गोऱ्यांचं राज्य गेल्यानंतर.. भाग दोन

 रस्किन बॉण्ड यांच्या आत्मवृत्तपर लेखनातील काही अंश
  
आणखी तो फॉस्टर बाबा - स्कॉटलंडच्या बॉनी प्रिन्स चार्लीचे आपण वंशज असल्याचा त्याचा दावा होता.  'टेल्स ऑफ फॉस्टरगंज ' या सुरस कादंबरीत मी फॉस्टरची कहाणी सांगितली आहे. 'फॉस्टरगंज' म्हणजे खरंतर 'बार्लोगंज', मसुरीतील एक उपनगर आहे ते. फॉस्टर वस्तुतः स्किनर कुटुंबाशी संबंधित होता, इंग्रजांच्या राज्यातील बऱ्यापैकी प्रतिष्ठित असा हा परिवार. मॉसी फॉल्सच्या दिशेने जाणाऱ्या उतारावर फॉस्टरच्या मालकीची थोडीथोडकी जमीन होती. वर्षानुवर्षं व्यसन केल्यामुळे तो शारीरिक व आर्थिकदृष्ट्या पिचला होता. बहुतेकदा तो दारुच्या नशेत तर्र होऊन पडलेला असे. फॉस्टर आपल्या सावत्र बहिणीसोबत राहत असे. तीसुद्धा दारुबाज होती. दोघांमधे 'तसले' संबंध असल्याची बोलवा होती. कालांतराने दोघांनी पुष्कळशी जमीन विकली, घराच्या छतावरचे पत्रे विकले, बरंचसं फर्निचरही विकून टाकलं. शेवटी ती दोघे पूर्वी जिथे तबेला होता तिथे, आउटहाउसमधे राहू लागली. 

तुलनेनं सुस्थितीत असलेल्या अँग्लो-इंडियन्स व भारतीय ख्रिश्चनांनी हालाखीत जगणाऱ्या आपल्या बांधवांच्या मदतीसाठी १९६०च्या दशकात 'बेनेव्होलंट सोसायटी' स्थापन केली. फॉस्टर बंधुभगिनींना पैशाची निकड असल्याचा मुद्दा तिथे बऱ्याचदा मांडण्यात येई व तितक्याच हिरीरीने फेटाळला जाई. 'ते सगळा पैसा दारूत उडवतील' यावर सर्वांचं एकमत होतं. त्यामुळे फॉस्टर्स आपली दारू आपणच गाळायचे. त्यांच्या आनंदोत्सवाच्या या रात्री मग आजूबाजूच्या टेकड्यांतून घुमत असत. फारच कडकी झाली म्हणजे फॉस्टर बाबा दारोदार भटकून ग्लॅडिओलसची कंदं विकत असे. मी त्याच्याकडून थोडे 'कंद' घेऊन मेपलवूडच्या छोट्याशा बगिचात लावले. पालवी फुटल्यानंतर ते 'कांदे' असल्याचं लक्षात आलं. सर एडमंड यांनादेखील एकदा ग्लॅडिओलाय भासवून कांदे विकत घेण्यास फशी पाडण्यात आलं होतं.

१९६९ साली सर एडमंडनी माझ्या घराशेजारील आलिशान बंगला भाडेतत्वावर घेतला, आमचा परिचय नव्याने वाढला. ८६ वर्षांचे असूनही ते चालतेफिरते होते, अपवाद तीव्र चढ-उतारांचा. तीव्र चढ चढून येताना त्यांचा गुरखा नोकर त्यांना पाठीमागून ढकलून आधार देत असे. एकेकाळी इंग्लंडकरता रग्बी खेळणाऱ्या (-त्यांनीच तसं मला सांगितलं होतं) सर एडमंड यांचा धिप्पाड, अवजड देह विनबर्ग शाळेच्या सपाटीजवळून, पाल्पटेशन हिलवरून चढवण्यात येतो आहे, पाठीमागून त्यांचा बुटुकला गुरखा गावातल्या पोरानं म्हैस हाकावी तसा त्यांना ढकलतो आहे - अगदी पाहण्यालायक दृष्य!

सर एडमंड यांनी शेतावरून सुटी घ्यायची असं ठरवलं होतं. शेतात खूप काम होतं असं नव्हे, पण खाली खोऱ्यामधे उकाडा वाढू लागला होता आणि सर एडमंड यांना हवापालटाची गरज होती.

ते अधूनमधून 'ब्लॅकवूड्स' मधे छापून आलेल्या माझ्या एखाद्या कथेबद्दल, लेखाबद्दल चर्चा करण्यासाठी माझ्याकडे येऊन टपकत असत. 'ब्लॅकवूड्स' ही त्याकाळची एक नामांकित साहित्यिक, राजकीय पत्रिका. सर एडमंड तिचे वर्गणीदार होते. नेहेमीप्रमाणेच त्यांना टीका करण्यायोग्य काहीतरी सापडलेलं असे. "या खोऱ्यात आता एकही वाघ शिल्लक नाही," ते म्हणत, "तरीसुद्धा तू मोहंद खिंडीत गिरट्या घालणाऱ्या वाघाचा उल्लेख का म्हणून केला आहेस? आमच्या शेताजवळच आहे तो परिसर."

"तुमची व तुमच्या अगत्यशीलतेची ख्याती वाघोबांच्या कानांवर गेली असेल," मी उत्तर देत असे. असे आमचे गंमतीत टोले-प्रतिटोले चालू असत.

सर एडमंड आणि अगत्यशीलता? छे! ते कधीच कुणाला आपल्या शेतावर किंवा मसुरीतल्या घरी बोलावत नसत. इतरांघरच्या पार्ट्यांची निमंत्रणं स्वीकारण्यास मात्र ते उत्सुक असत - अर्थात पाल्पटेशन हिल चढून येऊ शकले तरच!

पण अहो आश्चर्यम् - एके दिवशी त्यांनी मला ड्रिंक्स घेण्याकरता घरी बोलावलं. आम्ही कानोरीच्या डेरेदार झाडाखाली बसलो. सोडा-व्हिस्कीचे दोन-तीन पेग झाले असतील. मग त्यांनी मला त्यांच्या कविता दाखवल्या.

"तुम्ही कविता करता हे ठाऊक नव्हतं आम्हाला!"

"जित्याची खोड आहे झालं - सीक्रेट खोड!" ते म्हणाले.

मागील कित्येक वर्षांच्या अवधीत लिहिलेल्या कवितांनी ती छोटी वही भरली होती. कविता खरंच खूप चांगल्या होत्या;  काहीशा जॉन बेट्जमेनच्या काव्याची आठवण करून देणाऱ्या - व्यक्तिरत असूनही डोळस, चौकस.

"तुम्ही या कविता प्रकाशित कराव्यात," मी म्हणालो.

"इतकं विशेष काही नाही रे त्यांत. पण त्या करताना मजा आली बघ - हे सर्वात महत्त्वाचं."

होय, तेच  सर्वात महत्त्वाचं असतं - आपल्या कामातून आनंद मिळणं, आपल्या जगण्यातून कविता घडवणं. त्यातून इतरांनाही आनंद मिळाला तर आणखी उत्तम. पण काही गोष्टी खाजगीच राहतात  - काही गोष्टी थेट 'आभाळातल्या ग्रंथपाला'जवळ सांगावयाच्या असतात.

एके दिवशी सर एडमंड यांचा गुरखा धावतपळत आमच्या मुख्य दरवाजात आला. तो मला बोलावत होता, गिब्सन साहेबांची तब्येत अचानक बिघडली होती. मी घाईघाईने त्यांच्या दिवाणखान्यात गेलो.  सर एडमंड आरामखुर्चीत पसरले होते. चेहरा निळाजांभळा पडलेला, हातपायांना आकडी आलेली. त्यांची शुद्ध हरपली होती.

"मला वाटतं त्यांना ऱ्हदयविकाराचा झटका येऊन गेला आहे," मी म्हणालो "त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमधे नेलं पाहिजे." मी धावतच शाळेच्या ऑफिसमधे जाऊन मदत मागितली. विनबर्ग-अॅलन शाळेची व्हॅन हे त्याकाळी या भागातील एकमेव चारचाकी वाहन होतं आणि वेळप्रसंगी ते वापरण्याची सर्वांना मुभा होती. आम्ही कसेबसे सर एडमंडना लंढोर कम्युनिटी हॉस्पिटलमधे घेऊन गेलो पण ते पुन्हा शुद्धीवर आलेच नाहीत. दुसऱ्या दिवशी त्यांच्या इच्छेचा मान राखून डेहराबाहेरील त्यांच्या इस्टेटीत त्यांच्या पार्थिवाचं दहन करण्यात आलं. खाजगीरित्या मृतदेहाचं दहन करणं बेकायदेशीर असल्याने मॅजिस्ट्रेट घटनास्थळी येऊन थडकला. परंतु एव्हाना दहनविधी पार पडल्यामुळे तो कोणतीही कारवाई करू शकला नाही. सर एडमंडनी नेहेमीप्रमाणे आपलं घोडं दामटलं होतं.


* * भाग दोन समाप्त * *


Comments