गंधावर्त
* 'मिळून साऱ्याजणी' मासिकाच्या फेब्रुवारी २०२५ अंकात ही कथा प्रसिद्ध झाली होती. * गंधावर्त मुक्ता 'असरार' सांज होतेवेळी तुमची डॉर्मिट्री बव्हंशी रिकामी असायची, तेव्हा यायचे मी कधीकधी – तूही नसायचीस तेव्हा. तुझं व तुझ्या बंक पार्टनरचं सामायिक कपाट उघडायचे, एकामागून एक तुझे कॉस्मेटिक्स बाहेर काढायचे, हुंगून पहायचे, पुन्हा कप्प्यात ठेवून द्यायचे. आमच्या डॉर्मिट्रीसारखीच ही आणखी एक मोठ्ठी खोली: हवेशीर, ऐसपैस, बंकबेड्सने भरलेली. पण तुमच्याइथे उजेड बराच रेंगाळायचा. त्या-त्यावेळी हजर असलेल्या कुठल्याच मुलीनं तुझ्यापाशी चुगली केली नसावी. त्यांना वाटत असेल तुझ्या परवानगीनंच चाललीय ही शोधाशोध. मॉइश्चराइजर, दोन प्रकारची तेलं, शांपू, सनस्क्रीन, लिपबाम, काजळ, इम्पोर्टेड काहीतरी - परक्या शब्दांखाली बारीक अक्षरांत लिहिलेले इंग्रजी अर्थ कायम विसरून जायचे मी. कप्प्यात मागच्या बाजूला जादा साबणांची एक-दोन खोकी, औषधी मलमं...हं, टॅल्कम पावडर वापरत नाहीस. पण 'तो' गंध हवाय मला...कुठाय तो? प्रत्येक खोक्याचा, बाटलीचा, डबीचा मी अंतर्बाह्य वास घ्यायचे. तुझ्या पलंगाच्या उशाशी भिंत...