अर्सूला के. लं ग्विन - काही उद्गार

जग सत्कारणी लावायचं असेल; जगाची व जगात व्यतीत होणाऱ्या आपल्या काळाची उधळमाख थांबवायची असेल तर 'या जगात असावं कसं' हे आपण पुन्हा नव्याने शिकून घ्यायला हवं.

जगण्याचं कसब; आपण इथलेच, या विश्वाचेच असल्याचं भान; विश्वाचा एक अंश असण्यातला अत्यानंद या साऱ्यात नित्य जाणीव अंतर्भूत असते - पशुमात्रांशी एक पशू म्हणून, भूतजीवांशी एक जीव म्हणून, पदार्थवस्तूंशी एक पदार्थवस्तू म्हणून आपलं जे सख्य असतं, नातं असतं त्याची जाणीव.

झाडं, नद्या, टेकड्यांना सहचरांच्या, आप्तेष्टांच्या गोतावळ्यात सामावून घेऊ शकलो तर कदाचित आपण त्यांच्याकडे निव्वळ 'नैसर्गिक संसाधनं' म्हणून पाहणार नाही.

मला वाटतं मी अखिल सृष्टीला विषयरूप देण्याचा, तिला आपलं म्हणण्याचा प्रयत्न करतेय, कारण तिला स्वतःवेगळं काढल्याने, तिचं ठोस वस्तूकरण केल्याने आपण कुठे येऊन पडलोत पहा ना! ताब्यात घेणं, पादाक्रांत करणं, पिळवणूक इतकाच फक्त 'आपलं म्हणण्या'चा अर्थ नव्हे.

ही आपणवणूक मन व कल्पनाशक्तीपल्याड मोठी झेप घेण्याशी निगडित असू शकते.

...विज्ञान बाह्यात्काराचं अचूक वर्णन करतं. कविता अभ्यंतराचं स्पष्टवर्णन करते. विज्ञान विवेचन करतं, कविता सूचन करते. दोघेही आपापला प्रवास, आपापले शोध साजरे करतात:

So hills and valleys into singing break;
And though poor stones have neither speech nor tongue,
While active winds and streams both run and speak,
Yet stones are deep in admiration.
Thus praise and prayer here beneath the sun
Make lesser mornings, when the great are done.

- From 'The bird' by Henry Vaughan

फुटतात गिरीघाटदऱ्यांतून गाणी,
पाषाणांना जरी नसे भाषा नसे वाणी,
धावतात वारे, जेव्हा नादतात झरे,
भोर कातळात खोल कौतिक पाझरे
असे चाले चराचरी स्तवन अर्चन
हीन दिन धन्य होई सुदिनामागून 


- हेन्री वॉन, १७व्या शतकातील कवी  ]

वॉनच्या दृष्टीने  'admiration' (कौतिक) म्हणजे ईश्वराच्या दैवी रचनेबद्दल नतभाव; तिचा आनंद लुटणं, तिच्या आल्हादात न्हाणं.  मला उमगलेलं 'admiration' म्हणजे निसर्गतःच दैवी रचनेबद्दल, तिच्यातील असीम संलग्नतेबद्दल (connectedness) नतभाव; तिचा आनंद लुटणं, तिच्या आल्हादात न्हाणं.

आपल्या पवित्र सभाविधीत आपण दगडगोट्यांचं स्वागत करू तेव्हा दगडांच्याही पवित्र सभाविधीत आपलं स्वागत असेल.
 
 
- अर्सूला के. लं ग्विन (Ursula K. Le Guin)
 
 
 
 

Comments