प्रतिष्ठेसाठी काम करणारा माणूस कार्यक्षम असूच शकत नाही

 ** हे भाषांतर माझे नाही, मी फक्त याचेे संपादन केेले आहे. **
 
जन्मल्यापासून मरेपर्यंत, अखेरच्या क्षणापर्यंत तुम्ही अहोरात्र लढत, धडपडत असता, भांडत-तंटत असता; अथक, अंतहीन परिश्रम करता. याहून निराळी जीवनरीत अस्तित्वात असणार यात शंकाच नाही, मात्र आपण माणसांनी ही धडपड, हा झगडा (struggle) अगदी मनोभावे आपलासा केला आहे. शाळकरी मुले झगडा स्वीकारतात, वयस्क पिढ्यांनी तो स्वीकारला आहे. आपण का म्हणून झडगतो? त्या धडपडीचे, खटाटोपाचे, आकांक्षांचे सार काय असते? अस्तित्वाच्या सर्व पातळ्यांवर, हरेक क्षेत्रात आपण सदैव इतके वखवखलेले का असतो? तथाकथित ‘आध्यात्मिक’ मंडळी, दाढीधारी साधू-संन्यासी, राजकीय नेते, सत्ताधारी, उद्योजक, व्यापारी, ज्ञानसंपादन करणारी माणसे - सर्वचजण महत्त्वाकांक्षेने पछाडलेले असतात ते का बरे?? ही झुंज, वणवण, धडपड, तडफड...कशासाठी?
 
असे बघा: प्रत्येक जीवाचे काही ना काही कार्य असते. माणूस म्हणून आपल्याला काही कार्ये पार पाडावी लागतात - कामधंदा करावा लागतो, शिकावे लागते, पुष्कळ गोष्टी कराव्या लागतात. परंतु मनुष्याला केवळ कार्यधारक (functionary) न राहता आणखी काहीतरी / कोणीतरी बनायचे असते. त्याला सत्तेचे, पदाचे, प्रतिष्ठेचे आकर्षण असते. ती इच्छा त्याच्या कार्याला चिकटते. कार्याचा वापर तुम्ही सत्ता, उच्चस्थान, मानसन्मान मिळवण्यासाठी करता, अन् मग विसंगती निर्माण होते. विसंगतीमुळे संघर्ष माजतो. विसंगती नसेल, अंतर्विरोध नसेल तर संघर्षाचे प्रयोजनच उरणार नाही. 

कामातून जिथे माणसाला प्रतिष्ठा, दर्जा प्राप्त होत असेल तिथे विसंगती असणारच. समाजव्यवस्था नेमकी याच तत्त्वावर आधारलेली आहे - समाजात कार्य महत्त्वाचे नसून सामाजिक स्थान, दर्जा, इभ्रत महत्त्वाची असते, अर्थात् सत्ता महत्त्वाची असते. अशारितीने विसंगतीला समाज खतपाणी घालत असतो. कार्य मंत्र्याचे असो वा संताचे, त्याला कमी-अधिक प्रमाणात प्रतिष्ठा चिकटलेली असते. तुम्हाला कार्यात स्वारस्य नसून, कार्याचे अप्रूप नसून प्रतिष्ठेत स्वारस्य असते, म्हणून तुमच्याही ठायी अंतर्विरोध निर्माण होतो. 
प्रतिष्ठा मिळवण्यासाठी कार्य करणारा माणूस कार्यक्षम असूच शकत नाही. या जगात कार्यक्षम असणे नितांत गरजेचे आहे, कारण कार्याचे महत्त्व अनन्यसाधारण होय. चंद्रावर जाणाऱ्या अंतराळयानात लाखो छोटे-मोठे भाग असतात. एक जरी भाग व्यवस्थित काम करत नसेल तर ते यान उड्डाण करू शकत नाही. जो कोणी या अंतराळयानाचा अभिकल्प (design) करत असेल, रचना करत असेल त्याने त्या रचनेद्वारे प्रतिष्ठा मिळवण्याचा यत्न करून बिलकुल चालणार नाही. त्याचे आपल्या कामावर प्रेम असावे लागेल, अन्यथा तो एक निर्दोष, परिपूर्ण यान निर्माण करू शकणार नाही . ज्याचे आपल्या कामावर प्रेम असेल - अभिकल्प असो, बांधणी असो, संरचना असो, काही का असेना - मानसिक पातळीवर प्रतिष्ठा मिळवण्यासाठी, कसलेसे स्थान मिळवण्यासाठी जो काम करत नसेल, केवळ त्यालाच निष्ठुर न होता कार्यक्षम होता येते. कार्याचा वापर प्रतिष्ठेसाठी करणारी माणसे निर्दय होऊन जातात. 
 
ज्या समाजात तुम्ही घडता, लहानाचे मोठे होता, ती समाजव्यवस्था तुम्हाला आपल्या कामावर प्रेम करायला सांगत नाही. शिक्षणाद्वारे ही व्यवस्था समाजाच्या मागण्या, गरजा पुरवण्यासाठी काम करण्याच्या दिशेने तुम्हाला ढकलते. 
वर्तमान समाजाला अभियंते, वैज्ञानिक हवेत - जो-तो उठून अभियंता बनतो आहे, शास्त्रज्ञ बनतो आहे, कारण सध्या या पेशांचा भाव वधारला आहे, ते लाभदायक झालेत. पण खरेखुरे अभियंते, हाडाचे शास्त्रज्ञ फारच थोडे असतात. बहुतेकजण पैसा, मानसन्मान, प्रतिष्ठा कमावण्याचे माध्यम म्हणून विज्ञान, अभियांत्रिकीचा वापर करत आहेत, व त्यायोगे विसंगती पैदा करत आहेत, नि समाज आपल्या भौतिक सुबत्ता, ऐषोआराम, बाह्य प्रगतीचे देखावे मांडण्यात गुंग आहे. 
- जे. कृष्णमूर्ती
(स्रोत: तिसरा जाहीर संवाद - मुंबई, २८ फेब्रुवारी १९६२)
 
 

Comments