अदलाबदल
* मूळ कथा माझी नाही, तीतून कसलाही लाभ मिळवण्याचा माझा उद्देश नाही ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. * अदलाबदल मूळ इटालिअन कथा: झुम्पा लाहिरी इंग्रजी भाषांतर: अॅन गोल्डस्टीन मराठी भाषांतर: मुक्ता 'असरार' एक बाई होती - व्यवसायाने भाषांतरकार. ती जशी होती त्याहून वेगळं व्हायचं होतं तिला - कुणी निराळीच व्यक्ती. म्हणजे विशिष्ट व्यक्तिरेखा नव्हती डोक्यात, पण तिची तशी इच्छा होती खरी. भाषांतरकार बाईला मित्रमंडळी होती, घरदार, नोकरी होती. जवळ पुरेसा पैसाअडका होता, तब्येत ठणठणीत होती. दैवदयेनं ती सुखी होती, व त्याबद्दल कृतज्ञदेखील होती. ज्या गोष्टींमुळं ती इतरांहून भिन्न ठरत असे त्यांचा मात्र तिला जाच होई. उदाहरणार्थ, आपल्या चीजवस्तू तिच्या डोळ्यांत सलत असत, कारण प्रत्येक वस्तू; तिच्या मालकीची प्रत्येकच गोष्ट तिच्या अस्तित्वाचा दाखला देत असे, तिच्या असण्याला उठाव देत असे. गतकाळातील घटनाप्रसंग आठवताच तिला रुखरुख वाटे - 'हे जरा निराळ्या प्रकारे घडतं तर बरं झालं असतं'. 'अपुरी, अधुरी आहे मी - पुस्तकाच्या कच्च्या खर्ड्या...