बापानं आपल्यासाठी आयुष्य खर्ची घातलं, आज्ज्यानं बापासाठी... मग जगलं कोण?

प्रश्न: ...काही माणसं स्वतःच्या, आपल्या मुलाबाळांच्या व त्यापुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी झटत आहेत त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?...एक चांगलं विश्व, चांगला भवताल घडवण्यासाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती व समूहांबद्दल मी बोलतो आहे - 'ग्रीनपीस', शांतता चळवळी वगैरे.

रजनीश (ओशो): आलं लक्षात. पण तुमच्या हे लक्षात येतंय का, की गेली हजारो वर्षं प्रत्येक पिढी अगदी तेच करत असल्याचा दावा करतेय. आपल्या मागच्या पिढीनं आपला विचार केला, त्यांना आपलं भविष्य उजळून टाकायचं होतं – प्रत्यक्षात काय घडलं? शतकानुशतकं प्रत्येक आई, प्रत्येक बाप, प्रत्येक शिक्षक, प्रत्येक धर्माचरणी व्यक्ती हेच करण्यासाठी धडपडते आहे – सगळीजण भविष्य उज्ज्वल करू पहात आहेत, पण त्यातून भलतंच काहीबाही निष्पन्न होतंय. असं का?

तर ह्या सर्व भल्या माणसांनी स्वतःचा वर्तमान नासवला, वाया घालवला. त्यांनी मन मारलं, 'त्याग' केला. मंडळी स्वतःला हुतात्मा समजू लागली. 'आपण किती सेवाभावी आहोत, जणू अवघ्या मानवजातीचं पांग फेडतोय' अशा आविर्भावात मनोमन स्वतःची पाठ थोपटू लागली. खरंतर ही माणसं सर्वांचंच मोठं नुकसान  करत होती, कारण त्यांना जो अवधी लाभला होता; अस्तित्वाची जी अमूल्य भेट पदरी पडली होती तिच त्यांनी अपव्यय केला, उधळमाधळ केली. शिवाय ती उज्ज्वल भवितव्यदेखील घडवू शकली नाहीत.

भल्या माणसांनो, आतातरी काही डोक्यात शिरतंय का?

माझी व्यक्तिगत समजबुद्धी सांगते की, वर्तमानात तुम्ही पूर्णांशानं जगलात, त्याचा रस निःशेष चाखलात तरी पुरे, कारण पुढला क्षण हा आल्या क्षणातूनच जन्म घेणार असतो. हा क्षण पूर्णत्वाने जगलात ना, मग पुढल्या क्षणाची काळजी नको. बापाच्या मनावर ठसवलं जातं: 'तू पोरांकरता त्याग करायला हवास, स्वतःला मुरड घालायला हवीस. तुझ्या बापानंदेखील तेच केलं, स्वःतचा विचार बाजूला सारून तुला लहानाचं मोठं केलं.'
म्हणजे ना आज्जा धड जगला, ना बाप धड जगू शकत, ना त्याची पोरंबाळं - तीदेखील त्यांच्या अपत्यांकरता त्याग करत बसतील. ...प्रत्येकानं अन्य कुणातरीसाठी त्याग करायचा आहे, कष्टायचं आहे, सोसायचं आहे. विचित्रच! मग जगायचं कुणी? 

म्हणून म्हणतो, जगा! तुमच्या जिवंत अनुभवातून भविष्य अंकुरणार आहे. आला दिवस, आला क्षण सौंदर्यपूर्णतेनं, उत्फुल्लतेनं जगत असाल तर 'भवितव्य घडवण्यासाठी' तुम्हाला यातायात करावी लागणार नाही. पण मुलांच्या भवितव्यासाठी त्याग-बिग करत असाल तर सावधान! तुमच्या अंतर्मनात त्यांच्याबद्दल वैषम्य खदखदत राहील. 'चायला, पोरापायी मला हे करता येत नाही, ते करता येत नाही..' - आतल्याआत धुसफुसत रहाल. 
मुलांनाही तुमचा संताप येऊ लागेल. 'आम्ही कशा तुमच्याकरता खस्ता खाल्ल्या..' वगैरे कान किटेपर्यंत ऐकवाल ना तुम्ही त्यांना. अशानं ती वैतागतील नाही तर काय! 
शिवाय 'आपण पोरापायी आपलं आयुष्य खर्ची घातलं म्हणून पोरानंही आपल्यासाठी अमुक तमुक करावं, स्वतःला जरा मुरड घालावी' अशी अपेक्षा तुम्ही करू लागाल. 'पोरानं आपल्या उपकारांत रहावं, ते फेडावेत' ही मागणी तुम्हाला रास्त वाटू लागेल. पोरानं तुमच्यापुढं मान तुकवली, त्याचं तारुण्य, त्याची ऊर्जा तुमच्याकरता खर्ची पाडली की तुम्ही सुखावून जाल. 

मूर्खपणा आहे सगळा.

प्रश्न: सध्याची राजकीय परिस्थिती पाहून लोक चिंताक्रांत झाले आहेत. अण्वस्त्रं, अणुयुद्धाची टांगती तलवार, पर्यावरणाची गंभीर होत चाललेली स्थिती, प्रदूषण.. या समस्यांवर काम करणं, त्यांच्या निरसनाकरता झटणं म्हणजे बापानं मुलासाठी त्याग करणं नव्हे.

रजनीश (ओशो): हं. मला वाटतं, या गोष्टी केवळ वरकरणी भिन्न आहेत. मूळ एकच आहे. अण्वस्त्रांचा भविष्यकालीन समस्या म्हणून विचार कसला करता? – अरे, ती आजची, वर्तमान समस्या आहे! अण्वस्त्रांनी वेढलेल्या अवस्थेत आज आपण जगतो आहोत. त्यामुळे त्याबद्दल तुम्हाला जे काही करायचं असेल ते आज, आत्ता करा!

शातंतावादी उद्याची स्वप्नं रंगवतात, भविष्याचा विचार करतात. 'यापुढे महायुद्ध होऊ नये, यापुढे अण्वस्त्रं निर्माण होऊ नयेत'. पुन्हा तेच. आजचं काय? आणि जी माणसं अण्वस्त्रं बनवत आहेत तीदेखील भवितव्य सुनिश्चित करण्यात व्यग्र आहेत: आपल्या जनतेच्या, आपल्या राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याकरता झटत आहेत. 'लेचंपेचं राहून चालणार नाही. उद्या कुणाची आपल्याकडे वाकडी नजर करून पाहण्याची हिंमत झाली नाही पाहिजे, आपण सर्वशक्तिमान व्हावं म्हणजे उद्या कोणाचीही आपल्यावर हल्ला करण्याची छाती होणार नाही.' - तेसुद्धा उद्याचाच विचार करताहेत!

मी युद्धाच्या बाजूनं नाही. मी शांततावादीही नाही. मी म्हणतो, बसू दे या बावळटांना एकमेकांवर शिंगं रोखून. निदान उर्वरित मानवजातीनं उत्फुल्लपणे जगावं. चालू क्षण शांततेने, सौहार्दाने, हसतखेळत घालवला तर उद्या तिसरं महायुद्ध उद्भवेलच कसं? 

माणूस मजेत असेल, निवांत असेल, समाधानी असेल तर त्याला मनापासून काही कोणी युद्धात खेचू शकत नाही. जिथं बहुसंख्य लोक दुःखीकष्टी असतील; त्यांच्या लैंगिक भवना दीर्घकाळ दडपल्या गेल्या असतील; दारिद्र्यानं, उपासमारीनं आत्मसन्मानाच्या ठिकऱ्या उडाल्या असतील अशा समाजाला युद्धाच्या खाईत ढकलणं फार सोपं असतं. परस्परांची कत्तल करण्यासाठी या लोकांचं मन वळवण्यात फारसे कष्ट पडत नाहीत – जगणं-मरणं त्यांच्यालेखी आता एकच गोष्ट असते. 

...लैंगिक भवना दाबून टाकणं – सैनिक व धार्मिक उपासक याबाबतीत एकाच नावेचे प्रवासी असतात, नाही? दोघांनाही सहजप्रेरणा चिरडून टाकण्यास भाग पाडलं जातं, दीर्घकाळ वखवखलेल्या अवस्थेत ठेवलं जातं – या दोन्ही जमाती म्हणजे मोठी आपत्तीच होऊन बसली आहे. 

प्रश्न: असो. लैंगिक दमन, दारिद्र्य इ. बाबींमुळे माणसं युद्धावर जाण्यास राजी होतात या तुमच्या म्हणण्याशी मी सहमत नाही. हल्ली युद्धाकरता फारश्या मनुष्यबळाची जरूरच उरलेली नाही. तिथंही प्रचंड प्रमाणात तंत्रज्ञान वापरलं जातं. तर, काहीतरी केलं पाहिजे ही भावना समाजमनात जोर धरू लागली आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी मजा करावी इतकंच म्हणायचंय का तुम्हाला...
 
रजनीश (ओशो): जे काही करायचं असेल, ते आत्ता करा, असं मी म्हणतो आहे. रस्त्यात नाचायचं असेल, क्रेमलिनपुढे धम्माल करायची असेल; जो काही धिंगाणा घालायचा असेल, व्हाइट हाऊससमोर प्रणय करायचा असेल...
 

Comments