दुर्गाबाई सांगतात पशुपक्षी व मानवी पाकशास्त्राचं नातं..

विस्मरणात चाललेल्या मराठी पाककृती व एकंदर पाकवैविध्यासंबंधी दुर्गाबाई भागवतांनी लिहिलेले लेख 'खमंग' या शीर्षकाखाली पुस्तकरुपाने संकलित करण्यात आले. पशुपक्षी व मानवी पाकशास्त्राचं नातं दर्शवणारे दोन-तीन दाखले बाईंनी दिलेत. आवर्जून वाचावे:
 
...दोन प्राण्यांनी माणसाच्या पाकज्ञानात भर घातली आहे: अस्वल व माकड. 
दक्षिणेकडे अस्वलं मोठ्या प्रमाणावर आढळतात. हे अस्वल शाकाहारी असतं. त्याचं नाक अतिशय तीक्ष्ण असतं. वसंतात झाडांना फुलं धरली, की अस्वलं हरतऱ्हेची सुवासिक फुलं गोळा करतात. मधाची पोळीदेखील उतरवतात. ही पोळी व फुलं एकत्र करून पायाने वा काठीने तुडवतात. या काल्याला 'अस्वलाचं पंचामृत' म्हटलं जातं. ते अत्यंत पौष्टिक असतं. माणसालाही ते आवडतं, व ते हस्तगत करण्यासाठी अस्वलांची शिकार केली जाते.
 ..अस्वलाने शिकवलेला हा पदार्थ मी (घरी) करून पाहिला. बरीच वासाची फुलं व खूपसा मध घालून मी ते केलं. काहीजण कृत्रिम चवींना इतके सवकलेले असतात, की त्यांना हा पदार्थ रुचला नाही. मी मात्र तो आवडीने खाल्ला.
 
माकडाकडून मानवजातीला मिळालेला अपूर्व पदार्थ म्हणजे बाळंतिणीचा डिंकाचा लाडू! ..आम्ही जंगलात होतो तेव्हा पाहिलं, की मादी माकड बाळंत झाल्यावर नर माकड जंगलात डिंक व मध गोळा करतं, त्याचे ओबडधोबड लाडू वळून ते मादीला खाऊ घालतं. उत्तर प्रदेशात गंगा-यमुनेच्या काठची माकडं चारोळ्या गोळा करून, डिंक व मधात त्या घोळून लाडू बनवतात. अर्थात हे लाडू त्यांच्या बाळंतिणींकरता असतात. पण इथंही शिकारी लोक हे लाडू पळवून त्यांवर ताव मारतात. या लाडवांमधे चारोळ्या टरफलांसकट असतात. टरफलं पचवण्याची ताकद माकडात असते, माणसात नसते.
 
 
पोह्यांशी संबंधित एक लोककथा पाहू:
 
तांदूळ कुटून वा कांडून केलेला प्रकार म्हणजे पोहे. कांडप म्हणजे कष्टाचं काम. ते करताना गाणी गाऊन कांडपिणी आपला श्रमपरिहार करत असत. पोह्यांविषयी प्रचलित लोककथा अशी:
 
 एक कवडा पक्षी (spotted dove) उडत असता 'ना तुंडम्, पंतुंडम्' असा आवाज त्याच्या कानी पडला (- कांडण्याच्या आवाजाचं महाराष्ट्रात उपलब्ध असलेलं हे पहिलं नादमय टिपण). कवडा आवाजाच्या रोखाने गेला व कांडताना उखळाबाहेर उडालेले पोहे त्यानं खाल्ले. त्याला ते चविष्ट लागले.
मग त्यानं पुष्कळ तांदूळ गोळा केला, व घरी जाऊन आपल्या पक्षिणीला तो कांडण्यास फर्मावलं. कांडल्यावर भाताचं काय करायचं हे दोघांना माहित नव्हतं. पक्षिणीने भात कांडून तसाच पक्ष्याला वाढला. त्यात तुसं असल्यानं तो बेचव लागला, पण कवड्यानं तो मुकाट्यानं खाल्ला. 
नंतर कवड्यानं आपली बहीण 'सीता' हिला पोहे करण्यास सांगितलं. सीतेनं सर्व माहिती गोळा करून, पोहे कांडून, पाखडून त्याच्यापुढे ठेवले. बायकोचे ढीगभर पोहे आणि हिचे मात्र मूठभरच! रागाच्या भरात त्यानं ते भिरकावले व बहिणीला ठार केलं. सर्वत्र उडालेल्या त्या पोह्यांतील काही कण त्यानं चाखले व त्याला सीतेची हत्या केल्याचा पश्चात्ताप झाला.
"कवडा आहे पोर पोर पोर, सीतेचे पोहे गोड गोड गोड" असं हा पक्षी अद्याप पुटपुटत असतो म्हणे.
'सीता' पक्षीण परतून आली नाही, तिनं निगुतीनं केलेले पोहे मात्र जमिनीत रुजले, उगवून आले. 
या झाडाची (Utricularia malabarica) फुलं पोह्यांसारखी दिसतात. त्यांना 'सीतेचे पोहे' वा ‘सीतेची आसवं’ म्हणतात.

Comments