चिं. वि. जोशींच्या लिखाणात फक्त विनोद नव्हता...
***प्रस्तुत लेखन माझे नाही व त्याद्वारे कोणत्याही स्वरूपात मोबदला मिळवण्याचा माझा हेतू नाही***
* ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *
चिं. विं.च्या "आमचा पण गांव " (प्रथम प्रथमावृत्ती: १९५२, कॉन्टिनेन्टल प्रकाशन) या पुस्तकातील उतारा:
......आम्ही
परत घरी येण्यास निघालो; थोड्याच वेळात अंधार पडणार होता. हरणगावात
स्थानिक स्वराज्य अथवा नगरपालिका नव्हती, त्यामुळे रस्त्यात रात्री दिवे
नसत. त्यातून ते दिवस घासलेटाच्या टंचाईचे आणि ब्लॅकआऊटचे (दुसऱ्या
महायुद्धाचे) असल्याने नगरपालिका असती तरी तिने काय दिवे लावले असते म्हणा!
आम्ही
बाहेर पडून चार पावले गेलो नाही तोच उलट बाजूने गावातील गायी-म्हशींचा
जंगी कळप येऊन त्याने सगळी वाट अडवून टाकली होती म्हणून आम्ही बाजूस उभे
राहिलो.
गाई
येताना विशिष्ट जागेशी थबकून भुईवरचा एक काळा पदार्थ हुंगून तो टाळून जात
होत्या. आम्ही न्याहाळून पाहिले, तेव्हा दिसले की ते एक महिन्याहून कमी
वयाचे कुत्र्याचे पिलू आहे. आपल्या दोन्ही बाजूंनी एक-सारख्या पसार
होणाऱ्या त्या प्रचंड प्राणसंकटाने ते पिलू घाबरून कापत होते. शेपूट खाली
घालून जवळून जाणाऱ्या गाईजवळ ते आपल्या केविलवाण्या मुद्रेने प्राणयाचना
करत होते आणि त्या गायी त्या इवल्याशा जिवाच्या प्रार्थनेला मान देऊन
त्याच्या केसालाही धक्का न पोचविता ते उभे असलेली जागा टाळून आपल्या वाटेने
जात होत्या; तथापि दोन-तीन चोंबड्या वासरांनी जाता जाता त्याचा वास
हुंगण्यास कमी केले नाही.
'फार हुष्षार जनावर गाय, त्या कुत्र्याच्या बच्याला बचावून चाललं आहे.' नारायणने गोमातेची प्रशंसा केली.
गायींचा
कळप संपून म्हशींची पलटण सुरू व्हावयाच्या आत त्या पिलाला ओढून घेण्याचा
आम्ही यत्न केला, पण तो सिद्धीस गेला नाही. गायींपेक्षा अधिक काळेकुट्ट आणि
प्रचंड प्राणसंकट पाहून ते पिलू अधिकच घाबरले. आघाडीच्या म्हशीने त्याचा
वास घेऊन तो एक जिवंत प्राणी असल्याविषयी खात्री करून घेतली आणि मग ती
कुत्र्याच्या चार बाजूस आपले चार पाय रोकून त्याला पोटाखाली घेऊन राखण करत
उभी राहिली. पन्नास-पाउणशे म्हशी आणि पारडे त्या म्हशीच्या पाठीला घासून
गेली, पण कुत्र्याच्या अंगाला धक्का लागला नाही. सर्व गुरांच्या मागोमाग ती
रक्षणकर्ती म्हैस पुनः एकदा कुत्र्याच्या पिलाला हुंगून आपले काम पुरे
झाले आहे असे पाहून चालू लागली.
मठ्ठ
समजल्या जाणाऱ्या गुरांच्या ठिकाणीसुद्धा लहान असहाय प्राणाचे रक्षण
करण्याविषयी इतकी कळकळ असलेली पाहून आम्हांला धन्यता वाटली. आम्ही आपल्या
वाटेने निघालो: पाच मिनिटे जीवितसंशयात काढिलेले कुत्रे सुटकेचा निःश्वास
टाकीत रस्त्याच्या मध्यभागीच उभे होते. इतक्यात समोरून एक लष्करी
मोटार-लॉरी पोंगा वाजवीत बेदरकारीने आमच्या बाजूस येताना पाहून
कुत्र्याच्या जिवाची काळजी वाटून आम्ही इंग्रजी आणि हिंदी भाषांत
'कुत्र्याला वाचवा' अशा अर्थाच्या आरोळ्या ठोकल्या. त्याकडे लक्ष न देता
लॉरीवाल्यांनी त्या पिलाच्या अंगावरून खुशाल गाडी नेली. कुत्र्याने शेवटची
किंकाळी फोडून पाव मिनिट तडफड करून प्राण सोडला.
हा
सर्व देखावा माझ्या मनःचक्षूंपुढे वारंवार उभा राहतो आणि जेव्हा जेव्हा
मानवतेचे स्तोम माजविणाऱ्या बाता मी ऐकतो तेव्हा तेव्हा गुरांनी
काळजीपूर्वक जतन केलेल्या आणि माणसांनी उद्दामपणे बेदरकारीने चाकाखाली
चिरडून ठार केलेल्या त्या चिमुकल्या जिवाची आठवण होते.
आम्हा
तिघांना त्या रात्री जेवण गोड लागले नाही. निजेपर्यंत आम्ही सर्व मंडळी
मनुष्याची क्रूरता, लष्करी शिपायांचे अत्याचार, गूराढोरांचा शहाणपणा यांवर
गप्पा मारीत होतो.
Comments
Post a Comment