प्रश्न : ...काही माणसं स्वतःच्या, आपल्या मुलाबाळांच्या व त्यापुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी झटत आहेत त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?...एक चांगलं विश्व, चांगला भवताल घडवण्यासाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती व समूहांबद्दल मी बोलतो आहे - 'ग्रीनपीस', शांतता चळवळी वगैरे. रजनीश (ओशो) : आलं लक्षात. पण तुमच्या हे लक्षात येतंय का, की गेली हजारो वर्षं प्रत्येक पिढी अगदी तेच करत असल्याचा दावा करतेय. आपल्या मागच्या पिढीनं आपला विचार केला, त्यांना आपलं भविष्य उजळून टाकायचं होतं – प्रत्यक्षात काय घडलं? शतकानुशतकं प्रत्येक आई, प्रत्येक बाप, प्रत्येक शिक्षक, प्रत्येक धर्माचरणी व्यक्ती हेच करण्यासाठी धडपडते आहे – सगळीजण भविष्य उज्ज्वल करू पहात आहेत, पण त्यातून भलतंच काहीबाही निष्पन्न होतंय. असं का? तर ह्या सर्व भल्या माणसांनी स्वतःचा वर्तमान नासवला, वाया घालवला. त्यांनी मन मारलं, 'त्याग' केला. मंडळी स्वतःला हुतात्मा समजू लागली. 'आपण किती सेवाभावी आहोत, जणू अवघ्या मानवजातीचं पांग फेडतोय' अशा आविर्भावात मनोमन स्वतःची पाठ थोपटू लागली. खरंतर ही माणसं सर्वांचंच मोठं नुकसान करत ह...