अपत्याला मनोरुग्ण होण्यापासून वाचवलंत तरी रग्गड होईल

 कधीकधी तुम्हाला राग येतो - सुदैवाने अजून तुमचा 'महामानव' झालेला नाही! तुम्हीही रागावू ‘शकता’, आणि तुम्हाला वाटतं यातून माझं मूल काय शिकेल?  - सरळ आहे, ते 'राग' या भावनेबद्दल शिकेल. त्यालाही केव्हातरी रागाबद्दल चार गोष्टी कळून याव्या लागतील ना. मुलं असंच शिकतात - भवतालातून, निरीक्षणातून. तेव्हा राग आला तर रागवा, आणि त्याला रागाबद्दल शिकू द्या. त्याच्यावर प्रेम करा, आणि त्याला प्रेमाबद्दल शिकू द्या; प्रामाणिकतेने वागा, आणि त्यातून ते प्रामाणिकपणा शिकेल. तुम्ही इतकंच करावं, बाकी कश्शाची गरज नाही. उगीच तणावग्रस्त होऊ नका.
कधी तुमच्या मुला/मुलीला खर्चाकरता पैसे द्यायची तुमची इच्छा नसेल तर तिला/त्याला खरं ते सांगा: 'मला पैसे द्यावेसे वाटत नाहीत' असं स्पष्ट सांगा. आपण ढोंग करतो. 'पैसे द्यायला हरकत नाही, पण तुझ्या भल्याकरताच मी देत नाही..' वगैरे थापा मारतो आपण. सरळ सांगा, 'मी कंजूष आहे, मी तुला पैसे देऊ इच्छित नाही!' नाही नं तुमची इच्छा, मग नका देऊ!

तुमच्याने पैसेही सोडवत नाहीत, नि स्वतःच्या चांगुलपणाची खोटी प्रतिमाही मोडवत नाही. मुलाच्या/मुलीच्या भल्याकरता आपण पैसे देण्याचं नाकारत आहोत असा देखावा तुम्ही करता.

कृत्रिमपणे वागू नका; सर्वजण तेच करताहेत, सर्वत्र तेच चाललंय. तुम्ही आपल्या अपत्याला मनोरुग्ण होण्यापासून वाचवलंत तरी रग्गड होईल; तुमचं कर्तव्य पार पडल्यागत होईल. मुलांवर नियंत्रण ठेवायला गेल्यास त्यांची मन:स्थिती हमखास बिघडेल!
 
- रजनीश (ओशो) 
 
 

Comments