गोऱ्यांचं राज्य गेल्यानंतर.. भाग तीन
रस्किन बॉण्ड यांच्या आत्मवृत्तपर लेखनातील काही अंश
आर्थर फिशरच्या सुदैवाने गार्ल बहिणींनी त्याला आश्रय दिला. या अँग्लो-इंडियन, अविवाहिता भगिनी पूर्वी शाळाशिक्षिका होत्या. त्या छोटेखानी बोर्डिंग हाउस चालवत असत. आर्थर त्यांच्या आउटहाउसमधे राहत असे, त्यांची छोटीमोठी कामं करत असे. शिक्षण म्हणाल तर त्याला आपलं नाव तेवढं लिहिता येई, पण त्याच्या हातांत कसब होतं. आयत्यावेळी प्लायवूडची स्वस्तातील शवपेटी बनवण्यात इथल्या दफनयोजकाला आर्थरची बऱ्याचदा मदत होत असे. रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांचा आर्थर लाडका होता. तो मुलांसंगे गोट्या खेळत असे, त्यांना भवऱ्याला गिरकी देण्यास शिकवत असे - मोबाईलवर चालणाऱ्या नंग्यानाचापायी आज हे निरागस पोरखेळ खलास झालेत.
आर्थर मनमिळाऊ स्वभावाचा होता, बाजारातल्या दुकानदारांचं त्याच्याशी चांगलं जमत असे. इकडतिकडच्या गप्पा, थट्टामस्करी करण्यात स्वारी कायम पुढे! 'पिक्चर पॅलेस ' मधे (-भारतातील सर्वांत जुन्या चित्रपटगृहांपैकी एक) अर्धवेळ प्रोजेक्शनिस्ट म्हणूनही तो काम पाहत असे. उलटसुलट दृश्यं दिसली की प्रेक्षक समजून जाई - आर्थरने रिळं लावताना गफलत केली असणार. हिचकॉकच्या फिल्म्सबाबत एकवेळ ठीक होतं, कारण त्यामुळे रहस्याची रंगत वाढायची (- 'रिअर विंडो ' ही संपूर्ण फिल्म उलटी दाखवली गेली पण त्याबद्दल कुणी तक्रार केली नाही. प्रेक्षकांना ती हिचकॉकचीच आणखी एक करामत वाटली!), पण मागल्या दृश्यात वायकिंग्ज ठार झाले आहेत व पुढल्या दृश्यात ते अजुनी लढताहेत हे मात्र काहीसं विचित्र वाटे. मसुरीत येणाऱ्या फिल्म्स अनेकदा अर्धवट वा सदोषपणे कापलेल्या असत, तेव्हा प्रत्येकवेळी या घोटाळ्यास आर्थर जबाबदार नसे.
ख्रिसमस एक-दोन आठवड्यावर आला की आर्थर आमच्या दारात हजर होई, पाठीवर होलीच्या फांद्या वाहून आणलेल्या असत. होलीची सजावट मला आवडते हे त्याला माहित होतं. मी धार्मिक वृत्तीचा माणूस नाही, पण आमच्या दत्तक कुटुंबातील मुलं - राकेश, मुकेश आणि डॉली त्यावेळी शाळकरी वयात होती. कित्येक हिंदू मुलांप्रमाणे या तिघांनाही ख्रिसमस साजरा करण्याची भारी हौस! त्यांना खूष करण्यासाठी मी खोल्या-खोल्यांतून होलीच्या फांट्या लटकावत असे, मग आम्ही पार्टी करत असू.
चमचमत्या रक्तवर्णी फळांनी लगडलेली होली आणल्याबद्दल आर्थरला घसघशीत बक्षीस मिळत असे. आयव्ही कॉटेजमधे राहू लागल्यानंतर सुरुवातीच्या काळात दरवर्षी तो आमच्याकरता होली आणत असे. आणि ती कुठून मिळवायची हे फक्त त्यालाच ठावूक होतं बरं!
मसुरीमधे होलीची झाडं-झुडुपं अभावानंच आढळतात. आर्थरनं मात्र 'कॅमल्स बॅक रोड'मागे एक खास जागा हेरली होती. त्याठिकाणी एका कड्याच्या टोकावर होलीची पुष्कळ झुडुपं उगवत. पहाडी शेळ्या व आर्थरखेरीज कोणालाही तिथवर जाणं अशक्यप्राय होतं. आर्थर उंच कड्यांवर सहजगत्या चढून जायचा. ती जागा, तिथे उगवणारी सर्व होली त्याचीच होती म्हणा ना!
वयानं साठी गाठल्यानंतरही आर्थर आम्हाला होली आणून द्यायचा - अंगानं चपळ होता तो शेवटपर्यंत. मेला तेव्हा तो आपलं गुपित - होली नेमकी कुठे उगवते हे गुपित - स्वतःसोबत घेऊन गेला. कारण इतक्या वर्षांत एकदाही मला होली दिसलेली नाही.
* * *
साऱ्या देशभर 'मागे टाकण्यात आलेले' असे कितीतरी 'स्प्रेड', 'फिशर' होते. त्यांना कोणी वाली नसे, त्यांची काळजी घेणारा कोणी 'गॉडफादर' वा 'फेअरी गॉडमदर' नसे. ही स्मरणिका लिहीत असता मनात त्यांचा विचार येतो; माझी अवस्था त्यांच्याप्रमाणे होता होता राहिली, मी थोडक्यात वाचलो - त्यांच्या कहाण्या मला ही आठवण करून देतात. माझ्यापाशी एक छोटंसं कसब होतं, शब्दांची कला होती व तिचा योग्य तो वापर करण्याची क्षमता होती म्हणून मी नशीबवान ठरलो - अर्थात् 'आभाळातल्या ग्रंथपाला'नंही थोडी कृपा केली म्हणा.
Comments
Post a Comment