'ओळख' ( An introduction ) कमला दास ( Kamala Das / Kamala Surayya / Madhavikutty) राजकारणातलं फारसं कळत नाही, पण सत्तेत असणाऱ्यांची नावं ठाऊक आहेत मला, आणि ती आठवडयाच्या वारांसारखी किंवा महिन्यांच्या नावांसारखी घोकू शकते मी, अगदी नेहरूंपासून. मी भारतीय, दाट सावळी, मलबारमधे जन्मलेली तीन भाषा बोलणारी, दोनांत लिहिणारी, एकीत स्वप्नं पाहणारी. "इंग्लिशमधे लिहू नकोस", ते म्हणाले, "ती मातृभाषा नाहीय तुझी". - टीकाकारांनो, मित्रांनो, भेटायला येणाऱ्या भावंडा-बिवंडांनो, तुम्ही सगळे मला अंमळ एकटं का सोडत नाही? ..हव्या त्या भाषेत व्यक्त होऊ दया नं मला. मी जी भाषा बोलेन ती माझी होते तिचे विपर्यास, तिच्या वेडया कळा… माझं असतं सारं, फक्त माझं. तिचं थोडं इंग्रजी-थोडं भारतीय असणं विचित्र वाटेल कदाचित, पण ती प्रांजळ असते माझ्याइतकीच 'माणसाळलेली' असते, कळत कसं नाही तुम्हाला? ..ती असते माझ्या सुखांची, अभिलाषांची, माझ्या आशांची अभिव्यक्ती आणि मुख्य म्हणजे तिचा मला उपयोग होतो, कावळ्याला कावकाव किंवा सिंहाला गर्जना उपयोगी पडावी तसा. ती मानवी वाचा असते; त्या म...