‘परित्राणाय साधूनां...’चा नेमका अर्थ काय?
कृष्ण-स्मृति: प्रवचन पाचवे मधून
(२७ सप्टेंबर १९७०, कुल्लू्-मनाली)
प्रश्न: ‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्...’ हे कृष्णवचन सुविख्यात आहे. त्याचा नेमका अर्थ काय?
रजनीश (ओशो): ‘साधूंचं रक्षण करण्यासाठी व दुष्टांचा विनाश, दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी मी अवतरेन...’ हम्म. या वाक्याचे दोन्ही भाग अगदी समानार्थी आहेत. दुष्टांचं निर्दालन म्हणजेच सुष्टांचं रक्षण. मात्र ‘दुष्टांचं निर्दालन’ म्हणजे नेमकं काय, हे जरा बारकाईने समजून घेतलं पाहिजे.
दुष्टांचा अंत कसा होईल? - त्यांचा वध करून? छे! वध केल्याने दुष्ट लोक मरत नाहीत. या विश्वात मारल्याने काही मरत नाही, हे कृष्णाला चांगलं ठावूक आहे. दुष्टाला सुष्ट बनवलेत, असाधूला साधू बनवलेत, तरच दुष्टाईचा अंत होतो. बस्स, अन्य कुठलेच उपाय इथे चालत नाहीत. हत्या केल्याने दुर्जन मरत नसतात. हत्येने फारतर देहाचा अंत होईल. मग तो दुराचार, दुष्टवृत्ती अन्य देह धारण करेल. दुर्जनांचं हृदयपरिवर्तन घडून जेव्हा ते सज्जन होतात, साधू होतात, केवळ तेव्हाच त्यांच्यातील दुष्टवृत्तीचा, पापवृत्तीचा समूळ नाश होतो.
आता, ‘साधूंचं रक्षण’ याचा अर्थ सामान्यतः जसा लावला जातो, ती एक मोठीच गंमत आहे. साधू खोटा असेल, ढोंगी असेल तरच त्याला रक्षणाची गरज भासते. खऱ्या साधुला, सज्जनाला रक्षणाची काय गरज! ‘आपल्याला धोका आहे’ या भावनेने तो सचिंत होईल का, भयभीत होईल का मुळी? साधूंनाही रक्षणाची गरज भासते याचा अर्थ परिस्थिती भलतीच बिकट आहे म्हणायचं! ‘साधू-सज्जनांच्या रक्षणासाठी मी येईन’ म्हणजे जेव्हा साधू नकली असतील, पाखंडी असतील, ‘असाधू’ असतील तेव्हा मी अवतरेन, असं म्हणतोय कृष्ण. कारण नकली साधूलाच संरक्षणाची गरज पडते. ज्याचा केवळ वेष साधूचा आहे त्याला संरक्षणाची गरज पडते. अन्यथा साधूला, सज्जनाला कुणापासून धोका असणार? त्याला संरक्षण हवंसं वाटेलच कशाला? यदाकदाचित कृष्ण अवतरलाच, तर खरे साधू म्हणतील: ‘तुम्ही कशाला व्यर्थ श्रमता, भगवन्? विपदेतही निश्चिंत आहोत आम्ही.’ हाच तर साधुतेचा, सौजन्याचा अर्क आहे: भयप्रद वातावरणातही आपल्या आंतरिक निर्भयतेत स्थिर झालेलं असणं. असुरक्षिततेही जो शांत आहे, निश्चिंत आहे, अव्याकुळ आहे; संकटप्रसंगी जो निर्धास्त आहे आहे त्याला ‘साधु’ म्हणावं. कशातही धोका न वाटणे, कुठेही असुरक्षित न वाटणे हाच तर साधू असण्याचा गर्भितार्थ आहे. श्रीकृष्णाने त्यांना वाचवण्याची, अभय देण्याची गरज काय!
त्यामुळे कृष्णाचं हे वचन खूप मजेशीर आहे. साधूंचं रक्षण करण्यासाठी यावं लागेल - जेव्हा साधू हे खऱ्या अर्थाने ‘साधू’ नसतील, जगात असाधूंचा सुळसुळाट झालेला असेल, त्यावेळी सद्-रक्षणासाठी यावं लागेल, व त्याचवेळी दुर्जनांनाही परिवर्तित व्हावं लागेल. दुष्टांचं हृदयपरिवर्तन घडवण्याचं सामर्थ्य खरं म्हणजे साधूसंतांच्या अंगी असतंच, त्यासाठी देवतांना तसदी घ्यायची गरज नसते. परंतु साधू म्हणवणारे लोक भोंदू असल्यामुळे कृष्णाला अवतरावं लागेल. दुष्टांचा विनाश म्हणजे त्यांचं पारिपत्य, त्यांची कत्तल नव्हे - ती काय, कोणीही करेल. आपले कायदे, न्यायव्यवस्था वगैरे एकप्रकारे तेच करतात - गुन्हेगारांना शिक्षा सुनावतात, प्रसंगी त्यांची हत्या करतात. हे झालं दुर्जनांचं हनन, परिवर्तन नव्हे. दुष्टामधे आतपासून बदल घडला तरच तो सुष्ट होतो, सज्जन होतो. दुष्टाचा सुष्ट झाला की त्याची दुष्टाई आपोआप लयास जाते. पण कल्पना करा, साधू म्हणवणारे बहुतांश लोक वास्तविक जिथे असाधू असतील तिथे दुष्टांची दुष्टाई किती विकोपाला गेलेली असेल!
साधूंचं रक्षण व दुष्टांचा विनाश...आजवर या वचनाचे चित्रविचित्र अर्थ लावण्यात आलेत. ‘आपलं रक्षण करण्यासाठी कृष्ण अवतरेल’ असं स्वतःला ‘साधू’, ‘सज्जन’, ‘पवित्र’, ‘सभ्य’ इ. म्हणवून घेणाऱ्या मंडळींना वाटतं, मात्र ज्याला रक्षणाची भासते, तो खरा साधू नव्हेच. जेव्हा साधूच्या अंतःकरणातील साधुता विरून गेलेली असते, नि तो साधुतेचं केवळ नाटक करीत असतो तेव्हा तो भयग्रस्त होऊ लागतो, त्याला रक्षणाची गरज पडू लागते. दुसरीकडे दुर्जनांना वाटतं, की कृष्ण आपल्याला मारण्यासाठी येईल. त्यांना तसं वाटणं साहजिक आहे, कारण ते स्वतः मारझोड, खूनखराबा, कट-कारस्थानं करण्यात, इतरांचा घात करण्यात दंग असतात; इतरांना उपद्रव करण्याची रगच असते त्यांच्या अंगी. त्यामुळे ‘आमचा संहार करण्यासाठी कृष्ण येईल’ हाच विचार येणार त्यांच्या डोक्यात. परंतु वृत्ती अथवा चेतना अशी मारून मरत नसते - ती नवनव्या रूपांत सक्रिय राहते. त्यामुळे हा वेडेपणा कृष्ण नक्कीच करणार नाही.
पण तथाकथित साधू आपापल्या मठांत खुशाल आहेत. ईश्वरकृपेचं छत्र आहेच आपल्या डोक्यावर, हे त्यांनी गृहीत धरलंय - संकटप्रसंगी तो धावून येईल आपल्यासाठी. ‘जे-जे आपल्याला त्रास देतात ते दुर्जन’ अशी या साधू/बाबा/स्वामींची समजूत असते. ‘संत-सज्जनांना नडणारा, सवाल करणारा, अडकाठी करणारा तो दुर्जन’ अशी या भोंदूंची दुष्टत्वाची व्याख्या असते! साधू सच्चा असेल ना, तर आपल्याला कुठच्याही प्रकारे उपद्रव करणारी व्यक्तीसुद्धा त्याला आपलीशीच वाटेल; तिच्याहीप्रती त्याच्या अंतःकरणी मैत्री, करुणा, जिव्हाळाच असेल. आपल्याशी अनिष्ट, असुखकारक वर्तन करणाऱ्या व्यक्तींना जो दुष्ट म्हणतो, त्यांचा द्वेष करतो, त्यांच्याप्रती वैरभाव बाळगतो तो खरा साधू नव्हेच. कोणालाच शत्रू न मानणं, जगात शत्रू दृष्टीसच न पडणं; आपल्याशी दुर्वर्तन करणाऱ्यांच्या प्रतीही वैमनस्य न वाटणं हे सार आहे साधुत्वाचं. पण तुमचे ते साधू - जे खरंतर असाधू आहेत - तंगड्या पसरून आरामात राहतात; ‘आमच्या रक्षणासाठी, आम्हाला छळणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी देव नक्की अवतरेल’, अशा गोड भ्रमात राहतात.
गीतेतील हे वचन वारंवार उगाळण्यात येतं; लोक अगदी आवडीने, मनःपूर्वक त्याचं स्मरण करतात. पण ती साधूंवर केलेली विनोदी कोटी आहे, याचा त्यांना पत्ता नसतो. मोठा उपहास आहे त्या वचनात. खोलवर दडलाय तो, सहजासहजी लक्षात येत नाही. श्रीकृष्णासारख्या व्यक्तींनी केलेला विनोद हा गहनच असणार - तो थिल्लर, पाणचट, सुमार असूच शकत नाही. असा दैवी विनोद उमजण्यासाठी शतकांचा कालावधी लागतो.
विनोद / चुटकुला ऐकल्यावर सामान्यतः लोक तीन टप्प्यांमधे हसतात म्हणे. सर्वांत आधी हसणाऱ्यांना विनोद पुरेपूर समजलेला असतो. त्यानंतर हसणारे लोक पहिल्यांदा हसणाऱ्यांकडे बघून हसतात. ‘लोक हसताहेत म्हणजे हसण्यासारखं काहीतरी नक्कीच घडलं असावं’ या भावनेतून त्यांना हसू येतं. सर्वांत शेवटी हसणाऱ्यांना ओ की ठो कळलेलं नसतं. ‘इतके लोक हसत असताना मख्ख बसून राहिलो तर आपण अडाणी ठरू, त्यामुळे आपणही ख्याख्या केलेलं बरं’ या भीतीपोटी ही मंडळी हशात सामील होतात. तात्पर्य: विनोद उमगायला वेळ लागतो. कृष्णासारख्या व्यक्तीने केलेला विनोद उमगण्यासाठी तर पुष्कळच वेळ लागतो. ‘परित्राणाय साधूनां...’ या त्याच्या वचनात गहिरा विनोद दडलाय. स्वतःला ‘साधू’, ‘संत’, ‘सज्जन’ म्हणवून घेणाऱ्यांना मारलेली ती कोपरखळी आहे. ‘साधू’लाही असुरक्षित वाटावं, त्यालादेखील संरक्षणाची गरज भासावी असं युग येईल हाच खरा विनोद आहे.

Comments
Post a Comment