हेतूची शुद्धी
सत्याचा शोध घ्यायचाय? मग आपल्या अंगी दोन गोष्टी हव्यात: एक हेतूची शुद्धी आणि दुसरी म्हणजे कुठल्याही प्रामाण्यावाचून जगण्याची हिंमत. आपल्याला नेमकं काय हवं आहे ते मनुष्याला बहुतेकदा कळत नाही. अनेक दिशांनी मनुष्य धावपळ करतो, पण काय मिळालं म्हणजे आतून शांत वाटेल, समाधान वाटेल, तृप्ती येईल...कळतच नाही. तुम्हाला मार्गदर्शक, गुरु हवाय तो तरी कशासाठी? ...आपल्यासाठी काय हितकर आहे हे सांगणारा हवाय का कुणी? आपल्या विचार, भावना, इच्छांना संमती देईल असा कुणी हवाय? आशीर्वाद देणारा कुणी हवाय? करमत नसेल, कंटाळा येईल तेव्हा ज्याच्यापाशी जाऊन बसता येईल असा कुणी मनुष्य हवाय का? जुन्या नातेसंबंधांना मन विटल्यामुळे नव्या प्रकारचा संबंध म्हणून गुरु हवा का? पण त्यानं सांगितलेलं आपल्याला पटलं नाही तर? आपल्या मनाला, 'अहं'ला रुचलं नाही तर? तर काय करायचं? त्याच्या शब्दांची, वचनांची मोडतोड करायची, विपर्यास करायचा? आपल्या सोयीप्रमाणं वाकवून मग ते ग्रहण करायचे? काय हवंय काय? मानसिक संरक्षण हवंय का? आपण जसे आहोत तसा आपल्याला स्वीकारणारा हवाय का कुणी? ही स्वतःची जी ओळख आहे, ती आधी साधली पाहिजे...