मराठी शब्दांबाबत विलास सारंग म्हणतात:
* ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *
मराठीतील
चांगले चांगले शब्द आता दृष्टिआड होत आहेत. यात वृत्तपत्रांची जबाबदारी
आहेच; वृत्तपत्रं रूढ, धोपटमार्गी शब्द वापरतात. यात त्यांचा दोष नाही.
वाचकाला जे समजेल, सवयीचे असेल अशा मर्यादित शब्दभांडारावर वृत्तपत्रांचा
गाडा चालतो. वाचकांना तसदी नको असते. तेच ते शब्द पुन्हा पुन्हा वाचण्याची
प्रवृत्ती असते.
या
परिस्थितीत उत्तमोत्तम, समर्पक शब्द बिनवापरामुळे नाहीसे होत आहेत.
सामाजिक बदलाच्या रेट्यामुळे लोक काही शब्द वापरायला घाबरतात. निरुपद्रवी
शब्द वापरण्याकडे पत्रकार-लेखकांचा अप्रत्यक्षपणे कल असतो. मी मागेही
सांगितलं आहे की ही प्रवृत्ती घातक आहे. नेणीवेतील (unconscious) भावना व
दृष्टिकोन जितक्या प्रमाणात प्रकाशात येतील तितकं आपलं गंडग्रस्त
(neurotic) मन मोकळेपणाने श्वास घेऊ शकेल. सांस्कृतिक स्वातंत्र्याचा हा एक
मार्ग आहे. सरकारी भाषेत, व्यासपीठावरून केलेल्या भाषणात स्वातंत्र्याचा
फक्त देखावा असतो. आपलं अनकॉन्शस मन जुन्या सवयी सोडायला तयार नसतं. कॉन्शस
व अनकॉन्शस (जागृत व सुप्त मन) यांमधे आपल्या समाजात कमालीचा भेद आहे. असा
मानसिकदृष्ट्या दुभंगलेला समाज फारशी प्रगती करू शकत नाही.
- (पान १०९, 'मॅनहोलमधला माणूस: मराठी वाङ्गमय, समाज व जातिवास्तव', मौज प्रकाशन गृह)
Comments
Post a Comment