दीना!
मास्टर दीनानाथ मंगेशकरांबद्दल काही लेख वाचनात आले. भारतीय शास्त्रीय संगीताचा माझा अभ्यास नाही, तितकीशी ओढही नाही. मात्र का कोण जाणे, संगीत-नाट्य क्षेत्रातील मंडळींनी या कलाकाराबद्दल वर्णलेल्या काही आठवणी इतरांशी वाटून घेण्याची इच्छा होतेय:
संगीतातील रूचिपूर्ण, उत्तम काहीही शिकण्याबद्दल मास्टर मुक्तग्राही होते. विद्वान लोकांकडून त्यांनी चिजांचा मोठा संग्रह केला. उत्तरेकडील, थोडे दक्षिणेकडील गायकीचे ढंग आत्मसात केले. ...गोव्यातील आपले गुरू बाबा माशेलकर यांजकडून मडकइ ते वाफर या तासा-दीड तासाच्या पायी प्रवासात विलक्षण बुद्धिमत्तेच्या मास्टरांनी अकरा चिजा शिकून घेतल्या असा प्रसंग ऐकिवात आहे! ..फार फार आत्मीयतेनं त्यांनी हे भांडार मिळवलं व मुक्तहस्ते शिष्यांना देऊ केलं. मास्टरांची शिकवण्याची ठराविक पद्धत नव्हती. मनात येईल तसे, हिशोबीपणा न करता शिकवत. प्रभाकर जठारांना भरभरून बंदिशी दिल्या त्यावेळी ते म्हणाले: "एकच राग सहा-सहा महिने शिकवायचा माझा स्वभाव नाही. शे-दोनशे बंदिशी गळ्यातून गेल्या म्हणजे तुझा आवाज आपोआप निकोप होईल. एकदा शिकवून झाल्यानंतर गाणं हे ज्याच्या-त्याच्या ऐकण्यावर, विचारावर व मेहनतीवर अवलंबून असतं. विद्या द्यायची तर झरझरा द्यावी, नाहीतर देऊ नये."
- - -
कला कुठूनही निपजो, कोणातूनही पाझरो, मास्टर तिची आवर्जून कदर करीत. फिरत्या पेटीवाल्यांना, भिकारी गायकांना आगत्यानं घरात बोलावून त्यांचं गाणं ऐकत. असं एखादं पोर चुणचुणीत गायलं तर त्याला चार गोष्टी शिकवतही.
'कृष्णार्जुनयुद्ध' चित्रपटाचं चित्रिकरण चालू असता ते घोड्यावरून पडले. पाय सुजला. कुणीतरी रस्त्याने जाणाऱ्या तुंबडी*वाल्याला घरात आणलं. (*नळीसारखं यंत्र, ज्याद्वारे शरीरातील दूषित रक्त, वायू काढला जाई. पूर्वी न्हावी वगैरे मंडळी मामुली रोगोपचाराची कामं करत.) मास्टरांचा पाय बरा करता करता तुंबडीवाल्यानं 'गाणं गाऊन दाखवू का' असं विचारलं. मास्टर कौतुकाने म्हणाले "अरे वा! तू गातोस? - ऐकव ना!" तो गाऊ लागला. शब्द होते: 'डोंगरावर एक झाड | खाली फांद्या वर मूळ |'
भगवद्गीतेतील 'ऊर्ध्वमूल अधःशाख' या पिंपळवर्णनाचा तो ग्राम्य अनुवाद होता, हे मास्टरांच्या लक्षात आलं. गाणं ऐकून त्यांचे डोळे भरून आले. त्यांनी तुंबडीवाल्याला जेवू घातलं, सुंदरसा जरीपटका व दहा रूपये दिले.
'बलवंत नाटक कंपनी' बंद पडली त्यावेळची गोष्ट. भागिदारांच्या बेशिस्त कारभारामुळे मास्टर आर्थिक विवंचनेत सापडले होते. काही काळ घर व गाव सोडून जे निघून गेले, ते पाच-सहा महिन्यांनी परतले. लता व मीना यांजकरता आणलेले फ्रॉक, तसंच रोख दीडशे रुपये त्यांनी माईंच्या (पत्नीच्या) हातात ठेवले. खुद्द मास्टरांच्या अंगावर जुनेपुराणे कपडे होते. माईंना रहावलं नाही, त्यादिवशी बाजारातून त्यांनी मास्टरांकरता नवा सदरा आणला. सायंकाळी दारावरून एक भिकारी गात चालला होता, मास्टरांनी त्याला आत बोलावलं. म्हणाले: "मी रंगभूमीवरचा नट, गायक. परिस्थितीमुळे तुझ्यावर रस्तोरस्ती हिंडण्याची वेळ आली असावी. पण आपल्या दोघांची जात कलावंताची. आपल्यात कसलाही भेद नाही." त्यांनी भिकाऱ्याला जेवू-खावू घालून आपणाकरता आणलेला सदरा देऊ केला.
- - -
मास्टर व्यवहारात सच्चे, विनयी व शिस्तशीर होते. मालकपणाची गुर्मी त्यांच्यात नव्हती. 'बलवंत नाटक कंपनी'त कलाकारांसाठी आखलेले नियम, त्यांची दिनचर्या वाचली म्हणजे याचा प्रत्यय येतो. वक्तशीरपणा, कपडेपटाची काळजी घेणे या गोष्टी सर्वांना पाळाव्या लागत. रात्री जागरणे, वाटेल तिथे भटकंती केलेली चालत नसे. कंपनीत सर्वांना सकस भोजन मिळे. शिळंपाकं कधी वाढलं जात नसे. प्रयोगाचे वेळी चहादेखील दर खेपेला ताजा असे. पगार वेळेत होत. नटांना लिहा-वाचायचं, संगीताचं शिक्षण घेण्याची सोय होती. कंपनीला संपन्नावस्था आल्यावर प्रत्येक नटाचा आयुर्विमा काढला जाऊ लागला. ..नामवंत साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आदी कंपनीत वेळोवेळी वास्तव्याला असत. यामुळे संगीत-नाट्यापलीकडील विचार, कार्य, दृष्टिकोन यांच्याशी परिचय होई, साधक-बाधक चर्चा घडत.
- - -
मास्टरांना स्वरांचं कल्पनातीत वेड होतं. सतत स्वरचिंतन चाले.
एकदा ते व त्यांचा मित्र प्रयोगाहून परतत होते. वाटेत गर्दी जमलेली. कुणाचंतरी निधन झालं होतं, शोकाकुळ बायका मोठ्याने रडत होत्या. मास्टर मित्राला म्हणाले, "ती जी बाई रडतेय ना, तिचा आवाज चांगला आहे".
तापानं फणफणलेल्या एका मुलासमोर त्याला बरं वाटावं या दृष्टीने एक प्रयोग म्हणून मास्टर 'तोडी' रागातील चीज गायले. अर्ध्या-पाऊण तासाच्या गायनानंतर मुलाचा पारा बराच खाली आल्याचं आढळलं.
मैफलीला गेल्यावर हाताला येईल तिथे - शेजारच्या भिंतीवर, आपल्या बाहीवर वा पुढे बसलेल्याच्या शर्टावर मास्टर बंदिशी उतरवून घ्यायचे. एकदा लिहून काढताच बंदिश त्यांच्या स्मरणात रहात असे. आपल्या नाटक मंडळीचा जिथे मुक्काम असेल तिथल्या गायकांना बोलावून, आदरसत्कार करून मास्टर त्यांचं गाणं ऐकायचे.
- - -
ज्योतिषशास्त्राचा मास्टरांचा अभ्यास दांडगा होता. खेरीज छायाचित्रण, क्रिकेट व क्रोमोपॅथीमधे*
(*रंगीत काचांच्या बाटल्यांना सूर्यप्रकाश दाखवून त्यांतील द्रव्य
रोगोपचाराकरता वापरणे) त्यांना रस होता. अनेकांच्या आयुष्यातील बऱ्यावाईट उत्पातांबाबत त्यांनी स्पष्ट, अचूक भाकिते केली. स्वतःच्या मृत्यूसमयाबद्दलही त्यांनी अतिशय नेमकं भविष्य वर्तवलं होतं. 'त्याप्रमाणे न घडल्यास मला दीर्घायुष्य लाभेल' हेही सांगून ठेवलं होतं, पण स्वतः पूर्वसूचित केलेल्या दिवशीच ते मृत्यू पावले.
Comments
Post a Comment