पार्वती आणि बाउल

  * ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *
 
 
 पार्वती बाउल यांच्या एका मुलाखतीतून वेचलेले काही परिच्छेद: 
 
लहानपणी कानांवर बाउल संगीत कधी पडलं नव्हतं.

सोळा वर्षांची असताना दृष्यकला शिकण्यासाठी रेल्वेने शांतिनिकेतनला निघाले होते. माझा भाऊ आणि मी गाडीत बसलो होतो. एक अंध बाउल साधू डब्यात चढला. त्याची नजर विलक्षण भासली मला, कारण आख्ख्या बोगीतला सर्वांत निःशंक, निर्धास्त मनुष्य होता तो! त्याच्या हातात एकतारा होता. एकताऱ्याला भोपळ्याच्या जागी काय असेल? - बेबी-फूडचा टिनपाट डबा! त्यामुळं चांगलाच टणत्कार होत होता.
तार छेडली जाताच...कसलीशी अनुभूती आली. जणू सारंकाही विरून गेलं. डब्यातील इतर सर्व आवाज कुठच्या कुठे गायब झाले. (भारतातल्या रेल्वे फलाटांवर, गाड्यांमधे किती गोंगाट असतो, बहुधा पाहिलं असेल तुम्ही: विक्रेत्यांच्या आरोळ्या - ‘चहा घ्या चहा', 'पोहे घ्या पोहे’!) समस्त कोलाहल नाहीसा झाला. केवळ एकतारा घुमू लागला.
साधू गाऊ लागला, जणू दूरदेशीहून साद घालणाऱ्या आवाजात. का कोण जाणे, चिरपरिचित वाटला तो सूर. कुठंतरी नेतोय आपल्याला, असं वाटलं.
गाणं संपलं. मी भानावर आले. मनाने पुन्हा रेल्वे डब्यात, आपल्या जाग्यावर आले. बाउल निघून गेला होता. पुन्हा कधीच, कुठेच दिसला नाही मला तो. या प्रसंगानं हेलावून गेले होते मी. 'पुन्हा बाउल गीतं ऐकायची नाहीत, बाउलच्या नादी लागायचं नाही' असं तिथल्या तिथं ठरवून टाकलं. कारण हे सूर पुन्हा कानी पडताच आपण बाउल होऊन जाणार, एवढं कळून चुकलं होतं मला.
बाउल मंडळींना कटाक्षानं टाळू लागले मी. समोरून बाउल साधू येताना दिसताच झटकन् एखाद्या बोळात शिरायचे, रस्ता बदलायचे.

गंमत म्हणजे आमच्या चित्रकलेच्या प्रोफेसरांनी पहिला गृहपाठ काय दिला असेल, तर 'बाउल साधूंची रेखाचित्रं काढा! त्यांच्या मुद्रा आगळ्या असतात. निरीक्षण करा. बाउल गीतं ऐका. त्यातून जे शिकता येईल ते शिका'. झाली का पंचाईत! मी बाउल गायकांच्या सान्निध्यात वेळ घालवू लागले, तासन् तास त्यांची गीतं ऐकू लागले. हळूहळू पाणी खोल मुरू लागलं. गाणी अनायास मुखस्थ होऊ लागली. मग मी ते यथार्थानं शिकण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फूलमाला दी म्हणून एक बाउल साध्वी होत्या, त्यांच्याकडून शिकले. वर्षभरानंतर त्या म्हणाल्या, "आणखी शिकायचं असेल, तर दीक्षा घ्यावी लागेल."
मी म्हणाले, "चालेल की. द्या मला दीक्षा."
त्या म्हणाल्या, "नाही. मी नव्हे. योग्य, अधिकारी व्यक्तीच तुला दीक्षा देऊ शकेल."
'कोण बरं असेल ही व्यक्ती?' मी विचारात पडले.
काही दिवसांनी सनातन बाबा कॉलेजात आले. आपल्या गाण्यातून कालियाची, कृष्ण-राधेची कथा रंगवली त्यांनी. पुन्हा मला अनुभूती आली. अवघी वृंदावन-नगरी डोळ्यांपुढं साकारली!

मी सनातन बाबांकडे गेले. म्हणाले, "तुमच्याकडून बाउल शिकायचंय मला."
बाबा काहीच बोलले नाहीत. माझ्याकडं पाहून नुसतंच 'हूंss' म्हणाले. किंचित घाबरलेच मी.
काही काळ आमची गाठ पडली नाही.
यानंतर मी सनातन बाबांना शोधू लागले. अखेर त्यांचा आश्रम सापडला. आमची भेट होताच मला काय-काय शिकायचंय, काय करायचंय, कशी दीक्षा घ्यायचीय वगैरे मोठ्या उत्साहानं सांगत सुटले मी.
ते बघत होते माझ्याकडे. "जेवलीस का?" माझं बोलणं संपताच त्यांनी विचारलं.
"नाही."
"जेऊन घे. मग बोलू."
मी जेवले. वाट पाहिली. पंधरा दिवस वाट पाहिली!
बाबा शब्दानंही बोलले नाहीत माझ्याशी.
रोज मी उठायचे. आश्रमात वावरायचे. बाबा माझ्याकडं बघायचे नाहीत, की हसायचे नाहीत. जणू माझं अस्तित्व त्यांच्या खिजगणतीत नव्हतं.

पंधराव्या दिवशी माझा पुरता हिरमोड झाला. काय करू, कुठं जाऊ...काही सुचत नव्हतं. 'सनातन बाबा तर ढुंकूनही बघत नाहीत आपल्याकडे.'
संध्याकाळी बाबा म्हणाले, "चल, जरा पायी फेरफटका मारू."
आम्ही मळ्याच्या दिशेने चाललो. मळ्यात उभे राहून बाबा गाऊ लागले. मी मागे थांबून ऐकत होते. एकाएकी गर्रकन वळून बाबा म्हणाले, "ए वेडे! गा की माझ्याबरोबर!"
काय!? "मी...मी गाऊ तुमच्याबरोबर!?"
यावर ते काहीच म्हणाले नाहीत. अत्यंत मितभाषी होता हा माणूस. शिस्तशीर, आणि प्रेमळही. 
गावच्या बाजारात पहोचताच आम्ही गाणं बंद केलं. तिथली कामंधामं आटोपून परतीच्या वाटेवर पुन्हा मळ्यापाशी आलो. सनातन बाबांनी मघाचं गाणं गाऊन दाखवायला सांगितलं मला. जमलं बुवा कसंबसं! त्यांनी एकदाच गायलं होतं ते.
"हूं... बाई असूनही तुला अक्कल आहे म्हणायचं! ठीक आहे. शिकवीन मी तुला. गाणी तुझ्या लक्षात रहातील, असं वाटतंय. उद्या तुला दीक्षा देतो."
"पण बाबा, गुरुदक्षिणा काय देऊ तुम्हाला?" मी विचारलं.
"गावातल्या पाच घरी जा. हरिब्रह्मनाम म्हण. तांदुळाची भिक्षा माग, नि तो गुरुदक्षिणा म्हणून दे मला -" बाबांचं उत्तर.
 
त्यांनी सांगितलेल्या लोकांच्या घरी गेले मी. दारिद्र्यानं पिचलेली घरं! आधीच ही माणसं इतकी गांजलेली, त्यात मी त्यांच्यापुढे हात पसरायचा?... भयंकर अवघड होतं माझ्या दृष्टीने.
आपल्यापैकी बहुतेकांची जडणघडण असते तशी - याचना करणं, भीक मागण्याबद्दल तिटकारा निर्माण केला जातो आपल्यात. माझ्यावरही तसेच संस्कार झाले होते.
पाटी कोरी करावी लागणार होती. दातृत्वाचा अभिमान, 'सतत काहीतरी देत रहाण्या'ला पराकोटीचं महत्त्व... या गोष्टी मनातून पुसून टाकाव्या लागणार होत्या.
देण्याच्या भावनेने काठोकाठ भरलेले असाल, तर तुम्ही स्वीकार कसा करणार?
अहंकार. मनावर अहंकाराची झापडं असताना आपल्याला त्या गरीब स्त्रीचा दिलदारपणा कळणार कसा!
ती बया साक्षात् गुरुकिल्ली देणार होती मला! - या किल्लीनं अध्यात्माचं दार उघडणार होतं, एका नव्या आयुष्याला वाट फुटणार होती.
मात्र त्यावेळी तिच्यात 'सरस्वती' दिसली नाही मला. दिसली, ती केवळ एक गरीब, बिचारी स्त्री.
 
काय करावं, या विवंचनेत मी घराबाहेर मूक उभी होते. जरा वेळानं स्त्रीच बाहेर आली. मी कोण, तिच्या दारी कशाला आले इत्यादी विचारपूस केली तिनं.
मी सांगितलं - माधुकरी मागायला आलेय.
"मग गा की! मूग गिळून उभी का राहिलीस नुसती?" ती म्हणाली.
मी टाळ वाजवत गाऊ लागले. आवाज थरथरत होता.
"कुणी पाठवलं तुला? ...धड गातासुद्धा येत नाही गं!" स्त्रीची प्रतिक्रिया.
"सनातन बाबांनी पाठवलं मला."
"अच्छा, त्यांनी पाठवलं होय!" स्त्री आत गेली, थोडे तांदूळ घेऊन आली. माझ्या झोळीत टाकले ते तिनं. डोळे मिचकावत हसून म्हणाली, "अजून खूsप वेळ लागणार आहे बरं का, पोरी!”

'खूsप वेळ लागणार आहे' असं म्हणाली ती. मलाही उमगलं ते आतल्या आत.
खरंच, जुनी पाटी कोरी होण्यास खूsप वेळ लागणार होता...

Comments