ओळख

दोन अनोळखी भाषा एकमेकींवर आदळतात
तेव्हा पोटातली भाषा फुटते
अडखळलेल्या दोन तटांतून
विनापरवाना वाहू लागते:
सावध कण्याचा काटा
संशयाला कपाळावर सापडलेल्या वाटा
डोळ्यांत ढवळलेला गोंधळ
हलक्या कानांची चुळबुळ
वाकलेल्या खांद्याची झोपमोड
विचारांच्या उलटसुलट छपाईची खडखड
वाढता खाणाखुणांचा ढिगारा
सामानाभवती पायांचा पहारा

फिरलेली पाठ किंवा फिरवलेला हात
गारठ्यात, पावसात फोन न उचललेले
जादूनेच भरून येतात अपरात्री गरम पेले
मानेने कळवलेली सहज उत्तरं
आपसुक हसण्याची किलकिली दारं
तिकडून उजवा इकडून डावा
तळव्याशी जुळणारा तळवा
आपला ना परका म्हणावा
निरोप तरी कसचा घ्यावा!

अनोळखी भाषेवर आदळलात
तर पाहत रहा तिच्याकडे
धीरोदात्त बावळटपणानं -
विचकू दे गैरसमजांचे दात,
उतरत जा निराशेच्या पोटात
ओळख लागेपर्यंत.

Comments