अदलाबदल
* मूळ कथा माझी नाही, तीतून कसलाही लाभ मिळवण्याचा माझा उद्देश नाही
ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *
अदलाबदल
मूळ इटालिअन कथा: झुम्पा लाहिरी
इंग्रजी भाषांतर: अॅन गोल्डस्टीन
इंग्रजी भाषांतर: अॅन गोल्डस्टीन
मराठी भाषांतर: मुक्ता 'असरार'
एक
बाई होती - व्यवसायाने भाषांतरकार. ती जशी होती त्याहून वेगळं व्हायचं
होतं तिला - कुणी निराळीच व्यक्ती. म्हणजे विशिष्ट व्यक्तिरेखा नव्हती
डोक्यात, पण तिची तशी इच्छा होती खरी.
भाषांतरकार बाईला मित्रमंडळी होती, घरदार, नोकरी होती. जवळ पुरेसा पैसाअडका होता, तब्येत ठणठणीत होती. दैवदयेनं ती सुखी होती, व त्याबद्दल कृतज्ञदेखील होती. ज्या गोष्टींमुळं ती इतरांहून भिन्न ठरत असे त्यांचा मात्र तिला जाच होई. उदाहरणार्थ, आपल्या चीजवस्तू तिच्या डोळ्यांत सलत असत, कारण प्रत्येक वस्तू; तिच्या मालकीची प्रत्येकच गोष्ट तिच्या अस्तित्वाचा दाखला देत असे, तिच्या असण्याला उठाव देत असे. गतकाळातील घटनाप्रसंग आठवताच तिला रुखरुख वाटे - 'हे जरा निराळ्या प्रकारे घडतं तर बरं झालं असतं'.
भाषांतरकार बाईला मित्रमंडळी होती, घरदार, नोकरी होती. जवळ पुरेसा पैसाअडका होता, तब्येत ठणठणीत होती. दैवदयेनं ती सुखी होती, व त्याबद्दल कृतज्ञदेखील होती. ज्या गोष्टींमुळं ती इतरांहून भिन्न ठरत असे त्यांचा मात्र तिला जाच होई. उदाहरणार्थ, आपल्या चीजवस्तू तिच्या डोळ्यांत सलत असत, कारण प्रत्येक वस्तू; तिच्या मालकीची प्रत्येकच गोष्ट तिच्या अस्तित्वाचा दाखला देत असे, तिच्या असण्याला उठाव देत असे. गतकाळातील घटनाप्रसंग आठवताच तिला रुखरुख वाटे - 'हे जरा निराळ्या प्रकारे घडतं तर बरं झालं असतं'.
'अपुरी,
अधुरी आहे मी - पुस्तकाच्या कच्च्या खर्ड्यासारखी'. भाषांतरादवारे
मजकुरावर जसा निराळा साज चढतो तसा निराळाच अवतार घ्यायचा होता तिला.
स्वतःचं अस्तित्व वजा करण्याची इच्छा कधीकधी उफाळून येई - सुरेखशा
ड्रेसच्या काठावर लोंबणारं बाsरीक सूत आपण कात्रीनं टचकन् वजा करतो ना,
तसं.
...छे
छे, आत्महत्येचे विचार नव्हते हे. जगावर, माणसांवर प्रेम होतं तिचं.
कलत्या उन्हात लांबवर पायी फिरायला जाणं, चालताना भवतालाचं निरीक्षण करणं
तिला आवडे. समुद्राच्या गर्द छटा, संधिप्रकाशाचं सोनं, वाळूत थिजलेले
दगडगोटे...शरदातल्या रसाळ पेअरची चव, हिवाळी ढगांआड लुकलुकणारा सुस्त,
वाटोळा चंद्र तिला प्रिय होता. आपल्या बिछान्याची ऊब तिला हवीशी वाटे.
एखादं उत्तम पुस्तक सलग वाचण्याची फुरसत मिळाल्यास स्वतःचा हेवा वाटे. अशा
कित्येक गोष्टींचा आस्वाद घेत युगानुयुगं जीवित राहण्यास तिची ना नव्हती.
तरी
आपल्याला नेमकी कसली खंत वाटते? कशासाठी? हे उमजून घेण्यासाठी एके दिवशी
तिनं आजवरच्या अस्तित्वाच्या खुणा पुसून टाकण्याचा निर्णय घेतला. लहानशा
सूटकेसमध्ये मावेल इतकं सामान वगळता स्वतःजवळ होतं-नव्हतं ते सारं देऊन
टाकलं, अथवा फेकून दिलं.
दुःसहतेला
सामोरं जाता यावं म्हणून भिख्खूप्रमाणं निस्संग व्हायचं होतं तिला.
मित्रमैत्रिणींना, आप्तेष्टांना, तिच्यावर प्रेम करणाऱ्या पुरुषाला 'काही
काळ आपण दूर जात असल्याचं' तिनं सांगून टाकलं.
मग
तिनं मध्यम हवामानाचं, पूर्णतः अनोळखी शहर निवडलं. अगदी साधे कपडे बरोबर
घेतले: एक ड्रेस, एक बूट-जोड, पाच छोट्या बटणांचा एक नर्मलोकरी स्वेटर.
काळंभोर सारं.
ती
त्या शहरात उतरली तेव्हा ऋतू पालटत होता - ऊन अलवार, सावल्या गार. तिनं
भाड्याची खोली ठरवली, सामान टाकलं. चकार शब्द न बोलता तासन् तास चालली,
निरुद्देश भटकली. शहर छान आटपाट होतं, पण त्याला ठाशीव चेहेरामोहरा नव्हता.
पर्यटकदेखील नव्हते तिथं. कानांनी आवाज शोषले, डोळ्यांनी माणसं निरखली:
कुणी कामाच्या धांदलीत, कुणी तिच्याचसारखे बाकड्यांवर बसलेले - उन्हं खात,
पुस्तक वा मोबाईल फोनमध्ये गुंग. भूक लागली की ती काहीबाही विकत घेऊन
बाकावर बसून खात असे. थकली, कंटाळली की सिनेमाला जात असे.
हळूहळू
दिवस आकसत गेले, अंधारत गेले. झाडांचे रंग उडाले, पानं गळू लागली.
भाषांतरकार बाईचं मन रितं झालं. तिला हलकं वाटू लागलं. भिरभिर पानांतलं पान
झाल्याची तिनं स्वतःशी कल्पना केली.
रात्री
शांत झोप लागे. सकाळी निवांत जाग येई. उद्याचे, काल-परवाचे विचार मनात
घोळत नसत. काळावर सावलीहीन तरंगत होती ती. अद्याप जिवंत होती - कितीतरी
अधिक जिवंत वाटू लागलं होतं तिला.
एके
संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडू लागला. ती एका दगडी इमारतीच्या
कंगोऱ्याखाली उभी राहिली. धुवाधार पाऊस. छत्री नाही, डोक्यावर हॅट नाही.
फुटपाथवर हट्टी पावसाचा एकच नाद चाललेला. 'पाण्याचा अखंडित प्रवास तरी किती
विलक्षण! ...ढगातून पडणं, जमिनीत दडणं, नद्यांतून वहात, लचकत-मुरडत,
धावत-बागडत अखेर समुद्राला जाऊन मिळणं.'
रस्त्यात
ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचली होती. समोरच्या इमारतीवर अनोळखी
चिह्नांच्या पाट्या निथळत होत्या. या इमारतीत केवळ स्त्रियांचीच ये-जा सुरु
असल्याचं भाषांतरकार बाईला जाणवलं. कधी एकट्याने, कधी लहान-लहान घोळक्याने
स्त्रिया येत होत्या, गेटशेजारची बेल दाबून आत शिरत होत्या. तिचं कुतुहल
चाळवलं. बघू या तरी आत काय चाललंय!
मुख्य
गेटमधून आत शिरल्यानंतर चौकोनी अंगण ओलांडावं लागणार होतं. इथला पाऊस जणू
छत नसलेल्या खोलीत पडत असल्यागत बंदिस्त होता. भिजता भिजता क्षणभर मान वर
करून तिनं आभाळ पाहून घेतलं.
अंगणाच्या
त्या टोकाला काळोखा जिना होता. ...'पायऱ्या काहीशा ओबडधोबड वाटतात नै?'
जिन्यावरून काही स्त्रिया खाली जात होत्या, काही वर येत होत्या.
वर
टप्प्यावर एक उंच, शेलाटी स्त्री उभी होती. तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर
सौंदर्य टिकून होतं. पांढरे केस बारीक कापलेले होते, तिनं काळ्या रंगाचा
तलम, झिरझिरीत पोषाख परिधान केलेला होता. ठाम आकार नव्हता या पोषाखाला;
पंखांसारख्या लांब, पारदर्शक बाह्या मात्र होत्या. ही वयस्क स्त्री आपले
बाहू पसरून इतर स्त्रियांचं स्वागत करत होती: 'या, या. या ना. पाहण्याजोगं
खूप आहे..'
आत गेल्यावर भाषांतरकार बाईनं इतरांप्रमाणं खांद्यावरली पर्स स्वागत-कक्षातल्या रुंद टेबलावर ठेवली.
स्वागत-कक्ष
संपताच प्रशस्त दिवाणखान्यात तिचा प्रवेश झाला. इथे भिंतीलगतच्या
मांडण्यांवर तऱ्हतऱ्हेचे काळे पेषाख रांगेत लटकत होते. जणू सैनिकी तोऱ्यात,
पण खेळीमेळीनं उभे होते. दिवाणखान्याच्या दुसऱ्या बाजूस काही मंचक
(couches), मेणबत्त्यांचा प्रकाश व त्याचबरोबर फळं, चीज, उत्कृष्ट
चॉकलेट-केकने सजलेलं टेबल असा सरंजाम होता. त्याच कोपऱ्यात एकीकडे तीन
फ्रेम्समधे विभागलेला पुरुषभर आरसा होता - विविध कोनांतून स्वतःकडे बघता
यावं म्हणून.
मालकीणबाई
(ती वयस्क स्त्री) धूम्रपान करत, गप्पा मारत सोफ्यावर बसली होती. इथे सादर
करण्यात आलेली सारी वस्त्रप्रावरणं ही तिची निर्मिती होती. स्थानिक भाषेत
अस्खलितपणे बोलत असली तरी मालकीणबाईच्या उच्चारांना परकी झाक होती. कदाचित
तीसुद्धा 'ति'च्याप्रमाणं परकीय असावी.
'या, या. आपलं स्वागत आहे. ...अहो, खा ना काहीतरी. ...निवांतपणे बघा गं सगळं'.
काही
स्त्रिया अंगावरले कपडे उतरवून मांडण्यांवरले कपडे घालून पहात होत्या,
त्यांबद्दल एकमेकींचे अभिप्राय विचारत होत्या. हात-पाय-नितंबं-कंबरांचा कोण
गोतावळा! व्हरायटी तरी केवढी त्यात! 'एकमेकींना ओळखतात वाटतं साऱ्या.'
भाषांतरकार बाईनं स्वेटर उतरवला, कपडे काढले. आपल्या मापाचे कपडे घालून
पाहू लागली. एकापाठोपाठ दुसरा, तिसरा...जणू तिच्यावर ते काम सोपवण्यात आलं
असावं इतक्या पद्धतशीरपणे. जॅकेट्स, स्कर्ट्स, पँट्स, ड्रेसेस,
शर्ट्स,...रंग एकजात काळा. कापड अगदी हलकंफुल, पोत मऊ.
'प्रवासात
बाळगण्याच्या दृष्टीने एकदम योग्य आहेत आमचे कपडे', मालकीणबाई सांगत होती,
'आरामदायी आहेत; अत्याधुनिक फॅशनचे, बहुपयोगी आहेत. साध्या पाण्यात खळबळून
हाताने धुता येतात. शिवाय कापडाला चुण्या पडत नाहीत.'
पुष्कळ
स्त्रियांनी तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला. काहींनी 'आम्ही तर फक्त
(मालकीण)बाईंनी तयार केलेले पोषाखच वापरतो' असं म्हणत आपली पसंती जाहीर
केली. या कपड्यांच्या खरेदीसाठी इथे, बाईंच्या घरीच यावं लागे. प्रवेश केवळ
निमंत्रितांसाठी - एखादा गुप्त, खाजगी समारंभ जणू!
भाषांतरकार
बाई आरशासमोर उभी राहिली. तिरप्या मानेनं आपली प्रतिमा न्याहाळत. पण
निराळ्याच स्त्रीच्या प्रतिबिंबानं तिचं लक्ष वेधलं. दिवाणखान्याच्या
विरुद्ध टोकाला मेजापाशी बसलेली एक स्त्री. मेजावर इस्त्री होती. त्या
स्त्रीनं आपल्या दातांत सुई धरली होती. शिणलेले डोळे, केविलवाणा चेहरा.
कपडे
बाकी मस्तच होते, कारागिरीत नाव ठेवण्यास जागा नव्हती. भाषांतरकार बाईला
हे कपडे शोभत होते, पण तिच्या काही मनास येईना. शेवटचा कपडा घालून
पाहिल्यानंतर काढता पाय घ्यायचं तिनं ठरवलं. त्या कपड्यांत काहीतरी
विचित्र, स्वतःवेगळं वाटलं तिला. खेरीज आता तिच्यापाशी जे जे होतं त्याहून
अधिक काही गोळा करण्याची, साठवण्याची तिची इच्छा नव्हती.
जमिनीवर,
मंचकांवर, खुर्च्यांवर कपडेच कपडे पडले होते - काळीशार डबकी. जरा शोधाशोध
करताच तिला स्वतःचे कपडे सापडले. अरेच्चा, स्वेटर कुठे गेला?...तिनं सगळे
ढीग वारंवार उपसले, सर्व मांडण्या तपासल्या, स्वेटरचा पत्ता नव्हता. खोली
निर्मनुष्य झाल्यात जमा. भाषांतरकार बाई स्वेटर शोधण्यात गर्क असताना
बहुतेक स्त्रिया निघून गेल्या होत्या. मालकीणबाई शेवटून दुसऱ्या स्त्रीला
बिलाचा हिशेब करून पावती देत होती. राहता राहिली भाषांतरकार बाईच.
तिची उपस्थिती पहिल्यांदाच जाणवल्यागत अनोळखी नजरेनं मालकीणबाईनं तिच्याकडं पाहिलं.
"मग, काय-काय घेतलंत तुम्ही?"
"काही नाही. स्वेटर... माझा स्वेटर हरवलाय, तो शोधत होते."
"ओह्. रंग काय होता?
"काळा.
"अरेरे. एक मिनिट. अगं ए....."
मालकीणबाईनं
दिवाणखान्यात मेजाजवळ बसलेल्या त्या बाईला हाक मारली, तिला खोलीभर
विखुरलेले कपडे उचलून सारंकाही आवरून घ्यायला सांगितलं. मग म्हणाली, "या
बाईंचा काळा स्वेटर हरवलाय. बघ सापडतो का."
"आपली ओळख आहेसं वाटत नाही... या जागेबद्दल कुणाकडून समजलं तुम्हाला?" मालकीणबाई भषांतरकार बाईकडे वळून म्हणाली.
"मी
रस्त्याने जात होते. तुमच्या इमारतीत बायकाच बायका जा-ये करताना दिसल्या
म्हणून सहज आत आले. इथे काय असेल याची मला अजिबात कल्पना नव्हती."
"हं. आमचे पोषाख आवडले नाहीत वाटतं तुम्हाला.."
"आवडले, पण सध्या मला नव्या कपड्यांची गरज नाही."
"तुम्ही कुठल्या, कुणिकडच्या?"
"मी इथली नाही."
"मीही. ...काहीतरी घ्या नं तुम्ही - वाईन? फळं?"
"नको, खरंच. विचारल्याबद्दल थँक्स."
"मॅडम.." मघाच्या त्या मदतनीस बाईच्या हातात एक कपडा होता.
"ते बघा, सापडला तुमचा स्वेटर. एवढा वेळ लपून बसला होता गुलाम!" मालकीणबाई हसत म्हणाली.
भाषांतरकार
बाईनं स्वेटर घेतला. मात्र स्वेटर हातांत येताक्षणीच (घालून
पाहण्याचीसुद्धा गरज नव्हती) तो आपला नसल्याचं तिला जाणवलं. 'हा दुसऱ्या
कुणाचातरी आहे. याची लोकर भरड आहे, रंग विटलाय, साईजही वेगळा वाटतोय.' तरी
तिनं तो अंगात चढवून आरशात पाहिलं. 'छे! स्वेटर आपला नाही यात शंकाच नाही.'
"एक्सक्यूज मी, हा स्वेटर माझा नाही."
"म्हणजे?"
"हा स्वेटर हुबेहूब माझ्या स्वेटरसारखा दिसतोय, पण तो माझा नाही. मला लग्गेच जाणवलं ते. येत नाहीय मला हा नीट."
"तुमचाच
असणार मॅडम तो. सगळ्या बायका आपले कपडे घेऊन गेल्या. एवढा एकच कपडा उरला
होता. जमिनीवर, खुर्च्यांवर कुठेच काही नाही, बघा ना."
तिला
हा स्वेटर मुळी नकोच होता. जणू तो हातांत येताच त्याचं-तिचं भांडण झालं
होतं, नि आता तिला त्याचा तिटकारा येत होता. "हो, सगळं रिकामं आहे, दिसतंय
मला. पण हा स्वेटर माझा नाही, हे नक्की. माझा स्वेटर हरवलाय."
"बरं. इथेच हरवला ना तो? पक्कं आठवतंय ना तुम्हाला?"
"हो हो. ....न जाणो एखादी बाई गडबडीत घेऊन गेली असेल. म्हणजे आमच्या
स्वेटर्सची अदलाबदल झाली असेल. अन्य कुणा ग्राहकाने माझ्यासारखा स्वेटर
घातला होता का?"
"आठवत नाही. जरा थांबा, विचारून पहाते."
मालकीणबाई सोफ्यावर बसली. सिगरेट शिलगावून, झुरके घेत घेत फोन-कॉल्सचा
सपाटा लावला. आज येऊन गेलेल्या प्रत्येक स्त्रीला घडला प्रकार थोडक्यात
सांगून ती स्वेटरबद्दल चौकशी करे. त्यानंतर प्रत्येकीशी आस्थेने
इकड-तिकडच्या चारदोन गोष्टी बोलून फोन ठेऊन देई.
भाषांतरकार बाई खोळंबली होती. कुणीतरी चुकून तिचा स्वेटर आपला समजून नेला
असणार. हा स्वेटर आपला नाही अशी तिची शंभर टक्के खात्री होती.
मालकीणबाईनं
टेलिफोन खाली ठेवला. "मी प्रत्येकीला विचारलं. ऐकलंतच तुम्ही. आज
तुमच्याव्यतिरिक्त कुणीही काळा स्वेटर घालून आलं नव्हतं. ...माफ करा, पण.."
"अहो पण हा स्वेटर माझा नाहीचे मुळी." (भाषांतरकार बाईचा आवाज किंचित चढला.)
पूर्णतः ठावूक होतं ते तिला. मात्र तत्क्षणी तिच्या मनावर प्रचंड
अनिश्चिततेचं मळभ दाटलं. सर्व तथ्यं, सर्वच तर्क मावळले. सुन्न होऊन गेली
ती.
"आमच्या बुटीकला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. बरंय तर मग." मालकीणबाई इतकंच म्हणाली.
भाषांतरकार बाई गांगरली. कमालीचं अस्वस्थ, भकास वाटलं तिला.
स्वतःच्या
निराळ्या आवृत्तीच्या शोधात; स्वतःत कायापालट घडून येण्याच्या अपेक्षेनं
तिनं हे शहर गाठलं होतं. परंतु आपली ओळख, आपला स्व घातकी असल्याचं तिला
कळून चुकलं. हे मूळ उपटताच येत नाही, हा पीळ जळतच नाही. या तुरुंगातून मेली
सुटकाच नाही.
दिवाणखान्याबाहेर पडताना त्या मदतनीस बाईचा निरोप घेण्याची तिची इच्छा होती. मेजापाशी मान मोडून काम करणारी बाई. आता ती तिथं नव्हती.
खिन्न मनाने भाषांतरकार बाई घरी परतली. हवेत पावसानंतरचा कुंद गारवा असल्यानं स्वेटर घालणं भाग होतं.
त्या रात्री ती उपाशीपोटीच झोपी गेली. त्या रात्री तिला स्वप्नं पडली नाहीत.
सकाळी
उठताच तिची नजर खुर्चीवर रुळणाऱ्या 'त्या' स्वेटरवर पडली, नि कसा कोण जाणे
तिला तो परिचित वाटला. तो आपलाच आहे, आपलाच होता, ही भावना तिला लखकन्
स्पर्शून गेली. 'कालचं आपलं वागणं, त्या दोन बायकांशी वाद घालणं किती
अशिष्ट होतं! वेडगळपणाचं होतं!'
अन्
तरी काल-परवापर्यंत तो स्वेटर 'तिचा' होता असं म्हणता आलं नसतं. काल तिनं
जो स्वेटर धुंडाळला तो हाच होता, नि नव्हताही. आता तिला त्याचा राग येत
नव्हता. उलट अंगात चढवताच आता तिला आवडला तो. हरवलेला स्वेटर शोधण्याची आता
जरूर नव्हती - आता ती त्याबद्दल हळहळत नव्हती.
नवखा स्वेटर घातल्यानंतर तीसुद्धा नवखी होऊन गेली.
नवखा स्वेटर घातल्यानंतर तीसुद्धा नवखी होऊन गेली.
प्रवाही, वाचनीय आणि वेगळी आहे कथा.
ReplyDeleteआपलं, ओळखीचं, सवयीचं जे आहे त्याविषयी विचार सुरू होतो हे वाचताना.