अवचिता परिमळु
*हा ललितलेख
एका दिवाळी अंकात वाचला. मनाला भावला. त्यातील काही अंश.
सदर लेखनावर स्वामित्व हक्क सांगण्याचा, वा त्यापासून कोणतेही
आर्थिक-व्यावसायिक लाभ मिळवण्याचा माझा हेतू नाही.
ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *
अवचिता परिमळु
राणी दुर्वे
आडवाटेचा
महाराष्ट्र पाहण्याच्या हौसेपायी सुखाचा जीव दुःखात घालून प्रवासाला
निघालो होतो. दिवसभराच्या एस.टी.च्या प्रवासाने अंग आंबल्यासारखे झाले
होते. संध्याकाळ होत आली होती. एकदाचा प्रवास संपावा आणि कुठेतरी जाऊन
पडावे इतकीच इच्छा उरली होती. एस.टी.चा कुबट वास आणि त्यात मिसळलेले अनेक वास... पोटात ढवळत होते.
माळशेज
घाट पार करून एका ठिकाणी एस.टी. थांबली. बस थांबताच धडपडत आम्ही बाहेर
पडलो. श्वास भरून आधी मोकळी हवा पिऊन घेतली. खेड्याचे नाव आता आठवत नाही.
ऑफिसमधल्या एका माणसाच्या ओळखीने एक पत्ता मिळाला होता. तिकडची वाट धरली.
घर गाठले. चांगले नांदतेगाजते शेतकऱ्याचे घर होते. संध्याकाळच्या उजेडात
एखाद्या चित्रासारखे दिसत होते. गायीगुरे, मोकळी बैलगाडी, बकऱ्या,
कोंबड्या, मुले-माणसे सगळे साजरे होते. आम्ही येणार असल्याची वर्दी त्या
घरी आधीच मिळालेली होती. आख्खे कुटुंब अंगणात जमा झाले होते. अंगणातल्या
हौदात पाण्याची मनगटाएवढी धार पडत होती. एस.टी.च्या कुबटपणातून बाहेर पडून
आल्यावर पाण्याच्या नुसत्या दर्शनानेच सुख वाटले. धबाबा पाणी तोंडावर मारले
आणि जीव सुखावला.
घरातल्या
लोकांनी अगत्याने आमची सोय लावली. आंघोळी झाल्या. चुलीवरच्या सुग्रास
अन्नाने पोट भरले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून चालायला सुरुवात करायची होती.
गडबडीने आमच्या झोपण्याची व्यवस्था केली गेली. अंथरूणावर पडल्याक्षणीच झोप
लागली.
रात्री
मधेच कधीतरी मला जाग आली. आमच्यामधूनच मंदपणे घोरण्याचे आवाज येत होते.
सहज म्हणून उशागतीच्या खिडकीचे दार ढकलले. अवचितच विलक्षण सुगंधाची एक लाट
आली. एकीनंतर दुसरी आणि दुसरीनंतर तिसरी. जाग-झोपेच्या सीमारेषेवर खिडकीतून
बाहेर दिसणारे दृष्य स्वप्नागत धूसर होते. मात्र शेणाने सारवलेल्या,
मातीच्या भिंती असलेल्या त्या खोलीत एक दैवी सुगंध दरवळत होता. अजून तसा
रात्रीचाच प्रहर होता. चांदीसारखा पसरलेला उजेड शेतावर. आपण काय अनुभवतो
आहोत हे खिडकीच्या गजांतून नीटसे उमजत नव्हते. पण सुगंधाच्या कोंदाटण्याने
मन आनंदाने वेडावल्यासारखे झाले.
घराच्या
नक्की कोणत्या भागात झोपलो होतो, ते झोपताना समजले नव्हते. धुंदीत
असल्यासारखी मी दारापाशी आले, लाकडी कोयंडा काढला, आणि समोर दिसणारे दृश्य
डोळे विस्फारून पहातच राहिले. बाहेर टिपुर चांदणे पडले होते. मंद वारा होता
आणि त्या वाऱ्यात समोर निशिगंधाचे विस्तीर्ण शेत डोलत होते. संध्याकाळभर
तिथे वावरलो. पण घराच्या बाजूला असलेले ते शेत निशिगंधाचे होते हे लक्षात
आले नाही; आणि आता रात्रीच्या प्रहरी निशिगंधाने आपले सारे सौष्ठव पणाला लावत मला उठवले.
नजर
पोचणार नाही इतक्या दूरवर फुलेच फुले. एकेक पांढरीशुभ्र लांबच लांब
फुलांची पात. सौंदर्याने मुसमुसलेली. सुगंधाने बेफाम झालेली. चांदण्यांत
चांदण्यांसारखीच उजळलेली. जणू स्वर्गच जमिनीवर अवतरला. सैंदर्य आणि
सुगंधाचा तो मिलाफ अनुभवत मी किती काळ तिथे उभी होते न कळे!
अशी सुवासाची अजून एक रात्र:
मी
आणि माझी एक मावसबहीण - आज मागे वळून पाहताना वाटते, आम्ही दोघी अवली
कार्ट्या म्हणाव्या अशाच होतो. दोघीजणी कॉलेजच्या वयातल्या. ती दोन
सव्वादोन वर्षांनी थोरली; मी लहान. पण कुणीच कुणाला कमी नाही. कॉलेज एकच
असल्यामुळे आमची मैत्री अधिक बहरत गेली, फिरण्याची क्षितिजेही विस्तारत
गेली. माझी मावशी रहायची चेंबूरमधील 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल
सायन्सेस'मधे. माझा मुक्काम अनेकदा तिच्याकडे असायचा. चेंबूरमधल्या सगळ्या
डेंजर जागा आम्ही (मी व मावसबहीण) पालथ्या घातल्या असतील. फिरणे हा एकच
आमचा छंद. पायाला भिंगऱ्या लागलेल्या. एकमेकींशी बोलण्याच्या नादात आम्हाला
काळ-वेळाचे, जागेचे भान रहात नसे. घरी पोचल्यावर कधी समजावणी, कधी ओरडा,
कधी त्रागा. दुसऱ्या दिवशी पुन्हा परिस्थिती जैसे थे.
ज्या
रात्रीची गोष्ट सांगत आहे ती काहीशी काळोखाचीच आहे. रात्रीचे जेवण
झाल्यावर आमची जोडगोळी निघाली शतपावल्या घालायला. घरून बजावून सांगितले
होते, इन्स्टिट्यूटच्या आवाराबाहेर जाऊ नका म्हणून. आम्ही दोघींनी निक्षून सांगितले, आम्ही मुळीसुद्धा बाहेर जाणार नाही!
टाटा इन्स्टिट्यूटचे आवार
चांगले भलेमोठे. डेरेदार झाडांनी भरलेले. वाटेवरच्या लायब्ररीपाशीच
बकुळीचे मोठे झाड होते. रस्त्यापासून केवळ चार पावले आत. त्यादिवशी रात्री
वर-खाली चार-सहा फेऱ्या झाल्या, बाहेरच्या गेटपासून आतल्या हॉस्टेलपर्यंत.
मग पाय आपसूक बकुळीपाशी वळले. नेहेमी तिथे दहा-वीस फुले पडलेली असायची, पण
त्या दिवशी कसे कोण जाणे शुभ्र-टपोर बकुळफुलांचा सडाच पडलेला होता. आम्ही
त्या फुलांच्या सड्याने वेडावलो. फिरणे विसरलो आणि फुले गोळा करू लागलो.
नुसता सडाच पडलेला नव्हता, तर वर्षाव होत होता. पडणाऱ्या फुलांचे आश्चर्य
मनात साठवत आम्ही फुले गोळा करत राहिलो. बकुळफुलांचा गंध आम्हाला वेढून
आहे, आणि नाजुक, पांढऱ्या, सुंदर फुलांचे रूप मनाला मोहून टाकत आहे, अशी
विभोरावस्था!
आम्ही
दोघी त्या कोशात किती काळ वेढून राहिलो होतो न जाणे, शेवटी घरातून मोठ्या
भावाला आम्हाला बोलावण्यासाठी पाठवले गेले. 'शुत शुत, घरी चला' - टाळ्या
वाजवून रस्त्यावरूनच त्याने अत्यंत रूक्ष आवाजात आम्हाला घरी परतण्याची
आठवण करून दिली. त्या आवाजाने आम्ही मोहमयी कोशातून बाहेर निघालो. दोघींचे
ओचे फुलांनी गच्च भरलेले. तरंगतच घरी आलो.
मावशी
नेहेमीच्या शिरस्त्याने वाट पहात थांबलेली. रात्रीचे साडेबारा वाजून गेले
होते. दोघींनी आपापले ओचे टेबलावर रिकामे केले. फुलांची शुभ्र रास आणि
खोलीभर सुगंधाची दरवळ.
'कुठे तडमडता गं अवसेच्या रात्री?' आतून आजी बोलली आणि आम्ही दोघी बहिणींनी चमकून एकमेकींकडे पाहिले.
त्या फुलांचा शुभ्रटपोरपणाचा आणि सुगंधाचा एक तवंग मनावर आहे. ते झाडच जणू आमच्यासाठी वाकले होते, फुले टाकत राहिले होते.
चेन्नईला मी अनेक वर्षं रहिले. तिथे मी रहात होते बेझंटनगरला, समुद्राच्या अगदी किनाऱ्यावर. बेझंटनगरच्या आधी, अड्यार नदी जिथे समुद्रात शिरते त्या काठावर 'थिऑसॉफिकल सोसायटी' आहे. थिऑसॉफिकल सोसायटीत अॅनी
बेझंट यांचे वास्तव्य होते. एकूणच अतिशय रम्य परिसर. एखाद्या गुरुकुल
परंपरेत शोभाव्या अशा कुटिरांमधून जाणाऱ्या पायवाटा आणि अक्षरशः असंख्य
झाडे. वृक्षच म्हणणे अधिक योग्य. हजार-बाराशे वर्षांपूर्वीचा एक वटवृक्ष
तिथे जतन केलेला आहे.
अड्यार
नदीच्या काठाने पार समुद्रापाशी जाणे हा माझा व एका सखीचा नेहमीचा
शिरस्ता. वाटेवरली झाडे थबकून पहावी, फुलांचे कोडकौतुक डोळ्यांत साठवून
घ्यावे आणि पुढे निघावे. याच वाटेवर नेहमी एका सुगंधापाशी येऊन आम्ही थबकत
असू. पांढऱ्या नाजुक फुलांचे ते अटकर झाड. झाडाचा आकार साधारण तगरीच्या
झाडाइतका, पण तगरीपेक्षाही डेरेदार. त्याच्या पानापानाला फुले लगडलेली.
इवलीशी, नाजुक, पाकळ्या सतत उमललेल्या. त्या दिवसांत फिरताना त्या फुलांचे
कौतुक जरूर केले; पण कधी झाडाचे नाव शोधण्याचे काम तडीस नेले नाही.
त्यानंतर
कधीतरी भोपाळला रहायला गेले. इथलीही कॉलनी सुंदर. हिरवीगार. प्रशस्त
वाटांची. जेवण झाल्यावर फिरायला जाण्याचा सगळ्याच कॉलनीचा पायंडा. मात्र
कॉलनी इतकी मोठी, की कुणी कुणीच्या पायात यायचे नाही. असेच एका रात्री
फिरताना फुलांचा तोच सुगंध आला, आणि मन धावत थिऑसॉफिकल
सोसायटीत जाऊन पोचले. कितीएक वर्षे मधे गेली होती, पण अवचित आलेल्या त्या
सुगंधाच्या लाटेने पार चेन्नईला नेऊन पोचवले. शोध घेतला तर तेच आमचे आवडते
झाड. तोच मादक सुवास. जणू किती काळाने आम्ही एकमेकांना भेटत होतो. यावेळी
मात्र फुलाच्या नावाचा लगेच शोध घेतला: मधुकामिनी!
मग भोपाळच्या माझ्या अंगणात मधुकामिनीची झाडे हारीने लावून घेतली.
एकदा
रात्री किहीमला, माझ्या शेतावरच्या घरात पुस्तक वाचत बसले होते. नीरव
शांतता आणि पुस्तकाची साथ. छान चालले होेते माझे. वाऱ्याची एक हलकी झुळुक
आली आणि पाठोपाठ खूप परिचित सुगंध आला. पुस्तक मिटले आणि अंधारातच सुगंधाचा
मागोवा घेत गेले, तर रातराणी फुलली होती. पाण्याच्या टाकीजवळ, कमानीच्या
पायतळी रातराणीचे बाळरोपटे मीच लावले होते. विसरूनही गेले होते. आज त्याचा
वेल होऊन, विस्तारून ती पूर्णफुली फुलली होती, आणि आपल्या सर्व
सामर्थ्यानिशी प्रकटली होती. मला तिच्यापर्यंत ओढून नेण्याचे काम गंधाने
केले होते.
सुगंधाचा
विषय निघाला तर पारिजात टाळून पुढे जाणे शक्य नाही. रात्रीतून उरी फुलून
येतो आणि सकाळ होता होता सारी फुले गाळून मोकळा होतो. भोपाळच्या त्या
घराच्या गेटमधून आत येता येताच दोन बाजूंना दोन प्राजक्त होते. शेलाटी
अंगकाठी असली तरी दोन्ही झाडे खूप जुनी असावीत. उमलण्याची जणू स्पर्धाच
लागलेली असावी, असे दोघे फुलून येत. दोन्ही झाडांवरच्या फुलांच्या प्रकृती
मात्र काहीशा भिन्न. एकाचे फूल अगदी नाजुक, सुकुमार कातरलेले, तर दुसऱ्याचे
टपटपीत. सुगंधात मात्र कोणी उणे नाही. पांढऱ्या, केशरदेठी फुलांनी डवरलेली
ती झाडे म्हणजे मातीचे वैभव.
सकाळी
चहा करता करता स्वयंपाकघरातून पहावे तर रस्त्यावर दोन्ही झाडांच्या
फुलांचा सडा पडलेला असायचा. रस्ता झाडणारा पोरगा सगळी टपोरी फुले झाडून
केराच्या टोपलीत टाकायचा. मन हळहळायचे. तरी रोज रात्री झाडे आपली बहरायचीच.
आपल्या दैवी सुगंधाने वेडे करायचीच.
देवाचे देणे, आपण नतमस्तक होऊन घ्यावे!
मस्त अनुभव आहेत. मन श्रीमंत करणारे.
ReplyDeleteआपल्या अनेक आठवणी या सुगंधांना जडून असतात.