त्या बिचाऱ्यानं आपलेच पाय खाल्ले होते! ईश्वर आम्हाला, खासकरून आमच्या हाना नोकराणीला, क्षमा करो!
तरीही, मला वाटतं आपलेच पाय खावे लागणं ही गळ्यात गाणं लाभलेल्यांच्या नशिबी येणारी सर्वात वाईट गोष्ट नव्हे. गात राहता यावं म्हणून आपल्याच ऱ्हदयाचे तुकडे मोडतात काही मानवी 'रातकिडे'.
तळटीपा :
*जपानमधे डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात हिवाळा असतो.
Comments
Post a Comment