देवाची हाडे
एके रात्री कडाक्याच्या थंडीत एक साधू एका मंदिरात मुक्कामास आला. थोडी ऊब मिळावी म्हणून त्यानं चक्क देवाची लाकडी मूर्ती पेटवली! तडतडण्याच्या आवाजानं पुजारी जागा झाला. बघतो तर काय, देवाची मूर्ती जळत होती!
ते दृष्य पाहून पुजारी स्तंभित झाला. मनात क्रोध उसळला तरी तोंडून शब्द फुटेना. त्याचवेळी त्याला हेही दिसलं, की साधू मूर्तीची राख चाचपडतो आहे.
अखेर त्यानं घुश्शात विचारलं, "देवाची मूर्ती जाळलीस, आता हे काय चालवलंयस?"
"देवाच्या शरीरातील हाडं शोधतो आहे," साधू उत्तरला.
"अरे वेड्या, लाकडात हाडं कुठून येणार?"
"असं का? मग कृपा करून आणखी एक मूर्ती आणा. भलताच गारठा आहे, शिवाय रात्रही पुष्कळ बाकी आहे." साधू म्हणाला.
Comments
Post a Comment