Posts

Showing posts from 2025

दीना!

Image
मास्टर दीनानाथ मंगेशकरांबद्दल काही लेख वाचनात आले. भारतीय शास्त्रीय संगीताचा माझा अभ्यास नाही, तितकीशी ओढही नाही. मात्र का कोण जाणे, संगीत-नाट्य क्षेत्रातील मंडळींनी या कलाकाराबद्दल वर्णलेल्या काही आठवणी इतरांशी वाटून घेण्याची इच्छा होतेय:     संगीतातील रूचिपूर्ण, उत्तम काहीही शिकण्याबद्दल मास्टर मुक्तग्राही होते. विद्वान लोकांकडून त्यांनी चिजांचा मोठा संग्रह केला. उत्तरेकडील, थोडे दक्षिणेकडील गायकीचे ढंग आत्मसात केले. ...गोव्यातील आपले गुरू बाबा माशेलकर यांजकडून मडकइ ते वाफर या तासा-दीड तासाच्या पायी प्रवासात विलक्षण बुद्धिमत्तेच्या मास्टरांनी अकरा चिजा शिकून घेतल्या असा प्रसंग ऐकिवात आहे!  ..फार फार आत्मीयतेनं त्यांनी हे भांडार मिळवलं व मुक्तहस्ते शिष्यांना देऊ केलं. मास्टरांची शिकवण्याची ठराविक पद्धत नव्हती. मनात येईल तसे, हिशोबीपणा न करता शिकवत. प्रभाकर जठारांना भरभरून बंदिशी दिल्या त्यावेळी ते म्हणाले: "एकच राग सहा-सहा महिने शिकवायचा माझा स्वभाव नाही. शे-दोनशे बंदिशी गळ्यातून गेल्या म्हणजे तुझा आवाज आपोआप निकोप होईल. एकदा शिकवून झाल्यानंतर गाणं हे ज्या...

न संपणाऱ्या रात्रीवर निघताना

शाई, कागद, पेनाच्या ठरीव जागांची आठवण एक चेहरा नव्याकोऱ्या मैत्रिणीचा आणखी एक धूतवस्त्रात गुंडाळून ठेवलेला तासांच्या गळ्यातील घोगऱ्या घंटा पुस्तकांवरली धूळ माळ्यातली वळवळ, परसातल्या फुलांचा दरवळ नि ती आपण फुलवल्याचा बोटभर अहंकार बुडवूनही न मरणारी, स्वप्नांवर तरणारी वासना आणि 'शाल' म्हणा, वा 'खाल' म्हणा साफ एकटेपणाची: न संपणाऱ्या रात्रीवर निघताना सोबत घेता येतं जेमतेम एवढंच.   - मुक्ता 'असरार' © मुक्ता असनीकर

स्वप्न

मी, जॉर्ज ऑर्वेल आणि टी. एस. एलियट एका मोठ्या खाटेवर एकमेकांशेजारी पहुडलो होतो. जाड रजईतसुद्धा थंडी वाजत होती.  ही खाट नेमकी कुठे असावी? वर खुलं आकाश होतं, भवती अंधार. वाळवंटात होतो आम्ही बहुधा. इतरांना विचारण्याची, स्वतः उठून जाणून घेण्याची इच्छा होत नव्हती. माझ्या पाठीमागं ऑर्वेल आणि एलियट एकमेकांकडे तोंड करून बोलत होते. खाटेच्या टोकाला पाय छतीशी मुडपून, शाल लपेटून बसलेल्या आमच्या तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकांशी मी गप्पा मारत होतो. सारे धीम्या आवाजात बोलत होतो.   काहीवेळाने मागून येणारा आवाज बंद झाला. दोघे झोपी गेले असावेत. बऱ्याच वेळाने ऑर्वेल म्हणाले, "जरा इकडे बघ." मी मागे वळून पाहिलं. ऑर्वेल एलियटकडे एकटक पाहत होते. त्यांनी माझा हात हातात घेऊन एलियटच्या मनगटाला लावला - नाडी बंद पडली होती.   मग मी व ऑर्वेल शांत झोपी गेलो. डोळे मिटण्यापूर्वी मी खाटेच्या टोकाकडे नजर टाकली - गुढघ्यांवर हनुवटी टेकवून आमचे प्राध्यापक विचारांत पार गढले होते.

शब्द मोठे की सूर?

Image
  वोल्फगाङ्ग आमाडेउस मोत्सार्टची ( Mozart ) प्रतिभा आपल्याला मोहून टाकते, भारून टाकते. त्यानं ज्यांसोबत  काम केलं ते लिब्रेटिस्ट्स (ओपेरालेखक - संहिता, गद्य/पद् य लिहिणारे) देखील आपल्या कामात तोडीस तोड होते बरं. कुठेसा वाचलेला हा प्रसंग अगदी ठळकपणे लक्षात राहिलाय. विस्मरण्यापूर्वी सांगते:   'सूर सर्वश्रेष्ठ, सुरांचं महात्म्य निर्विवाद आहे' असं मोत्सार्टचं पालुपद चालू असायचं. एका लिब्रेटिस्टनं त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, "अरे, सूर आणि शब्द परस्परपूरक नसतात का? दोहोंपैकी एक जरी नसेल तर ओपेरा उभाच राहणार नाही."    पण मोत्सार्टचं आपलं तेच.   तेव्हा लिब्रेटिस्ट म्हणाला, "ठीक आहे. यापुढे रद्दी कागद, वाणसामानाच्या याद्या वगैरेंतल्या शब्दांना संगीत दे, तेच गाऊन घे रंगमंचावर. फक्त सूरच श्रेष्ठ असतील, तर त्यांच्या मखरात वाट्टेल ते शब्द बसवा, खपतीलच की. शिवाय माझ्यासारख्या लेखकबिखकांच्या मानधनावर खर्च होणारे पैसे वाचतील." तेव्हा कुठे मोत्सार्टच्या डोक्यात प्रकाश पडला!

दुर्गाबाई उलगडतात पशुपक्षी व पाकशास्त्राचं नातं...

...दोन प्राण्यांनी माणसाच्या पाकज्ञानात भर घातली आहे: अस्वल व माकड.  दक्षिणेकडे अस्वलं मोठ्या प्रमाणावर आढळतात. हे अस्वल शाकाहारी असतं. त्याचं नाक अतिशय तीक्ष्ण असतं. वसंतात झाडांना फुलं धरली, की अस्वलं हरतऱ्हेची सुवासिक फुलं गोळा करतात. मधाची पोळीदेखील उतरवतात. ही पोळी व फुलं एकत्र करून पायाने वा काठीने तुडवतात. या काल्याला 'अस्वलाचं पंचामृत' म्हटलं जातं. ते अत्यंत पौष्टिक असतं. माणसालाही ते आवडतं, व ते हस्तगत करण्यासाठी अस्वलांची शिकार केली जाते. अस्वलाने शिकवलेला हा पदार्थ मी (घरी) करून पाहिला. बरीच वासाची फुलं व खूपसा मध घालून मी ते केलं. काहीजण कृत्रिम चवींना इतके सवकलेले असतात, की त्यांना हा पदार्थ रुचला नाही. मी मात्र तो आवडीने खाल्ला.   माकडाकडून मानवजातीला मिळालेला अपूर्व पदार्थ म्हणजे बाळंतिणीचा डिंकाचा लाडू! ..आम्ही जंगलात होतो तेव्हा पाहिलं, की मादी माकड बाळंत झाल्यावर नर माकड जंगलात डिंक व मध गोळा करतं, त्याचे ओबडधोबड लाडू वळून ते मादीला खाऊ घालतं. उत्तर प्रदेशात गंगा-यमुनेच्या काठची माकडं चारोळ्या गोळा करून, डिंक व मधात त्या घोळून लाडू बनवतात. अर्था...

'प्रत्येक व्यक्तीला स्वयंपाकातले काही ना काही अजब कौशल्य प्राप्त असते' - दुर्गा भागवत

...आमच्याकडे स्वयंपाकाला एक बाई होत्या. त्यांची आई लहानपणीच वारली, एका इस्पितळात आश्रित म्हणून वाढल्या. रूपाने देखण्या परंतु अस्थिर बुद्धीच्या असल्यामुळे पुढे नवऱ्याने त्यांना टाकले. मग त्या माझ्या आत्याच्या घरी नोकरीला राहिल्या.   या बाईंचे सारे काम दिव्य असे. उत्तराला प्रत्युत्तर ठरलेलं. मोदक अतिशय सुरेख करायच्या. मी मोदक त्यांच्याकडून शिकले. पीठ दळण्यापासून सारे त्या करायच्या. बारीक पिठी दळण्याचं कसब त्यांच्याकडे होतं. एकावर एक तीन मोदक कसे करायचे ते त्यांनी मला शिकवलं: एक बरीच मोठी पारी करायची. पहिल्यांदा सर्वात खालच्या मोदकाचे कंगोरे काढायचे, सारण भरून तो मिटवताना बरंचसं पीठ वर येतं. त्या पिठाचा पहिल्यापेक्षा लहान मोदक करायचा. उरलेल्या पिठाचा तसाच वर तिसरा मोदक करायचा. तीन-तीन मोदकांच्या अशा चार उतरंडी करून गणपतीच्या मखराच्या चारी बाजूंना मांडायच्या. हे कसब मी पहिल्यांदा त्यांच्याकडे पाहिलं, आणि माझ्या कुवतीप्रमाणे हस्तगतही केलं.  प्रत्येक व्यक्तीला, बाई असो वा बुवा, स्वयंपाकातले काही ना काही अजब कौशल्य प्राप्त असते अशी माझी समजूत तेव्हापासून झाली आहे.

तुम्हाला नात्यात रस आहे, की नातं टिकवण्यात रस आहे ?

तुम्हाला नात्यात रस आहे, की नातं टिकवण्यात रस आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न. कारण दोन्ही एकसाथ घडू शकत नाही.  कुठल्याही नातेसंबंधात पुरतेे रममाण असतो, खरोखर त्या नात्याचा भाग असतो तेव्हा आपण ते नातं टिकवण्यासाठी धडपडत नाही - तशी गरजच नसतेे. नातं टिकवण्याची धडपड करतो तेव्हा आपण नात्याशी समरस नसतो, एकरूप नसतो. नात्यापासून निराळं होऊन, पृथक् होऊन आपला तो खटाटोप चालतो.    ज्या क्षणी आपण वास्तवाकडे, जे आहे त्याकडे थेट पाहू इच्छित नसतो; ज्याक्षणी स्वतःचं वर्तमान सर्वांशानं पाहण्यात आपल्याला रस नसतो / तितकं धैर्य नसतं / सबुरी नसते / ऊर्जा नसते, त्याक्षणी 'आदर्शा'ची चर्चा सुरु होते. आपण जगाला 'आदर्श' व 'वास्तव' यांत विभागून टाकतो. सेकंदाच्याही एखाद्या तुकड्यात घडतं हेे - मनानं शोधलेली पळवाट असते ती; मनाचा थकवा / आळस / भ्रम असतो.  प्रत्यक्षात असतं ते केवळ वास्तव, बाकी काही नाही. नि ते समजून घेता येतं फक्त पाहण्यानं. प्रश्न सुटतात फक्त समजून घेण्यानं.   आपल्याला निश्चिती हवी असते, ही नातेसंबंधातली खरी (मी तर म्हणेन एकमेव ) समस्या आहे. आपल्याला सारंकाही हवं असतं....

उद्या नक्की (जर्मन नाटुकलं)

  * * हे भाषांतर माझे नाही * *   उद्या नक्की मूळ जर्मन लेखक: फ्रीडरिष कार्ल वेश्टर        (एक माणूस घराचं दार उघडून आत येतो, आणि सुरा बाहेर काढतो.)   तो: आज सोडत नाही मी तिला. (आतल्या खोलीतून बाईचा आवाज) ती: आलं का माझं नवरुडं! ये, सरळ आत ये. तो (सुरा पायपुसण्यावर घासत): आज संपवतोच कसा तिला. थंडगार करून सोडतो. ती (आतूनच, जरा मोठ्यानं): पायपुसणं पुन्हा फाटलं ना तर माझ्यइतकी वाईट कोणी नसेल, सांगून ठेवते!

कबूल कर! (जर्मन नाटुकलं)

* * हे भाषांतर माझे नाही * *   कबूल कर! मूळ जर्मन नाटुकले     कबूल कर, तुला इथे स्वातंत्र्य आहे. - कबूल.   कबूल कर, तुला आम्ही प्रेमाने वागवतो. तूसुद्धा आमच्यावर प्रेम करतोस. - कबूल.   सारंकाही अगदी तुला हवं तसं आहे, कबूल कर. - कबूल करतो.   एखादी गोष्ट तुला कबूल नसेल, तर तसं सांग.  - ...माहित नाही.   कबूल कर, की हा विजय तुझाच आहे. - कबूल.   कबूल कर, की आपण एकमेकांना भावासमान आहोत. - कबूल करतो.    तु सुखी आहेस, हे कबूल आहे ना तुला?  - माहित नाही.  कबूल कर! - आहे कबूल.   मोकळेपणाने बोलून आता तुला हलकं वाटतंय ना? - हो. कबूल कर! - कबूल करतो.   हं. शेवटी काय म्हणायचं असतं..? - धन्यवाद.

उगाच आख्यान...

  संसारी माझ्या येउनि का ऐसा  केला घात पुरा, का असा रे घननीळा..   भारी गंमत आहे. 'का? का आलास तू?' भक्त / भक्तीण विचारतेय.  देवाला, प्रेमाला, सत्याला वारंवार केला जाणारा प्रश्न: 'का?'  एकूणेक उत्तरं या प्रश्नाच्या मापाची असतात, या प्रश्नात मावतात असं वाटतं की काय आपल्याला? हा घात आहे, विनाश नाही. विध्वंस नाही. कुणा माथेफिरूनं केलेली तोडफोड नाही, इतकं समजतंय. घननीळानं केलेला घात - असं भक्तिणीला वाटतंय बरं का. 'घात झाला. हे काय घडू दिलं मी?! आता कसं होणार माझं, काय होणार? ...का केलंस तू हे??!' शंकित झालीय ती. मनात खळबळ उडालीय. इथे कृष्णाचा विचार करत नाही आपण. कसा घडत असेल, मोडत असेल तो क्षणोक्षणी? कसा प्रकटत असेल, लोपत असेल? कृष्ण-कृष्ण म्हणजे तरी कोण?  आणि घात झालाच असेल तर नेमका कशाचा? - संसाराचा? नात्यागोत्यांचा? दैनंदिन कामाधामाचा? की असत्याचा? काय ढळतंय नेमकं? - मानमर्यादाच ना, रूढ कल्पनाच ना?  पण का?? 'का' काही संपत नाही!   मीच का? माझ्याच संसारात का? माझ्याच आयुष्यात का? आत्ताच का? याच रूपात का? नक्की उद्देश काय आहे याचा? ... छे, मला ...

'प्रेम म्हणजे काय' हे पालकांना ठावूक नसतं - बालकाला ते सांगावं लागत नाही

Image
आईबाप आपल्या मुलांना म्हणतात, 'आमचं तुमच्यावर प्रेम आहे, खूप खूप प्रेम आहे.'  ते केवळ वात्सल्याचा आव आणू शकतात, प्रेम-जिव्हाळ्याबद्दल बाष्कळ बडबड करू शकतात. त्यांचं वास्तविक आचरण अतिशय रूक्ष, प्रेमहीन असतं. ते अपत्याशी तुसडेपणानं वागतात; त्यांच्या वागण्यात आदराचा लवलेश नसतो. कोणाही पालकाच्या मनात अपत्याबद्दल निखळ आदर नसतो. अपत्याबद्दल कसला आदर बाळगायचा! लहान मूल ही आपल्या लेखी व्यक्ती नसतेच, ती एक मालमत्ता असते. मुख्य म्हणजे ती एक अडचण असते, डोक्याला ताप असतो. चिडीचूप बसेल तो शहाणा मुलगा / शहाणी मुलगी. आई-वडिलांच्या कामात, दिनक्रमात लुडबुड करत नसेल तर ते गुणाचं लेकरू! पण या साऱ्यात आदर, प्रेम मुळी नसतंच. पालक नावाची माणसं तऱ्हतऱ्हेचे पूर्वग्रह, बुरसटलेले विश्वास मुलांच्या मेंदूत कोंबतात. पिढ्यानपिढ्या मानवप्राणी जो अर्थशून्य कचरा वाहून नेतोय, तेच ओझं पालक आपल्या मुलांच्या पाठीवर लादतात. मूर्खता अव्याहत चालू रहाते... पर्वतप्राय होत जाते. आणि तरी बहुतांश पालक 'आपण आपल्या मुलांवर प्रेम करतो' या गोड गैरसमजात वावरतात. पालकांच्या ऱ्हदयात खरोखर प्रेम असेल तर मुलांनी...

प्रेम म्हणजे स्वातंत्र्य

Image
प्रश्न: मी माझ्या प्रेयसीला शक्य तेवढं स्वातंत्र्य देतो - त्यामुळे मी स्वतः अडचणीत सापडलो, मला दुःख झालं तरी. माझं स्वत:वर पुरेसं प्रेम नाही  म्हणून मी स्वत:ला दुय्यम स्थान देतोय असा याचा अर्थ होतो का?     रजनीश (ओशो) :  हे तुला वाटतं त्याहून फार गुंतागुंतीचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे तू तुझ्या प्रेयसीला स्वातंत्र्य ‘देतोस’ ही कल्पनाच चुकीची आहे. तू कोण तिला स्वातंत्र्य देणारा? तू केवळ प्रेम करू शकतोस आणि तुझ्या प्रेमातच स्वातंत्र्य अभिप्रेत आहे. ती देण्याची गोष्टच नव्हे. ते द्यावं लागत असेल, तर तुला जाणवणाऱ्या सर्व समस्या जाणवणं सहाजिक आहे. तेव्हा तू चूक करतो आहेस. तुला या नात्यात खरंखुरं स्वातंत्र्य नकोय; स्वातंत्र्य ‘द्यावं’ लागेल अशी परिस्थिती आलीच नाही तर तुला जास्त आवडेल. पण ‘प्रेम स्वातंत्र्य देतं’ असं मला पुन्हापुन्हा सांगताना तू ऐकलं आहेस, ते तू अजाणतेपणी स्वत:वर लादतो आहेस, कारण स्वातंत्र्य दिलं नाहीस तर तुझं प्रेम ‘प्रेम’च नाही असं होईल ना!    तू कात्रीत सापडला आहेस: स्वातंत्र्य दिलं नाहीस तर तुझ्या प्रेमावर प्रश्नचिह्न उभं राहील. स...

प्रेम व जवळीक

Image
तुम्हाला प्रेमाची गरज असते; प्रेयसीची, प्रियकराची गरज असते. प्रेमाच्या खळाळत्या प्रवाहात मुसंडी मारण्यासाठी तुमच्या अंगी धाडस असावं लागतं.   हे पाणी कापणं सोपं नसतं - भीतींचे पुष्कळ भोवरे लागतात. अन्य कशाहीपेक्षा तुम्ही प्रेमाला घाबरता कारण... कुणास ठावूक काय घडेल! समोरची व्यक्ती तुम्हाला स्वीकारेल की नाकारेल, कुणी सांगावं! मन भयभीत होतं, तुम्ही डगमगता, कचरता - मनातलं बोलू की नको? त्याच्या/तिच्यापाशी माझ्या भावना व्यक्त करू की नको?   यावर तोडगा म्हणून जगातील समस्त पेदरट मंडळी विवाहसंस्थेचा पक्ष घेत आली आहेत. त्यांनी विवाहबंधनाला प्रेमाहून श्रेष्ठ ठरवलं आहे, कारण याबाबतीत काय करावं हा निर्णय ज्या-त्या व्यक्तीवर सोडल्यास फारच थोड्या व्यक्ती प्रेम करण्यास सरसावतील. बहुतांश माणसं प्रेमाविना जगतील, प्रेमाविना मरून जातील. प्रेम - मोठी खतरनाक चीज आहे.... कोणाही व्यक्तीच्या समीप जाणं म्हणजे एका सर्वथा निराळ्या विश्वाला जाऊन भिडणं, निराळ्या ग्रहाला धडक देणं. पुन्हा तेच - तुमची ती धडक, तुमचा प्रस्ताव स्वीकारला जाईल की झिडकारला जाईल, कुणास ठावूक! समोरची व्यक्ती तुमच्या गरजे...

प्रेमाची झुळूक

Image
प्रेमाचं नातं अतिशय तरल, नाजुक असतं - क्षणोक्षणी बदलणारं, अनिश्चित, अतर्क्य. उद्या काय घडेल, पुढल्या क्षणी काय घडेल कोणी सांगावं! मनात भय दाटतं. मग अनिश्चिततेच्या भीतीपोटी, अज्ञाताच्या भीतीपोटी प्रेमीजन आपल्या नात्याचा घात करतात. विवाहबंधनात अडकतात. माणसं लग्न करतात. त्याद्वारे बदलांना लगाम घालण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. प्रेमाचे बंध दृढ करायचे असतात. ‘प्रेम’...मोठी अजब चीज आहे. ज्याक्षणी तुम्ही त्याला दृढ करता, स्थैर्य देता तत्क्षणी ते असत नाही, उरत नाही; लुप्त होऊन जातं. प्रेम म्हणजे वासंतिक झुळूक! ती येते; आपल्या मदानं, गंधानं सारा आसमंत दरवळून टाकते, नि आली तशी निघून जाते. येते तेव्हा वाटतं, ही चिरकाल अशीच वहात राहील. ही भावना इतकी प्रबळ असते, की तुम्हाला तीबद्दल कणाचाही संदेह वाटत नाही. तीव्र निःशंकतेच्या भरात हरतऱ्हेच्या आणाभाका घेऊन मोकळे! हा केवळ वसंतवारा आहे, याचं भान नसतं तुम्हाला, तुमच्या प्रेमिकाला. वाऱ्याची झुळूक यायची तेव्हा येणार, जायची तेव्हा जाणार. तिचं येणं-जाणं आपल्या हातात नसतं. तिला धरून ठेवता येत नाही. उघड्या तळव्याला तिचा मंद गारवा जाणवतो, सुखावत...

हॅट्स

Image
  हॅट्स   मूळ इंग्रजी कविता: फ्रँक स्टुअर्ट फ्लिंट   { 'अदरवर्ल्ड: केडन्सेस' (१९१८) या कवितासंग्रहातून} मराठी भाषांतर: मुक्ता 'असरार'    ती कडक, करकरीत फेल्ट हॅट तू रुबाबात डोक्यावर ठेवतोस तेव्हा होणारा पोकळ, गोलसर आवाज..   प्रतिध्वनी दुमदुमतोय त्याचा   दोन हजार मैलांवर पसरलेल्या खंदकांत, हज्जारो बंदुकांच्या कंठांतून.   सहस्र सहस्र माणसं ठार झालीत नि कितीक सहस्र जखमाळलीत, पांगुळलीत, बुडून मेलीत - त्या आवाजामुळे.    कोलमडलेली, छिन्नविच्छिन्न शहरं, खेडी बेचिराख, धुळीस मिळालेली, नागवलेली वनस्थानं, ओरबाडून निघालेल्या झाडंवेली, नदीनाल्यांची झालीत गटारं; पोलादाच्या अवशेषांनी बुजबुजलेली   रक्तमांसाने बरबटलेली सडत्या प्रेतांच्या वासाने कुबलेली   सीमांमधली, सीमांपल्याडची ध्वस्त जमीन; भुकेने तडफडणारे देशच्या देश, स्त्रिया व लहानग्यांची कत्तल, प्रतिभेचा चोळामोळा, विद्रूपित, मुरगळलेली मनं.... साऱ्यासाऱ्याचा झालाय उकिरडा, झालीये नासाडी, निव्वळ नासाडी धरित्रीच्या फळाबहराची, वैभवाची  - तुझ्या आवाजाची ताबेदारी करताना. वांझोट्या, अविवेकी...