स्वप्न
मी,
जॉर्ज ऑर्वेल आणि टी. एस. एलियट एका मोठ्या खाटेवर एकमेकांशेजारी पहुडलो
होतो. जाड रजईतसुद्धा थंडी वाजत होती.
ही खाट नेमकी कुठे असावी? वर खुलं
आकाश होतं, भवती अंधार. वाळवंटात होतो आम्ही बहुधा. इतरांना विचारण्याची, स्वतः उठून जाणून घेण्याची इच्छा होत नव्हती.
माझ्या
पाठीमागं ऑर्वेल आणि एलियट एकमेकांकडे तोंड करून बोलत होते. खाटेच्या टोकाला पाय छतीशी मुडपून, शाल लपेटून बसलेल्या आमच्या तत्त्वज्ञानाच्या
प्राध्यापकांशी मी गप्पा मारत होतो. सारे धीम्या आवाजात बोलत होतो.
काहीवेळाने मागून येणारा आवाज बंद झाला. दोघे झोपी गेले असावेत. बऱ्याच वेळाने ऑर्वेल म्हणाले, "जरा इकडे बघ." मी मागे वळून पाहिलं. ऑर्वेल एलियटकडे एकटक पाहत होते. त्यांनी माझा हात हातात घेऊन एलियटच्या मनगटाला लावला - नाडी बंद पडली होती.
मग
मी व ऑर्वेल शांत झोपी गेलो. डोळे मिटण्यापूर्वी मी खाटेच्या टोकाकडे नजर टाकली - गुढघ्यांवर हनुवटी टेकवून आमचे प्राध्यापक विचारांत पार गढले
होते.
Comments
Post a Comment