गोऱ्यांचं राज्य गेल्यानंतर.. भाग एक

रस्किन बॉण्ड यांच्या आत्मवृत्तपर लेखनातील काही अंश

...१९५० साली माझं शालेय शिक्षण पूर्ण झालं तेव्हा बहुतांश इंग्रज व अँग्लो-इंडियन मुलं शाळा सोडून गेली होती. त्यांचे कुटुंबीय इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंडला स्थलांतरित होत होते. मुस्लिम मुलं (-एकूण विद्यार्थीसंख्येच्या एक तृतीयांश मुलं) १९४७मधे, फाळणीच्या वेळीच निघून गेली होती. सबंध उत्तर भारतात, नव्याने निर्माण झालेल्या पाकिस्तानातही तेव्हा भीषण रक्तपात झाला. ही मुलं शाळेत बरीच लोकप्रिय होती. पैकी बहुतेक जण पठाण होते -  माझे मित्र अजहर व उमरसुद्धा. शिमल्यात जागोजाग दंगे उसळले तेव्हा या मुलांना सैन्याच्या ट्रक्समधून न्यावं लागलं. मुलं सुखरूप आपापल्या घरी पहोचली. त्यांच्या जाण्यानं शाळेत मात्र पोकळी निर्माण झाली. पटसंख्येत एकाएकी घट झाली, तीतून सावरण्यास शाळेला दोन-तीन वर्षं लागली. दरम्यान अनेक शीख मुलं शाळेत दाखल झाल्यामुळे ही पोकळी भरून निघाली. 

अँग्लो-इंडियन परिवारांचे थवेच्या थवे माझ्या मूळ शहरातून म्हणजे डेहराडूनमधून काढता पाय घेत होते. श्रीमंत लोक आपल्या प्रवासाची तजवीज स्वतःच करत. ज्यांना प्रवासखर्च परवडणार नसे ते ब्रिटीश हाय कमिशनकडे 'प्रवासी अनुदाना'करता अर्ज भरू शकत.  आईनं माझ्या वतीने अर्ज केला होता. हाय कमिशनच्या वतीने काम पाहणारे स्थानिक पाद्रीबुवा माझी पडताळणी करण्यासाठी आले.  आईने भारतीय नागरिकाशी विवाह केल्यामुळे मी अनुदानित प्रवासाचा लाभ घेण्यास अपात्र असल्याचा निर्णय त्यांनी दिला. १९५१च्या अखेरीस जेव्हा मी देशाबाहेर निघालो तेव्हा माझा प्रवासाचा खर्च आईनंच केला. 

१९५५ साली मी भारतात परतलो. तुरळक अँग्लो-इंडियन, इंग्रज मंडळी अद्याप डेहऱ्यात राहत होती. काहीजण पुरते कफल्लक झाले होते. सर एडमंड गिब्सनसारख्या काही सुखवस्तू व्यक्तींची टुमटाम होती, त्यांच्यापाशी जमीनजुमलासुद्धा होता. सर एडमंडबाबत सांगायचं झाल्यास डेहराडूनबाहेर त्यांची शेती होती. ते आपली जुनाट मॉरिस मायनर चालवत शहरात येत, 'अॅस्टली हॉल'मधल्या काही दुकानांतून चक्कर मारत. सर एडमंड फारशी खरेदी करत नसत (-ते काम त्यांच्या मॅनेजरचं). दुकानमालकांशी गप्पा करणं त्यांना आवडत असे. 

त्यायोगानेच आमची गाठ पडली. त्यावेळी 'इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया '  मधे माझी 'व्हेग्रंट्स  इन द व्हॅली '  ही कादंबरी नुकतीच क्रमशः छापून आली होती.  'द रूम ऑन द रूफ ' या कादंबरीचा हा पुढला भाग होता. १९५६ साली बीबीजींच्या 'अॅस्टली हॉल' इमारतीतील फ्लॅटमधे राहत असताना मी ती लिहिली होती. इमारतीच्या खालच्या भागात बीबीजींचं किराणामालाचं छोटं दुकान होतं. काहीवेळा हिशेबाच्या कामात मी त्यांना मदत करत असे. याच दुकानात सर एडमंडनी मला हटकलं.
उंचपुरा बांधा, लालबुंद चेहरा, बेल्टनं सावरून घेतलेला पोटाचा पसारा असे ते माझ्यावर वाकून गुरगुरले: "तो लेखक बॉण्ड तूच ना?  काय रे, शाळेत भूगोल-बिगोल शिकलास की नाही? देहराच्या रेल्वेलाइनवर डोईवाला स्टेशन रायवालाच्या आधी लागतं होय? - तसं लिहिलंयस तू." 

मी नक्कीच तसा (किंवा तसलाच काहीतरी) घोटाळा केला होता. मी तोंडभरून दिलगिरी व्यक्त केली आणि ‘यदाकदाचित कादंबरी प्रकाशित झालीच तर चूक सुधारेन’ असा शब्द दिला (- जो मी अजिबात पाळला नाही!). सर एडमंड जरा नरमले. काठेवाड प्रांतात इंग्रज रेसिडेंट म्हणून राहत असताना जामनगरमधे त्यांचा माझ्या आईवडिलांशी परिचय होता असं ते म्हणाले.  काठेवाडमधील त्या दिवसांच्या, तसेच महात्मा गांधींच्या ऱ्हद्य आठवणी त्यांच्या मनात होत्या. एकदा त्यांनी गांधीजींच्या अटकेचं फर्मान सोडलं होतं. गांधीजींशी त्यांची छान गट्टी जमली म्हणे. त्या थोर व्यक्तीकडून आलेली पत्रं सर एडमंडनी जपून ठेवली होती. गव्हर्नरपदी असताना कुणा 'दहशतवाद्या'नं त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचा प्रसंगसुद्धा सांगितला त्यांनी - त्या व्यक्तीनं तीन बार झाडले, तिन्हीवेळा नेम चुकला. 

"ते शस्त्र अगदी फडतूस असावं. किंवा तुमचं नशीब नक्कीच जोरावर असणार,'' मी शेरा मारला.

भारतात स्थायिक होण्याची कल्पना त्यांना रुचली होती. शिवाय  इंग्लंडंधलं हवामान त्यांना नकोनकोसं वाटे. असे हे तिरसट, कुचकट वृत्तीचे सर एडमंड आपल्या भल्यामोठ्या इस्टेटीत दिवस काढत होते.  
भारतातील इंग्रज या मातीत रुजले नाहीत, त्यांनी जमीन कसली नाही. याउलट र्हो डेशिया व दक्षिण आफ्रिकेतील वसाहतवादी प्रचुर संख्येनं तिथेच स्थिरावले. आपणहून बसवलेलं बस्तान मोडण्याची, जीवनशैलीत बदल करण्याची त्यांची बिलकुल इच्छा नव्हती.  पण भारतात स्थानिक रहिवाशांकडेच पुरेशी जमीन नसे, वसाहतवाल्यांची बातच सोडा! देश सोडून जाण्याची वेळ आल्यावर इंग्रजांना आपल्या बंगल्यांचा त्याग करावा लागला फक्त.

अँग्लो-इंडियनांना मात्र (- पूर्वी त्यांना 'युरेशियन्स' म्हटलं जाई) रेल्वेतील, पोलीसदलातील नोकऱ्या गमवाव्या लागल्या. देश सोडून जाण्याचा फारच बिकट पेच त्यांच्यापुढे उभा ठाकला. वृद्धांचे अतिशय हाल झाले. राजपूर रोडपासून थोड्याच अंतरावर राहणाऱ्या एका जोडप्याची ही कहाणी - पन्नास वर्षांहून जास्त काळ ही पतीपत्नी (- दोघं वंशाने इंग्रज, जन्म भारतातला) त्याठिकाणी राहत होती. सोबतीला कोणी नाही. तुटपुंज्या मिळकतीवर घर चाले. ती बागकाम करून जीव रमवत, कधी कुणाच्या अध्यात मध्यात नसत. कोणी त्यांच्या वाटेला जात नसे. देशाला स्वातंत्र्य मिळालं - ती दोघं जाणार कुठं? त्यांना मित्रमंडळी नव्हती, कुटुंब नव्हतं, दूरदेशी कोणी आप्तेष्ट नव्हते. आता तर उत्पन्नाचं साधनदेखील उरलं नाही. थोड्याच काळात त्यांची बचत आटून गेली. बागेत रान माजलं. दोघं आजारी पडली, हिंडणं-फिरणं बंद झालं. 'बॉक्सवाल्या' विक्रेत्यांच्या फेऱ्या थांबल्या. दूध नाही, ब्रेड नाही. वर्षभराहून अधिक काळ वीजबील थकल्यामुळे घरात वीज नाही. हे पतीपत्नी कित्येक आठवडे कोणाच्याच नजरेस पडले नाहीत. एके दिवशी पोस्टमन पत्र-बिल वगैरे देण्यासाठी घरात शिरला तेव्हा त्याला पलंगावर एकमेकांशेजारी पहुडलेल्या अवस्थेत त्यांचे मृतदेह आढळले. त्या दोघांना उपासमारीनं मृत्यू आला होता. 
हे घडलं तेव्हा मी परदेशात होतो. डेहरामधे परतल्यानंतर सायकल चालवताना मी बरेचदा या घरावरून जात असे. एकदा सायकलवरून उतरलो, त्या जागी जरा घुटमळलो. चिटपाखरुदेखील नव्हतं तिथं. मोजकीच फुलझाडं वगळता बागेत सर्वत्र टणटणी व ओसाडी (purple mink) फोफावलेली. मी एक-दोन खोल्यांमधून डोकावलो. आत काही म्हणता काहीच नव्हतं. सर्व फर्निचर गायब होतं. कोणी राहत असल्याची एकही खूण तिथं नव्हती. भुताखेतांच्या शोधात असल्यास माझा सपशेल अपेक्षाभंग झाला होता. ..या जागेवर दुःखाची घनछाया जणू पसरली होती.  अल्पकाळ का होईना दोन माणसं इथं सुखानं नांदली. त्यांच्या शक्तीबाहेर असलेल्या घटनाप्रसंगांनी अखेर त्यांचा घास घेतला. असे हे इतिहासातले अपघात.

पुढे कित्येक वर्षं - तिथं सरकारी कचेरी थाटण्यात येईपर्यंत - हे घर रिकामंच राहिलं. आज तिथल्या व्हरांड्यांत वरिष्ठांकरता फाईल्स, चहा घेऊन जाणाऱ्या चपराशांची लगबग सुरु असते. सत्तर वर्षांपूर्वी याठिकाणी झालेला छोटासा दुःखांत आज कोणाच्याच ऐकिवात नाही.

स्वेच्छेने वा अन्य कारणांनी मागे राहिलेल्या लोकांचं प्रमाण मसुरीच्या हिल स्टेशन्समधे तुलनेनं जास्त होतं.  तरी एकेकाळी काही हजारांत असणारी अँग्लो इंडियनांची संख्या आता रोडावून शेकड्याखाली घसरली होती. सुंदर घरं, मोठाले जमीनजुमले कवडीमोलानं विकण्यात आले अथवा दीर्घकाळापासून इस्टेटीची देखभाल करणाऱ्या चाकरांच्या हवाली केले गेले. मालक लोक जहाजांत बसून समुद्रापार, उभ्या आयुष्यात न पाहिलेल्या 'घराकडे' निघाले होते. काही शाळामास्तर, मिशनरी इथेच राहिले. घरदार नसलेली निराधार, असहाय माणसंदेखील मागे उरली - उदाहरणार्थ डीन स्प्रेड.
या तरुणाला लहानपणीच कुटुंबीयांनी टाकलं होतं. तो मनदुबळा होता, चारचौघांप्रमाणे नोकरी पत्करण्यास अक्षम होता. त्याऐवजी तो 'कबाड़ीं'चं अनुकरण करत असे - हे 'कबाड़ीवाले' दारोदार हिंडून जुनी रद्दी, घरातील फेकून देण्याजोग्या किंवा फुटकळ दरात विकण्याजोग्या वस्तू गोळा करत असत. खांद्यावर पोतं टाकून चाललेला, विक्रीयोग्य अडगळ शोधत दारोदार फिरणारा डीन स्प्रेड हे साऱ्यांच्या सवयीतलं दृष्य होतं. त्याची-माझी पहिल्यांदा ओळख झाली तेव्हा तो तिशीत असावा. पोतंभर सामान गोळा केल्यानंतर तो सात मैलांचा उतार उतरून पायीच राजपूरला जात असे. आपला माल शहरातील एखाद्या भंगार-विक्रेत्याच्या हवाली करत असे. त्या बजबजाटात कुठल्याशा गाळ्याच्या मागल्या खोलीत अंग टाकत असे, स्वस्तातील चहा-बिस्किटं खाऊन राहत असे. 
काहीवेळा लोक डीनला टाकाऊ सामान देऊन टाकत. मी त्याला जुनी मासिकं, रमच्या रिकाम्या बाटल्या देत असे. तो मात्र दारू पीत नसे. त्याच्या धंद्यातील अन्य लोक मुस्लिम होते, दारुबिरूसारखी लत त्यांनी मुळीच खपवून घेतली नसती.

डीन मसुरीच्या रस्त्यांवरून पायपीट करत असता पोरंसोरं त्याच्या पाठी लागत, त्याच्या खोड्या काढत. गोऱ्या कातडीचा, निळ्या डोळ्यांचा डीन आपल्या धंद्यातील इतर लोकांत भलताच उठून दिसत असे - इंग्रज भंगारवाला! पोरं त्याची टर उडवत, तो फिरून त्यांच्या अंगावर ओरडत असे - ही त्याची घोडचूक म्हटली पाहिजे कारण मग पोरं त्याला खडे फेकून मारत.

"मिस्टर बॉण्ड, ही पोरं माझी छेड काढतात, मला दगड मारतात. तुम्ही काहीतरी करा ना!" तो माझ्यापाशी तक्रार करत असे.

"ती निघून जाइपर्यंत इथेच थांब," मी म्हणत असे, "आणि त्यांच्याशी प्रत्युत्तर का बरं करतोस तू? अंधार पडेपर्यंत वाट पहा. हॅट घालत जा डोक्यावर!"

माझ्या सल्ल्यांचा फारसा उपयोग झाला नाही पण डीननं कुठूनतरी सोला-टोपी मिळवली खरी! एकेकाळी इंग्रज अधिकाऱ्यांच्या सरंजामाचा अविभाज्य भाग समजली जाणारी ही टोपी आता कालबाह्य झाली होती. टोपी घालणाऱ्याचा ऊष्माघातापासून बचाव होत नसला तरी क्षेपणास्त्रांपासून त्याला थोडंबहुत संरक्षण मिळत असे - मुलांनी फेकलेले दगड त्यावर आपटून मस्त टपाटप उडून पडत!

१९६०च्या दशकाअखेरपर्यंत डीन स्प्रेड ही वल्ली नेमाने दृष्टीस पडत असे. आपल्या झोपण्याच्या लहानशा खोलीत रात्रभर रक्त ओकून तो मरण पावल्याचं माझ्या कानांवर आलं. पाद्रीबुवांनी गरिबाचा अंत्यविधी (pauper's funeral) पार पाडून त्याला दफन केलं.

* * भाग एक समाप्त * *


Comments