तुम्हाला नात्यात रस आहे, की नातं टिकवण्यात रस आहे ?
तुम्हाला नात्यात रस आहे, की नातं टिकवण्यात रस आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न. कारण दोन्ही एकसाथ घडू शकत नाही.
कुठल्याही
नातेसंबंधात पुरतेे रममाण असतो, खरोखर त्या नात्याचा भाग असतो तेव्हा आपण
ते नातं टिकवण्यासाठी धडपडत नाही - तशी गरजच नसतेे. नातं टिकवण्याची धडपड
करतो तेव्हा आपण नात्याशी समरस नसतो, एकरूप नसतो. नात्यापासून निराळं होऊन,
पृथक् होऊन आपला तो खटाटोप चालतो.
ज्या
क्षणी आपण वास्तवाकडे, जे आहे त्याकडे थेट पाहू इच्छित नसतो; ज्याक्षणी
स्वतःचं वर्तमान सर्वांशानं पाहण्यात आपल्याला रस नसतो / तितकं धैर्य नसतं /
सबुरी नसते / ऊर्जा नसते, त्याक्षणी 'आदर्शा'ची चर्चा सुरु होते. आपण
जगाला 'आदर्श' व 'वास्तव' यांत विभागून टाकतो. सेकंदाच्याही एखाद्या
तुकड्यात घडतं हेे - मनानं शोधलेली पळवाट असते ती; मनाचा थकवा / आळस / भ्रम
असतो.
प्रत्यक्षात असतं ते केवळ वास्तव, बाकी काही नाही. नि ते समजून घेता येतं फक्त पाहण्यानं. प्रश्न सुटतात फक्त समजून घेण्यानं.
आपल्याला निश्चिती हवी असते, ही नातेसंबंधातली खरी (मी तर म्हणेन एकमेव)
समस्या आहे. आपल्याला सारंकाही हवं असतं. 'काही हरवतं, काही सापडतं' हे
वैश्विक समतोलाचं तत्त्व आपल्या जगण्यात मंजूर नसतं. 'मला हेही कसं मिळेल
नि तेही कसं टिकेल, नि हेही कसं गमवावं लागणार नाही' यासाठी तडजोडींचा
व्यापार करत राहतो माणूस. आणि खूष होतो स्वतःच्या 'हुशारी'वर! ...नाती
जपण्याचा प्रयत्न हा अशा अज्ञानाचा आविष्कार आहे.
नातं असेल तर असतं, नसेल तर नसतं. समंजसपणा,
खिलाडूपणा, क्षमावृत्ती एकतर असते किंवा नसते. असली तर ती आपलं काम करते,
नाती टिकतात, बहरतात; नसली तर नाती असूनही मरतात, कारण नात्यातील माणसांनी
या न त्या प्रकारे स्वतःचा वा इतरांचा संकोच केलेला असतो.
आपण
स्वतः विश्वासाने भरलेलो असू तर त्या भावनेचा इतरांना स्पर्श होणारच; कसा,
किती ते माहित नाही, त्या आश्वासकतेचा स्पर्श नक्की होणार. आणि ही
आश्वासकता बाहेरून येणारच नाही, ती साध्य करण्याची गोष्टच नव्हे. आपण किती
भयग्रस्त, आतून किती डळमळीत आहोत हे पुरतं समजून आलं की विश्वास आपोआप
येणार.
परंतु
आपल्याला परिणामांवर नियंत्रण हवं असतं. वर्तमानात, 'इथे' नसतोच आपण - सतत
'पुढ'च्या विचारात, सतत 'तिथलं' काहीतरी पाहण्यासाठी धडपडणारी नजर...
बी
रुजतं तेव्हा कसली निश्चिती असते हो त्याला, की आपण जगू, वाढू, आपल्याला
आवश्यक ते पोषण मिळेल, पुढे आपल्यावर कुणी कीटक वा परजीवि वनस्पती हल्ला
चढवणार नाही, कुणी मानव आपला घात करणार नाही.. मुळात आपण रुजूच कशावरून? पण
अशाश्वतीनं गांगरून ते मुद्दामहून काही करायला जात नाही. पडून राहतं. जसं
असेल तसं रहातं. शेकडो वर्षांनतर काही बीया रुजलेल्या आहेत या पृथ्वीतलावर!
मला तर वाटतं त्याला पुरतं ठावूक असतं. त्या अशाश्वतीवरच पूर्ण भरोसा
ठेवून निश्चिंत असतं ते. ...काय असेल त्याचं हे 'जसे आहोत तसे असणं'? टिचभर
बीयांच्याही अंगी एवढी निर्धास्तता, निर्भारता!?
बीयांच्या या तथाकथित 'निद्रिस्त / प्रतीक्षारत' अवस्थेबद्दल मला नितांत प्रेम, विस्मय वाटतो.
Comments
Post a Comment