मृत्यूशय्येवर... (जर्मन नाटुकले)
* * हे भाषांतर माझे नाही * *
मृत्यूशय्येवर...
मूळ जर्मन लेखिका: मार्टिना बेरानेक
(एक
म्हातारा, मरणासन्न शेतकरी. त्याचं कुटुंब त्याच्या शय्येभवती जमलंय. पलंगाच्या दुसऱ्या टोकाला प्रार्थनेनंतर लावून ठेवलेली मेणबत्ती जळतेय.)
शेतकरी (आवाजात घरघर): मेरी! मेरी, कुठायस तू?
मेरी: इथेच आहे मी, तुझ्याजवळ.
शेतकरी: एलिसा, पोरी, तूसुद्धा आहेस का गं?
एलिसा: होय पपा, ही मी इथे आहे.
(अशातऱ्हेनं
शेतकरी घरातल्या प्रत्येक माणसाचं - सात मुलं, मोलकरीण, घरगडी - नाव घेऊन तोच-तो प्रश्न विचारतो. सगळ्यांची उत्तरं आल्यावर ताडकन् उठून बसतो.)
शेतकरी: सगळे इथे आहेत?? मग कामाचं कोण बघतंय?!
मेरी (त्याला पुन्हा झोपवत): अरे, असं काय करतोस! या घडीला आम्ही तुझ्याचजवळ असायला हवं की नाही?
शेतकरी: छे छे. काही गरज नाही. तुमची गरज आहे तिथे शेतावर.
मेरी: ठीक आहे. (इतरांना उद्देशून) चला, सगळे आपापल्या कामाला जा.
(सगळे जातात. फक्त मेरी तिथे थांबते.)
शेतकरी:
आता मी अतिशय थोड्या वेळेचा सोबती आहे. मेरी, आता तरी खरं खरं सांग.
आपल्या मुलांपैकी तो लाल केसांचा बेपेर्ल, तो काही तुला माझ्यापासून झालेला
नाही, हो ना? इतर सर्वांचे केस काळे किंवा करडे आहेत, बेपेर्लचेच
तेवढे लालसर आहेत. खरं सांग, तो माझा मुलगा नाही ना?
मेरी: शांत हो. मनाला कसलातरी घोर लावून घेऊ नकोस. ...खरं सांगायचं तर बेपेर्लच तेवढा 'तुझा' आहे.
शेतकरी: फक्त तोच?!! आणि बाकीचे??
मेरी: या घटकेला असल्या गोष्टी जाणून घेऊन काय करणारेस!
शेतकरी: अरेरे! बेपेर्ल....माझा बेपेर्ल! मी त्याच्यावर नेहेमी अन्याय केला कारण मला वाटायचं की... बोलाव, बोलाव माझ्या बेपेर्लला.
मेरी: (दाराशी जाऊन हाक मारते) बेपेर्ल गोठ्यात असेल. त्याला इकडे पाठवून द्या!
(घराबाहेरून) आवाज: पाठवतो, पाठवतो.
शेतकरी: मेरी, मी गेल्यावर निदान वर्षभरतरी थांब बरं का. लगीनघाई करू नकोस!
मेरी: हो, हो. थांबेन ना मी.
शेतकरी: तो विमर एरीष, त्याच्याशी अजिबात लग्न करू नको. रानटी आहे तो.
मेरी: बरं. नाही करणार त्याच्याशी -
शेतकरी: - आणि त्या ब्रांडाउरशीसुद्धा नको.
मेरी: पुरे आता. आमचं आम्ही बघून घेऊ नंतर.
(बेपेर्ल आत येतो)
शेतकरी: बेपेर्ल, माझ्या पोरा, माझ्या बछड्या.. मी तुला नीट वागवलं नाही रे.
बेपेर्ल: राहू द्या, पपा.
शेतकरी: एवढ्या-तेवढ्यावरून तुझ्यावर हात उगारला...
बेपेर्ल: राहू द्या ते, पपा.
शेतकरी: पण आज मी या चुकीची भरपाई करतो. सगळं बदलून टाकतो -
बेपेर्ल: ठीक आहे पपा.
शेतकरी: - माझी सगळी मालमत्ता तुझ्या नावे करून टाकतो.
बेपेर्ल: ठीक आहे पपा.
शेतकरी: मेरी, मला जरा कागद वगैरे दे गं. मी नवं मृत्यूपत्र बनवणार आहे.
मेरी: देते हं. (बेपेर्लला-) जा, तू कामाला लाग. पपा लिहील त्याला काय लिहायचं ते.
बेपेर्ल: ठीक आहे ममा (जातो).
मेरी:
(कागद व लेखणी घेऊन येते. पलंगाच्या एका टोकाशी घोटाळत-) समजा मी तुला सत्य सांगितलं नसेल, तर? बेपेर्ल 'तुझा' नाही, हे खरं असेल तर?
शेतकरी: आं? असं काय बोलतेस तू? इथे माझी घटका भरत आलीय अन् तू मला अशी गोंधळात टाकतेयस? काय करावं मी?
मेरी: सारंकाही माझ्या नावानं करून दे. ज्याच्या-त्याच्या पात्रतेप्रमाणे मी वाटून देईन सगळ्यांना. हेच उत्तम, काय?
शेतकरी: असं का? ...खरंय म्हणा. तेच उत्तम. पण मला सत्य कळणार तरी कधी?? खरं काय ते जाणून घेण्यासाठी तळमळतोय मी!
मेरी: कळेल ना तुला. मी मरून स्वर्गात आले नं, की सग्गळं सांगेन तुला.
शेतकरी: हम्म. म्हणजे मला ते कधीच कळणार नाही तर.
Comments
Post a Comment