Posts

Showing posts from 2024

नेरूदाची एक कविता

Image
भाषांतराची गोष्ट: चिले देशातील स्नेहल डोळ्यांचा गब्बू पाब्लो नेरूदा यानं लिहिलेल्या ‘A callarse’ (आ काय्यार्से) या स्पॅनिश कवितेचं मी केलेलं हे मराठी भाषांतर.   'हाकारा' या द्विभाषक मासिकानं हे भाषांतर छापताना त्यात मला न कळवता परस्पर काही बदल केले. या बदलांना आक्षेप घेतल्यामुळे 'मौन ०.१ ' या त्यांच्या २१ व्या अंकात प्रसिद्ध केलेली ही कविता त्यांनी काढून टाकली, व अखेर स्वतःच्या ब्लॉगवर ती हवी तशी प्रसिद्ध करण्यास मी मोकळी झाले! अ‍ॅलास्टर रीड कृत इंग्रजी भाषांतर केंद्रस्थानी ठेवून मी हे भाषांतर केलं. याखेरीज इंटरनेटवर आणखी माहिती वाचली.   स्पॅनिश भाषेच्या शिक्षिका व भाषांतरकार सौ. नीना गोडबोले यांनी मूळ भाषेतून ही कविता मला ऐकवली, तीवर चर्चा केली, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.   मूळ स्पॅनिश कविता आणि संदर्भादाखल वापरलेली तिची निवडक इंग्रजी भाषांतरं खालील वेबसाइट्सवर पहावी:   https://mindfulness-of-nature.com/2018/06/the-silence-of-the-wild/   https://blognostrumuva.wordpress.com/2020/03/25/pablo-neruda-a-callarse-keeping-still/       स्वस्थ बसण्याविषयी:    पाब्लो नेर

बाह्य प्रोत्साहनाची आस (in Marathi and English)

Image
  * ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *     (दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जे. कृष्णमूर्तींच्या दैनंदिनीतून)   R.M. म्हणाला: "मला जग समजून घ्यावंसं वाटतं, त्याचबरोबर जगानंही मला समजून घ्यावं असं वाटतं. मी कलावंत आहे, चित्रकार आहे. मी सर्जन करतो. माझं सर्जन, माझ्या निर्मितीला दाद मिळावी असं मला वाटतं." वृत्तपत्रादी माध्यमांनी, लोकांनी आपल्यावर सतत टीका करू नये, प्रोत्साहनपर चार शब्दही उद्गारावे. कलावंत निव्वळ स्वतःसाठी जगत नाही, तो इतरांसाठीही जगतो...असं बरंच काही सांगत गेला R.M.  'जगाला समजून घ्यावंसं मला वाटतं, पण त्याचबरोबर जगानंही मला समजून घ्यायला हवं' हाच त्याच्या बोलण्याचा गोषवारा होता.   आम्ही आणखी काही वेळ बोलत राहिलो. तो मला आपल्या जीवनाविषयी, अडी-अडचणींविषयी, संदिग्धतांविषयी सांगत होता. जगाला समजून घेण्याची सहजप्रेरणा व जगानं आपल्याला समजून घ्यावं ही इच्छा, या दोहोंवर R.M. चा समान भर होता - ही घोडचूक असते, याकडे मी लागलीच त्याचं लक्ष वेधलं. कारण आपण जगाला समजून घेणं सर्जनात्म असतं, मात्र जगानं आपल्याला समजून घेणं निव्वळ तु

कमलतारा - एक ब्राझिलियन लोककथा

Image
  * ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *   वनस्पतितज्ञ प्रा. हेमा साने यांच्या 'कमळ' नामक पुस्तिकेत राजकमळाबद्दल (जायंट वॉटर लिली - Victoria amazonica / Victoria regia) सुरस माहिती वाचायला मिळते. डुंगी च्या (छोटी होडी) आकाराची अजस्र पानं हे या कमळाचं मुख्य वैशिष्ट्य. पानाचा व्यास दोन मीटरहून अधिक, जाडी जवळपास एक ते दोन मिलिमीटर, आणि वाढीचा वेग ताशी एक इंच! पूर्ण वाढलेलं राजकमळाचं पान सहाशे ते सातशे चौरस फूट भरतं. शिरा व बरगड्यांमुळे निर्माण झालेली जाळीदार नक्षी पानाच्या खालच्या भागाला शोभा आणते.      न मोडता, न वाकता हे प्रचंड पान १०० ते १२५ किलो वजन पेलू शकतं! कमळाचं परागण भुंग्यांमार्फत होतं. ज्या रात्री फूल उमलतं त्या रात्री त्याचा रंग धवल असतो. दुसऱ्या दिवशी त्यावर सुरेख गुलाबी रंग चढतो.     सानेबाईंनी ब्राझीलमधील टुपी-ग्वारानी समाजात या फुलाविषयी प्रचलित असलेल्या लोककथेचा उल्लेख केला आहे, ती अशी: दूरवरच्या टेकड्यांवर चंद्रदेव दिसतो. रात्री तो आपल्या प्रियतमांबरोबर भटकंती करतो. पृथ्वीवरील कुणी सुंदर स्त्री त्याच्या नजरेत भरली, तर तिला तो जादू

चिं. वि. जोशींच्या लिखाणात फक्त विनोद नव्हता...

Image
***प्रस्तुत लेखन माझे नाही व त्याद्वारे कोणत्याही स्वरूपात मोबदला मिळवण्याचा माझा हेतू नाही ***  * ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *     चिं. विं.च्या "आमचा पण गांव " (प्रथम प्रथमावृत्ती : १९५२, कॉन्टिनेन्टल प्रकाशन) या पुस्तकातील उतारा:    ......आम्ही परत घरी  येण्यास निघालो; थोड्याच वेळात अंधार पडणार होता. हरणगावात स्थानिक स्वराज्य अथवा नगरपालिका नव्हती, त्यामुळे रस्त्यात रात्री दिवे नसत. त्यातून ते दिवस घासलेटाच्या टंचाईचे आणि ब्लॅकआऊटचे (दुसऱ्या महायुद्धाचे) असल्याने नगरपालिका असती तरी तिने काय दिवे लावले असते म्हणा! आम्ही बाहेर पडून चार पावले गेलो नाही तोच उलट बाजूने गावातील गायी-म्हशींचा जंगी कळप येऊन त्याने सगळी वाट अडवून टाकली होती म्हणून आम्ही बाजूस उभे राहिलो. गाई येताना विशिष्ट जागेशी थबकून भुईवरचा एक काळा पदार्थ हुंगून तो टाळून जात होत्या. आम्ही न्याहाळून पाहिले, तेव्हा दिसले की ते एक महिन्याहून कमी वयाचे कुत्र्याचे पिलू आहे. आपल्या दोन्ही बाजूंनी एक-सारख्या पसार होणाऱ्या त्या प्रचंड प्राणसंकटाने ते पिलू घाबरून कापत होते. शेपूट

अवचिता परिमळु

*हा ललितलेख एका दिवाळी अंकात वाचला. मनाला भावला. त्यातील काही अंश. सदर लेखनावर स्वामित्व हक्क सांगण्याचा, वा त्यापासून कोणतेही आर्थिक-व्यावसायिक लाभ मिळवण्याचा माझा हेतू नाही.   ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *   अवचिता परिमळु    राणी दुर्वे   आडवाटेचा महाराष्ट्र पाहण्याच्या हौसेपायी सुखाचा जीव दुःखात घालून प्रवासाला निघालो होतो. दिवसभराच्या एस.टी.च्या प्रवासाने अंग आंबल्यासारखे झाले होते. संध्याकाळ होत आली होती. एकदाचा प्रवास संपावा आणि कुठेतरी जाऊन पडावे इतकीच इच्छा उरली होती. एस.टी.चा कुबट वास आणि त्यात मिसळलेले अनेक वास... पोटात ढवळत होते.    माळशेज घाट पार करून एका ठिकाणी एस.टी. थांबली. बस थांबताच धडपडत आम्ही बाहेर पडलो. श्वास भरून आधी मोकळी हवा पिऊन घेतली. खेड्याचे नाव आता आठवत नाही. ऑफिसमधल्या एका माणसाच्या ओळखीने एक पत्ता मिळाला होता. तिकडची वाट धरली. घर गाठले. चांगले नांदतेगाजते शेतकऱ्याचे घर होते. संध्याकाळच्या उजेडात एखाद्या चित्रासारखे दिसत होते. गायीगुरे, मोकळी बैलगाडी, बकऱ्या, कोंबड्या, मुले-माणसे सगळे साजरे होते. आम्ही येणार असल्याची

मराठी शब्दांबाबत विलास सारंग म्हणतात:

Image
  * ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *     मराठीतील चांगले चांगले शब्द आता दृष्टिआड होत आहेत. यात वृत्तपत्रांची जबाबदारी आहेच; वृत्तपत्रं रूढ, धोपटमार्गी शब्द वापरतात. यात त्यांचा दोष नाही. वाचकाला जे समजेल, सवयीचे असेल अशा मर्यादित शब्दभांडारावर वृत्तपत्रांचा गाडा चालतो. वाचकांना तसदी नको असते. तेच ते शब्द पुन्हा पुन्हा वाचण्याची प्रवृत्ती असते. या परिस्थितीत उत्तमोत्तम, समर्पक शब्द बिनवापरामुळे नाहीसे होत आहेत. सामाजिक बदलाच्या रेट्यामुळे लोक काही शब्द वापरायला घाबरतात. निरुपद्रवी शब्द वापरण्याकडे पत्रकार-लेखकांचा अप्रत्यक्षपणे कल असतो. मी मागेही सांगितलं आहे की ही प्रवृत्ती घातक आहे. नेणीवेतील (unconscious) भावना व दृष्टिकोन जितक्या प्रमाणात प्रकाशात येतील तितकं आपलं गंडग्रस्त (neurotic) मन मोकळेपणाने श्वास घेऊ शकेल. सांस्कृतिक स्वातंत्र्याचा हा एक मार्ग आहे. सरकारी भाषेत, व्यासपीठावरून केलेल्या भाषणात स्वातंत्र्याचा फक्त देखावा असतो. आपलं अनकॉन्शस मन जुन्या सवयी सोडायला तयार नसतं. कॉन्शस व अनकॉन्शस (जागृत व सुप्त मन) यांमधे आपल्या समाजात कमालीच

ज्युलिआं

* ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *       ज्युलिआं   मुक्ता 'असरार'   ती जागी झाली तेव्हा दुपार कलली होती. उन्हाचा उभा आयत खिडकीतून आत आला होता. छतापासून डागडुजीला आरंभ केल्याप्रमाणं जुनाट वॉलपेपर उजळवत हा पट्टा पलंगात उतरला होता. उन्हात माखलेल्या पावलाकडे, नखांच्या अस्फुट तकतकीकडे पहात ती जागीच पडून राहिली.    कॅबरेत गाऊ लागल्यापासून सकाळ होताना पाहणं दुरापास्त होतं, त्यावेळी ती गाढ झोपेत असे. मोठ्ठ्या पंपांतून रस्त्यांवर पाणी मारणारे स्वच्छता कर्मचारी, दुचाकी उडवत जाणारे पेपरवाले, गल्लीच्या तोंडाशी एखादा 'शुमान' लाँड्री ट्रक थांबल्यानं ट्रॅफिकला बसणारं बूच, त्यावरून होणारी बाचाबाची, चामडी दप्तरं एकमेकांवर उगारत धावणारी शाळकरी पोरं, हिवाळ्यात स्वच्छ ऊन पडल्यास 'काफे कोसार'बाहेर पत्ते कुटत बसणारे म्हातारे... तिच्या जाणिवेत या दृष्यांना अस्तित्व उरलं नव्हतं - तसं पाहता त्यामुळं काही बिघडत नव्हतं. सकाळ रोजच उगवत होती, दुपारही होत होती. दुपारभर आन्हिकं, घरगुती कामं, खरेदीबिरेदी उरकून संध्याकाळी ती कॅबरेत पहोचत असे. ही चाकोरी म