'प्रत्येक व्यक्तीला स्वयंपाकातले काही ना काही अजब कौशल्य प्राप्त असते' - दुर्गा भागवत
...आमच्याकडे
स्वयंपाकाला एक बाई होत्या. त्यांची आई लहानपणीच वारली, एका
इस्पितळात आश्रित म्हणून वाढल्या. रूपाने देखण्या परंतु अस्थिर बुद्धीच्या
असल्यामुळे पुढे नवऱ्याने त्यांना टाकले. मग त्या माझ्या आत्याच्या घरी
नोकरीला राहिल्या.
या बाईंचे सारे काम दिव्य असे. उत्तराला प्रत्युत्तर
ठरलेलं. मोदक अतिशय सुरेख करायच्या. मी मोदक त्यांच्याकडून शिकले. पीठ दळण्यापासून
सारे त्या करायच्या. बारीक पिठी दळण्याचं कसब त्यांच्याकडे होतं.
एकावर
एक तीन मोदक कसे करायचे ते त्यांनी मला शिकवलं: एक बरीच मोठी पारी करायची.
पहिल्यांदा सर्वात खालच्या मोदकाचे कंगोरे काढायचे, सारण भरून तो मिटवताना
बरंचसं पीठ वर येतं. त्या पिठाचा पहिल्यापेक्षा लहान मोदक करायचा.
उरलेल्या पिठाचा तसाच वर तिसरा मोदक करायचा. तीन-तीन मोदकांच्या अशा चार
उतरंडी करून गणपतीच्या मखराच्या चारी बाजूंना मांडायच्या. हे कसब मी
पहिल्यांदा त्यांच्याकडे पाहिलं, आणि माझ्या कुवतीप्रमाणे हस्तगतही केलं.
प्रत्येक व्यक्तीला, बाई असो वा बुवा, स्वयंपाकातले काही ना काही अजब कौशल्य प्राप्त असते अशी माझी समजूत तेव्हापासून झाली आहे.
Comments
Post a Comment