शब्द

शब्द ही एक जिवंत गोष्ट आहे. एक काया. लांबी, रुंदी, घनता, गती असणारा एक पदार्थ. 
अलगद बोट बुडवून पहा; तळव्यात खुळखुळून पहा; जिभेच्या टोकावर त्याला तोलून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कदाचित. आनाइस निनच्या ते लक्षात आलं जेव्हा तिनं आपली पुस्तकं स्वतः छापली - टाईपच्या खिळ्यांनी ओंजळ भरली, शाईने कोपरं माखून घेतली, शर्टांच्या पाठींना घाम फोडला... शब्दाचा साक्षात्कार झाला तिला!
 
कुठल्याही जिवंत गोष्टीप्रमाणे शब्दांशीही आपलं दुतर्फी नातं असतं. शब्द उच्चारताना, समजावून घेताना, त्याची किंमत करताना नेहेमीच इतर शब्द, प्रतिमा, ध्वनि, अनुभव, अपेक्षा, आठवणी वगैरे जोडून पहातो आपण त्याच्याशी, तुलना करतो. कधी स्वतःला जोडतो का शब्दाशी थेट, कसल्याही मध्यस्थीशिवाय?
 
शब्द आपलं वास्तव आहेत, आपण त्यांचं वास्तव आहोत. ते आपल्या छायेत जगतात, आपण त्यांच्या छायेत जगतो - मरतोदेखील. इतर कोणत्याही नात्याप्रमाणे या नात्यात आपलं खरंखुरं प्रतिबिंब उमटतं. अस्तित्वावर बंधनं आपण लादून घेतो, स्वतःभवती सीमा आपण रेखतो, नि म्हणतो शब्द सीमित आहेत, त्यांचा आवाका मर्यादित आहे, त्यांची धाव अपुरी!  
 
...संततधारेप्राणे शब्द ठिबकत राहतील, मात्र पाणी खोल मुरायचं म्हटलं, तर खडकानंही जरा उत्सुक व्हावं ना! 
 
आपलं असणं, आपलं जगणंच असं व्हावं की आपल्या स्पर्शाने, नुसत्या समीप येण्याने नावांचे, व्याख्यांचे, अगदी भलभलत्या शब्दांचे काच सैल व्हावे. आपल्या संगतीत त्यांनी मोकळा श्वास घ्यावा. मर्यादित अर्थांची, संदर्भांची पुटं दूर होऊन नुकतेच न्हाल्यागत तकाकी यावी त्यांना. 
मग शब्दांचं असणं-नसणं, त्यांचं नवे-जुनेपण... कशाशीच भांडण उरत नाही. कसलाच निषेध रहात नाही. ...विरुद्धार्थांबद्दल आकस नाही, समानार्थांबद्दल भ्रम नाहीत. 
 
शब्दच शब्दांपलिकडे नेतात मग कधीकधी.

- मुक्ता 'असरार'

Comments