श्री. अरुण फडक्यांशी झालेला वाद

  * ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *
 
 
श्री. अरुण फडके (१९६० - २०२०) हे मराठी शुद्धलेखन, कोशनिर्मिती इ. क्षेत्रात कार्यरत असणारे लेखक, अभ्यासक होते. 
मार्च २०१८  रोजी पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात श्री. फडके यांचं 'मराठी परिभाषा: कशी नसावी-कशी असावी' नामक व्याख्यान झालं. व्याख्यानानंतर आमच्यात घमासान चर्चा / वाद झाला. वेळेअभावी प्रत्यक्ष मांडता न आलेलं कौतुक, आक्षेप व शंका यांची टिपणं काढून मी श्री. फडक्यांना ईमेलवर पाठवली. त्यांच्याकडून मला उत्तर आलं नाही. असो. ही टिपणं खालीलप्रमाणे:
 
  • भाषेबाबत झपाटून काम करणाऱ्यांतले एक म्हणून श्री. फडके यांचं कौतुक आहे. पण 'मराठीची इंग्रजीशी तुलना करू नये' म्हणतानाच सतत इंग्रजीशी स्पर्धा करण्याचा त्यांचा आवेश ('मराठीतील धातूंची संख्या इंग्रजीहून वाढली पाहिजे' वगेैरे) मला पटला नाही. दोन्ही भाषांचा जन्म व विकास भिन्न पद्धतीने झाला असताना मुळी स्पर्धात्मक तुलना करण्याचं कारण काय?
  • भाषांचा लोप होण्याला भाषांमधील हेवेदावे, भाषांबद्दल उच्चनीचतेच्या भावना सर्वाधिक कारणीभूत आहेत असं मी म्हणेन. केवळ एक भाषा म्हणून - मातृभाषा असो वा परकी भाषा असो - जीवनाचं एक अंग म्हणून भाषेचं व्यवहारापलीकडलं सौंदर्य अनुभवण्याकरता विद्यार्थ्यांची संवेदना जागी केली जात नाही. आजचे भाषाशिक्षक तिथे कमी पडतात हे वास्तव आहे.  
  • कोश कशासाठी असतात? मुळात भाषा कशासाठी असते? भाषा जर फक्त व्यवहाराचीच गरज भागवत असत्या तर शेकडो वर्षांपासून देशोदेशी व्यापार करणारी, राज्य करणारी माणसं एकमेकांच्या भाषा शिकत का बसली असती? त्यांनी संपूर्ण जगाची एकच भाषा का निर्माण केली नाही? कारण सौंदर्याची, स्थानिक पर्यावरणाशी असलेला स्नेह दर्शवण्याची गरजही भाषा भागवत असते. या अर्थाने सर्वच भाषा सुंदर असतात. त्यामुळे भाषिक कोश हे 'ती भाषा जास्तीत जास्त व्यवहारात राहिली म्हणजे झालं' या शुष्क व अधीर भावनेतून तयार व्हावेत असं मला वाटत नाही. पशूपक्षी-वनस्पती, ध्वनिसूचक शब्द हे प्रत्येक भाषेत भिन्न असतात कारण निरनिराळ्या प्रदेशातील लोकांना एखाद्या जीवाची निरनिराळी वैशिष्ट्यं लक्षवेधी वाटतात. हे वैविध्य जपणं, स्थानिक लोकांनी पशूपक्षी-वनस्पतींना दिलेली नावं, ध्वनिसूचक शब्द लक्षात घेणं गरजेचं आहे. 'सतत मीच नवा शब्द निर्माण करणार' हा अट्टहास नको. सहज बोलता बोलता माणसं नवे शब्द तयार करून जातात, ते रूढही होतात. त्यांची दखल घेतली जावी. 
 'कोशांचं सुलभीकरण का नको?' असा प्रश्न फडके यांनी वारंवार मांडला. ज्ञानवृद्धी व्हावी या उद्देशाने माणसे कोश विकत घेतात. त्यातून भाषेचं सुलभीकरण होणार असेल तर  काय उपयोग! कोशासंबंधीचं फडके यांचं त्रिसूत्री प्रारूप मला आवडलं, तरी काही ठिकाणी केवळ मराठीच वापरण्याचा अतिरेक पटला नाही. 'केवळ मराठी' म्हणजे काय? 'संस्कृत इथे संपते, अरबी-फारसी व युरोपीय भाषांचा प्रभाव इथे संपतो आणि या इथे शुद्ध मराठी सुरू होते' असा निश्चित बिंदू आपण काढू शकतो का?

भाषेचं सुलभीकरण म्हणजे विचारांचं सुलभीकरण. सर्व क्षेत्रांत चाललेलं सुलभीकरण व अतिगतिमानता मानवी मेंदूला दुर्बळ, वैचारिकदृष्ट्या आजारी, भ्रमिष्ट व यंत्रवत बनवत आहे. यासंबंधी जगात चालू असलेल्या संशोधनाची  श्री. फडके यांना कितपत माहिती आहे?
हा लेख पहा:
''On Language and Thought: the Dangers of Simplification'' by Ana Maria Sencovici: https://www.linkedin.com/pulse/language-thought-dangers-simplification-ana-maria-sencovici
 
 
  • भाषाव्यवहाराला तंत्रज्ञानाची जी जोड मिळते तिच्या दूरगामी मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय बऱ्या-वाईट परिणामांबाबत श्री. फडके यांना कितपत जाणीव आहे?
भाषेतून होणाऱ्या संपर्काचा वेग हा एकूणच मानवी जीवनाच्या वेगाशी निगडित असतो. जागतिक प्रसारामुळे जसजसा इंग्रजी भाषेतील बदलांचा वेग वाढत आहे तसतसा त्या भाषेत काम करणाऱ्यांना व्यावसायिक, सास्कृंतिक व व्यक्तिगत पातळीवर माहितीच्या स्फोटाच्या दुष्परिणामांचा सामना करावा लागत आहे. आशियातील, आफ्रिकेतील भाषा; जिथे सहायक क्रियापदासारखी वैशिष्ट्ये आहेत, क्रियापदाची सरसकट विशेषणं, नामं बनत नाहीत, ज्यांतून इंटरनेटवर अतिप्रमाणात माहिती टाकली जात नाही; त्या भाषांमधे व्यवहार करणाऱ्यांना माहितीच्या स्फोटाच्या दुष्परिणामांचा तितकासा सामना करावा लागत नाहीय - सध्यातरी. भाषा इंटरनेटवर नेण्याची आकांक्षा हे एक दुधारी शस्त्र आहे. आपण आपल्या भाषांतील ज्ञानाचा वेग वाढवून विकतचं दुखणं मागे लावून घेत आहोत याची जाणीव कितीजणांना आहे?

''Information Overload'' by Jan Ole: http://www.nyu.edu/classes/keefer/com/satta2.html
 
आणखी काही लेख:
 
''Society’s self-destructive addiction to faster living'' by Dr. Stephanie Brown : https://nypost.com/2014/01/04/societys-addiction-to-faster-living-is-destroying-us-doctor/

 ''The Dangers of Information Overload'' by William J. Lynott: http://www.blynott.com/info_overload.html

''Death by Information Overload'' by Paul Hemp: https://hbr.org/2009/09/death-by-information-overload

''Why the modern world is bad for your brain'' by Daniel J Levitin: https://www.theguardian.com/science/2015/jan/18/modern-world-bad-for-brain-daniel-j-levitin-organized-mind-information-overload

''Is information overload affecting memory, creativity, productivity?'': http://workplacestory.com/is-information-overload-changing-the-way-we-think-or-affecting-productivity/

''Pace of life'' by John H. Lienhard: https://www.uh.edu/engines/epi538.htm
 
 
  •  भाषांना संगणकाच्या तालावर नाचवण्याऐवजी संगणकांना भाषेच्या गुंतागुतीची सखोल ओळख करून दिल्यास माहितीच्या स्फोटावर नियंत्रण मिळवता येईल' हा नवा विचार मांडला जात आहे. हा लेख पहा:
With language understanding, computers could lighten ‘information overload’: https://engineering.stanford.edu/magazine/article/language-understanding-computers-could-lighten-information-overload

Comments