नातेेसंबंधांत प्रतिमा-निर्मिती

आपले परस्परसंबंध - कितीही दूरचे वा निकटचे असोत - या संबंधित्वाचा पुरा अर्थ उमगायचा, तर मेंदू प्रतिमा-निर्मिती का करतो हे समजावून घ्यायला हवं, यावर चिंतन व्हायला हवं.
आपण स्वतःबद्दल, इतरांबद्दल मनात प्रतिमा, दृढचित्रं का बाळगतो? स्विस, ब्रिटिश, फ्रेंच इ. म्हणून जर तुमची एक प्रतिमा असेल...या प्रतिमांमुळे आपलं मानवतेबद्दलचं अवलोकन दूषित होतंच, शिवाय त्या माणसा-माणसात फूट पाडतात, नाही का? आणि जिथे विभक्तता, भेदाभेद असेल तिथे संघर्ष उद्भवणारच.

प्रतिमा निर्माणच न करणं मुळी शक्य आहे का? - येतंय लक्षात? घडल्या घटनांची नोंद न ठेवणं; प्रसंग आनंदाचा असो, दुःखाचा असो, त्याचा हिशेब न ठेवणं. निंदा, अपमान, स्तुती... प्रोत्साहन मिळो वा उत्साहभंग होवो... कळतंय? आपल्या दैनंदिन नातेसंबंधांत हे सारं घडत असतं - त्याची नोंद, त्याची गणती न करणं शक्य आहे का?
मेंदू जर स्वतःबाबत घडणाऱ्या हरेक गोष्टीची मनोवैचारिक नोंद ठेवत बसला, तर त्याला निवण्याची, शांतवण्याची फुरसत कधीच लाभत नाही; तो  निरावेग, निशांत होऊच शकत नाही. अहोरात्र घरघरणारी यंत्रणा अखेर झिजून जाते, शिणून जाते - साहजिक आहे. नातेसंबंधांत नेमकं हेच घडत असतं. तेव्हा मनात एकमेकांबद्दल प्रतिमा न स्थापणं शक्य आहे का? 
 
साधंसं तथ्य पहा: तुम्ही माझी निंदा करता, वा प्रशंसा करता - हे ज्ञान, ही जाणीव मनात रहाते. ती जाणीव, ती प्रतिमा मनात बाळगून मी तुम्हाला भेटतो. म्हणजे तुमची-माझी साक्षात् भेट कधी होतच नाही! प्रतिमाच प्रतिमेला भेटत असते. तुमच्या-माझ्यात खरंखुरं नातं नसतंच. ...मी त्या गोष्टींची नोंद घेतली रे घेतली, की तत्काळ प्रतिमा उभी रहाते, आठवण निर्माण होते. हा भूतकाळच मग वर्तमानाला भेटत रहातो.
तेव्हा नातेसंबंधांमध्ये ज्ञानाचं, पूर्वानुभवांचं, परंपरेचं, प्रतिमेचं स्थान काय?
- जे. कृष्णमूर्ती 
 

Comments