पशू असण्यात गैर ते काय?

 * ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *
 
 
प्रश्न: ओशो, तू म्हणालास, की स्वीकारातून परिवर्तन घडतं. पण मी जेव्हा आपल्या इंद्रियांचा, कामना, वासनांचा स्वीकार करतो तेव्हा परिवर्तित वाटण्याऐवजी मला पशुवत् (animal-like) वाटतं - का बरं असं?
 
ओशो रजनीश: तेच तुझं परिवर्तन आहे. तेच तुझं वास्तव आहे. पशू असण्यात वाईट ते काय? पशुत्वात कमीपणा कसला? खऱ्या अर्थाने 'प्राणी' म्हणवण्यालायक मानव अत्यंत दुर्मिळ होत चाललेत या जगात. 
डी. टी. सुझुकी म्हणायचा, 'माणसापेक्षा बेडकाप्रती मला जास्त जिव्हाळा आहे, जास्त आदर आहे. तळ्याकाठी बसलेला बेडूक पहा कसा स्तब्ध, शांत असतो. ध्यानाचा अभ्यास न करता, प्रयत्न न करता, आव न आणता ध्यानस्थ होतो बेडूक. त्याला भवतालाचा त्रास होत नाही, त्याच्या ध्यानात कशानेच व्यत्यय येत नाही. ...बसून राहतो तासन् तास, सकळ अस्तित्वाशी तादात्म्य पावतो.' 
'अबोध होतो तेव्हा माणूस होतो, बोधाच्या क्षणापासून (enlightenment) मी मांजर झालो,' असं म्हणायचा सुझुकी. 

पहा एखाद्या मांजराकडे, निरीक्षण करा. निवांत असतं ते. शिथिलतेचं, तणावमुक्तीचं रहस्य जणू ठावूक असतं त्याला - पुस्तकं न वाचता, कसलंही प्रशिक्षण न घेता. 'निवांततेची कला' तज्ञांकडून काय डोंबल शिकता, मांजरांकडून शिका. मांजर निवांत, विश्रांत तर असतंच, पण विश्रांतीतही ते सजग असतं. आपली निवांतता म्हणजे पेंगुळणं, झोपाळणं, आळसावणं. मांजर झोपेतदेखील सावध असतं. 
किती विलक्षण लवचिकता असते मांजराच्या शरीरात, हालचालींत - ताठरता, आखडलेपणाचा लवलेश नाही! ऐटीत, आरामात चालू असतो कारभार सगळा. 

मी म्हणतो प्राणी असण्यात गैर ते काय? अहंकारापोटी माणूस तुलना करतो, पशुपक्ष्यांकडे तुच्छतेने पहातो. 'आपण पशुंहून श्रेष्ठ आहोत' म्हणे! तसं असेल तर विचारा कुठल्याही प्राण्याला, 'बाबा तुला माणूस व्हायची इच्छा आहे का?' कुठलाच प्राणी, पक्षी राजी होणार नाही. पशुपक्षी स्वस्थ असतात, सुखी असतात, समग्र अस्तित्वाशी एकरूप असतात. ते चिंता करत नाहीत, तणावग्रस्त होत नाहीत. ते धर्म स्थापत नाहीत, त्यांना तशी गरजच पडत नाही. त्यांना मनोविश्लेषकांची, मानसतज्ञांची गरज पडत नाही - ते अविकसित आहेत म्हणून नव्हे, तर ते अशाप्रकारचे गुंते निर्माण करत नाहीत म्हणून.
 
 
काय वाईट आहे प्राण्यांत, सांग. का म्हणून कमी लेखतोस त्यांना? कशाला हा तिटकारा?
मानवी अहंकाराचा भाग आहे तो, दुसरं-तिसरं काही नाही. सजीवांच्या उतरंडीच्या (hierarchy) सर्वोच्च स्थानी आपण आहोत असं माणसाला उगाच वाटतं. पण कुठाय सृष्टीत तशी उतरंड? श्रेष्ठ-कनिष्ठता, उच्च-नीचता आहे कुठे निसर्गात? बरं, उतरंडीसंदर्भात त्यानं किमान अन्य पशुपक्ष्यांचं मत विचारात घ्यावं, तर तेही नाही. डार्विन म्हणतो माणूस माकडापासून उत्क्रांत झाला. माकडांना विचाराल तर ती म्हणतील, मुळात मानव ही अवक्रांती आहे, उत्कर्ष नसून अपकर्ष आहे!
भयंकर स्व-केंद्रित आहे हो मानवप्राणी. अहंकाराच्या धुंदीत वाट्टेल ते बरळत असतो. तुलना म्हणजे शुद्ध फालतूपणा.
 
तुला पशुवत् वाटतं, तर वाटू देत की. माझ्यामते त्यात काहीच गैर नाही. प्राणी हो तू, पूर्णांशाने हो - अखंड सजगतेने तुझं पशुत्व अनुभव. सजग झालास की आधी तुझं पशुत्व प्रकटणार, कारण या क्षणी तेच तुझं वास्तव आहे. तुझी ती उदात्त 'मानवता' बेगडी आहे, वरवरची आहे. सोंग आहे ते.
कुणी तुझा आपमान केला की तुझ्यातला पशू बघ कसे सुळे दाखवतो. कुणी वाईट-साईट बोललं, की तुझ्यातला पशू डरकाळी फोडून प्रत्युत्तर देतो. त्यात मानव असतो कुठे? माणूस नसतो तिथे, कारण तुझी मानवता, माणूसपण हे थोतांड आहे. सारंकाही स्वीकारू लागलास, की प्रथम मानवतेचा हा पापुद्रा वितळून जाईल, गायब होईल. आपल्या जित्या-जागत्या पाशवीपणाशी तुझी ओळख होईल. वास्तवाचं नीट भान येणं केव्हाही उत्तम. असाच सजग राहिलास, तर पशुत्वातच तुला दैवित्वाचा (divine) प्रत्यय येईल. नकली मानवतेपेक्षा अस्सल पशुत्व कधीही चांगलं, नाही का? 
सत्य महत्त्वाचं.
 
....पशुत्व ही समस्या नाही, बिलकुल नाही. भंपकपणा, खोटारडेपणा ही समस्या आहे. मानवतेचा बुरखा कशाला पांघरता? प्राणी आहात, प्राणी म्हणून जगा. वास्तवातच अवघा रस, सारा आशय भरून आहे. 
जसजशी सजगता उत्कट होत जाते तसतशी पशु-कायादेखील पालटते .. उरतं केवळ दैवित्व.
आणि फक्त तुम्हीच दैवी नसता हं, लक्षात घ्या - सर्वच पशुपक्षी, सर्वच जीव दैवी असतात. झाडंवेली, दगडगोटे.. सर्वत्र 'त्या'चा अंश आहे, त्याचा वास आहे. सारी त्याचीच रुपं, त्याची लीला आहे. मूलस्रोत आहे तो साऱ्याचा. खोटेपणाने तुम्ही त्यापासून दुरावता, अस्सलपणे जगू लागलात की तुम्ही त्याला स्पर्श करता, तुम्हाला ते गवसतं. 


Comments