ओळख

 'ओळख' (An introduction)
 
 कमला दास (Kamala Das / Kamala Surayya / Madhavikutty)
 

राजकारणातलं फारसं कळत नाही, पण सत्तेत असणाऱ्यांची नावं ठाऊक आहेत मला,
आणि ती आठवडयाच्या वारांसारखी किंवा महिन्यांच्या नावांसारखी घोकू शकते मी,
अगदी नेहरूंपासून.

मी भारतीय, दाट सावळी, मलबारमधे जन्मलेली
तीन भाषा बोलणारी, दोनांत लिहिणारी, एकीत स्वप्नं पाहणारी.
"इंग्लिशमधे लिहू नकोस", ते म्हणाले, "ती मातृभाषा नाहीय तुझी".
- टीकाकारांनो, मित्रांनो, भेटायला येणाऱ्या भावंडा-बिवंडांनो,
तुम्ही सगळे मला अंमळ एकटं का सोडत नाही?
..हव्या त्या भाषेत व्यक्त होऊ दया नं मला.
मी जी भाषा बोलेन ती माझी होते
तिचे विपर्यास, तिच्या वेडया कळा… माझं असतं सारं, फक्त माझं.
तिचं थोडं इंग्रजी-थोडं भारतीय असणं विचित्र वाटेल कदाचित, पण ती प्रांजळ असते
माझ्याइतकीच 'माणसाळलेली' असते, कळत कसं नाही तुम्हाला?
..ती असते माझ्या सुखांची, अभिलाषांची, माझ्या आशांची अभिव्यक्ती
आणि मुख्य म्हणजे तिचा मला उपयोग होतो,
कावळ्याला कावकाव किंवा सिंहाला गर्जना उपयोगी पडावी तसा.
ती मानवी वाचा असते; त्या मनाची वाचा जे 'तिथं कुठेतरी' नसून 'इथं' असतं
असं मन, जे बघू-ऐकू शकतं; ज्याच्या जाणीवा जाग्या असतात.
वादळात सापडलेल्या झाडांची
किंवा पावसाळी ढगांची
किंवा पावसाची
ती बेफिकीर, बधिर बडबड नव्हे,
की धगधगत्या चितेची असंबद्ध पुटपुट नव्हे.

मी लहान होते आणि मग एकदम् त्यांनी सांगितलं की मी मोठी झालेय
का, तर माझी उंची वाढली, हातापायांचा आकार वाढला
शिवाय एक-दोन जागी केस फुटले म्हणून.
दुसरं काय मागावं ते ठाऊक नसल्यानं जेव्हा मी 'प्रेम' मागितलं,
तेव्हा त्यानं या सोळा वर्षांच्या मुलीला बेडरूममधे ओढून नेलं आणि दार लाऊन टाकलं
त्याने मला मारलं नाही, तरी माझ्या बिच्चाऱ्या 'बाईच्या देहा'ला पार झोडलं गेल्यागत वाटलं
माझ्या स्तनांच्या आणि गर्भाशयाच्या ओझ्याखाली दबली गेले मीच…
स्वतःचीच कीव वाटून स्वतःला आकसून घेतलं मी.
मात्र त्यानंतर.. मी शर्ट घातला, भावाची पँट चढवली
केस आखूड कापले आणि दुर्लक्षच करून टाकलं स्वतःच्या स्त्रीत्वाकडे.
"अगं साडया नेस, जरा मुलीसारखी वाग, बायको हो कुणाची", ते म्हणाले
".. भरतकाम करणारी, स्वयंपाक करणारी, नोकरांशी वाद घालणारी..
जुळवून घे जरा स्वतःला! सामाव की कुठेतरी!", वर्गीकरणवादी खेकसले.
"नुसती भिंतींवर बसून राहू नकोस,
आमच्या जाळीदार पडदयांआडच्या खिडक्यांमधून आत डोकावत जाऊ नकोस!
'आमी' हो, नाहीतर 'कमला' हो; किंवा त्याहीपेक्षा बरं म्हणजे सरळ 'माधवीकुट्टी' हो.
- ही वेळ आहे एक नाव, एक भूमिका निवडण्याची.
नसते बहाणे करू नकोस.
..भ्रमिष्ट, लंपट असल्यासारखी काय वागतेस!
प्रेमात फसवली गेल्यावर लाज निघेल इतक्या मोठयाने गळा कसला काढतेस!…."

मी एका माणसाला भेटले, त्याच्यावर प्रेम केलं
- त्याला कुठल्याच नावाने पुकारू नका
..तो कुणाही अन्य पुरुषासारखा आहे ज्याला स्त्री हवी असते
जशी मी, कुणाही अन्य स्त्रीसारखी, प्रेमाच्या शोधात असते.
त्याच्याठायी.. नदयांची व्याकुळ अधीरता.
माझ्याठायी.. सागराची उदंड प्रतीक्षा.

"कोण आहेस तू?" - मी प्रत्येक अन् प्रत्येकाला विचारते
त्यावर उत्तर येतं, "हा 'मी' आहे."
जिथेतिथे, सगळीकडे मला जो-तो स्वतःला 'मी' म्हणताना दिसतो.
या जगात करकचून आवळला गेलाय तो, म्यान केलेल्या तलवारीसारखा.
'मी'च असतो परक्या शहरांतल्या हॉटेल्समधे एकटाच 'घेत' बसणारा;
रात्री बारा-बारा वाजेपर्यंत पीत बसलेला.
'मी' खिदळणारा, 'मी'च प्रणयधुंद होणारा नि मग लाजेने चूर होणारा
पापी 'मी', पुण्यात्माही 'मी'च
'मी'च तो, घशात काही अस्फुट असताना निपचित मरून पडलेला.
ज्यावर प्रेम केलं जातं अन् ज्याची प्रतारणाही होते तो 'मी'.
…माझी अशी कुठलीच सुखं नाहीत जी तुमची नाहीत
अशा कुठल्याच व्यथा नाहीत ज्या तुमच्या नाहीत
- मीसुद्धा स्वतःला 'मी' म्हणते ना.



Comments