घंटा घंटा घंटा घंटा घंटा - प्रतिकाराच्या थिटेपणाची!
* ईमेल-खातं बदलल्यामुळे ही जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. कलाकृतीबद्दल बोलताना कोणाचाही रसभंग व्हावा असा हेतू नसतो पण दुर्दैवाने तो होऊ शकतो. *
व्यावसायिक
तथा चुचकारू प्रायोगिक नाटकांमधील ठोकळेबाज नेपथ्य, पटकथा, विनोद; बौद्धिक
शिथिलता, राजकीय औदासीन्य, गबाळ वर्तमान संदर्भ इत्यादी घटकांना टक्कर
देणारी नाटकवाली मंडळी पुण्यात दीडेक दशकांपासून सक्रिय आहेत. व्यक्तिगत
कामं करता करता वेळोवेळी एकत्र येऊन हा कंपू नाट्यनिर्मिती करतो. ('कंपू'
शब्द इथे तटस्थपणे वापरतेय मी.) खूप चांगली गोष्ट आहे. परंतु ही
नाटकंसुद्धा ठोकळेबाज जाणीवांमधूनच उगम पावत असल्यामुळे - ते ठोकळे विजोड,
विषमभुज, उत्तर-आधुनिक, अॅबस्ट्रॅक्ट धाटणीचे असले तरी; खुर्च्यांच्या
पाठीला पट्ट्या कमी-जास्त असल्या,
एकोणिसशेसाठ-सत्तरांतली बंडखोर गाणी वाजली, मंचावर निर्धास्त चुंबनं झडली
तरी - शेवटी 'यांचे' ठोकळे व 'त्यांचे' ठोकळे एवढाच काय तो फरक उरतो.
माझ्यामते बहुसंख्य नाटकांप्रमाणं या कंपूचं ना्ट्यदेखील झेप घेण्यास असमर्थ ठरतं. ते निराळ्या पद्धतीनं वावरतं, पंख फडफडवतं इतकंच.
सॅम
श्टायनरच्या 'लेमन्स लेमन्स लेमन्स लेमन्स लेमन्स' (प्रकाशनवर्ष २०१५)
नाटकाचं 'घंटा घंटा घंटा घंटा घंटा' नावानं मराठी रुपांतर करताना मूळ
संहितेत किती व कसे बदल घडवले गेले, एकंदर प्रक्रिया कशी उलगडली याची मला
कल्पना नाही. नुकत्याच मंचित झालेल्या या नाटकाबद्दलची प्रस्तुत बडबड ही
सॅम किंवा निरंजनपेक्षाही स्वतःशी केलेली चिकित्सा आहे असं मी समजेन. अन्य
कोणी माझं लेखन वाचो / न वाचो, आपल्याला नाटक कसं दिसलं हे मीच नीट जाणून
घेतलं तरी पुरे:
संगीतकार आदित्य आणि वकील फिरोज़ा. तरुण जोडपं. दैनंदिन संभाषणात नागरिकांनी किती
शब्द वापरावे यावर जाचक निर्बंध लादणारा कायदा देशात लागू होतो. 'आदित्य' व
'फिरोज़ा'ला या कायद्याबद्दल काय वाटतं, त्यांच्या नात्यावर एकूण
परिस्थितीचा काय परिणाम होतो... अशी एकूण कथा आहे.
'आदित्य'
बऱ्यापैकी निवांत, मात्र जराशा चिथावणीनं क्षुब्ध होणारा. ललितचा चेहरा
पहिल्या प्रवेशापासून थकलेला दिसत होता, त्यामुळं पात्राचे निश्चिंत,
निरागस क्षण समर्पक वाटले नाहीत. संगीतकाराला अनेक वाद्यं वाजवता आलीच
पाहिजेत, असं नव्हे - प्रत्येकच वाद्य वाजवण्याचा अभिनय सुमार झाल्यानं ही
बाब आणखी खटकली. (वादनाच्या दृष्यांतील ध्वनिला प्रतिध्वनि देण्याची गरज नव्हती.)
'आदित्य'च्या
संगीतविषयक चिंतनाची, मतांची, सांगीतिक व्यक्तित्वाची, वाटचालीची झलक फार
क्षीण वाटते. त्याचं संगीत त्याला स्वतःला कसं वाटतं, आणि जगाला, उदा.
त्याच्या प्रेयसीला
कसं वाटतं या दोन दृष्टिकोनांतील अंतर प्रेक्षकाला (म्हणजे मला) विविध
अंगांनी जोखता येत नाही. ('फिरोज़ा' संगीताबाबत कमालीची उदासीन असूनसुद्धा
हे नातं टिकलंय? - Anything is possible!)
सांगीतिक
आह्वानं पत्करण्याची टाप नाही म्हणून 'आदित्य' राजकीय घटनांच्या दगडावर
स्व-भानाची तलवार परजतो का? लोकचळवळीत सामील होऊन आत्मनिष्ठेचं पोषण करू
पाहतो का? प्रेक्षकाप्रमाणंच 'फिरोज़ा'लासुद्धा हे प्रश्न पडतात. परंतु ती
तिच्या व्यक्तिगत समस्यांत - अविश्वास, न्यूनगंड, संभ्रम, कामाचा
रगाडा...पुन्हा पुन्हा कैद होते. They can't reach out as much as they
would like.
कधी
एकमेकांचा प्रामाणिक आरसा होणं, कधी खोटं बोलून एकमेकांना खूष करणं, कधी
अहंकाराचे डंख मारणं... 'आदित्य-फिरोज़ा'च्या नात्याचे पैलू प्रकटत असतानाच
तथाकथित 'मुस्कटदाबी' कायद्याचं अरिष्ट ओढवतं. ही दोघे एकमेकांसाठी
'रोजच्या कोट्या'तील शब्द वाचवतात, अनेक शब्द जोडून चमत्कारिक संक्षिप्त
रुपं तयार करतात, सरकारचा निषेध करतात, व्यवस्थेला शिव्याशाप देतात, पण
गंमत म्हणजे नाटकाचा तडतड-बिंदू असलेला कायदा लागू झाल्यानंतरही त्यांच्या नात्यात
मूलभूत बदल घडत नाही. ते बव्हंशी पूर्वीसारखं रहातं - माझ्यामते यातच
'लेमन्स...' ऊर्फ 'घंटा...'मधील काल्पनिक दुःसृष्टी (dystopia)ची आत्मिक /
आध्यात्मिक अप्रगल्भता सामावलीय.
मुळात आपण सारे दुःसृष्टीत (dystopia) शिरतोय ही गोष्ट नाटकात सुस्पष्टरित्या मांडली गेलेली नाही. प्रेक्षक सारंकाही तर्कानं ओळखेल
हे गृहीत धरण्याचा अतिरेक झालाय. म्हणूनच बंडखोरीची हौस असलेला 'आदित्य'
एका कचरा कायद्याबाबत उगाच अकांडतांडव करतोय की काय, असं 'फिरोज़ा'प्रमाणं
प्रेक्षकालाही भासतं.
दुःसृष्टीत
सापडण्याचं गांभीर्य ही झटपट दाखवण्याची गोष्ट नव्हे. तसं असतं, तर कुठलीच
हुकूमशाही इतक्या प्रभावीपणे समाजावर स्वार न होती. बटबटीत प्रतीकांद्वारे
- नायकाच्या हातांत '1984' कादंबरी दाखवून - गुंडाळता येणारच नाही हा
प्रवास. दडपशाहीचा फास हा अत्यंत सावकाश, बेमालूमपणे आवळला जातो. हे सावट
विषारी धुक्यासारखं हळूहळू पसरत जातं. सर्वंकष सत्तेच्या बाळपावलांकडे,
तिच्या सूक्ष्म चाहुलींकडे समाज नेहेमीच दुर्लक्ष करतो. घुसमटीकडे
प्रारंभिक दुर्लक्ष व तिच्याशी अंतिम विद्रोह या दोन्ही गोष्टी माणसं
निव्वळ स्वार्थप्रेरणेतून, मजबुरीतून करतात. समस्येच्या मुळाशी जाण्याची
धीरोदात्तता न बाळगल्याने प्रत्येक प्रतिक्रिया, प्रतिकार, संघर्ष, बाह्य
क्रांती ही तोकडी पडते, अप्रगल्भ ठरते. यावर जराही दृढचिंतन झालं
नसल्यामुळे 'आदित्य-फिरोज़ा'च्या समाजाचा इथवर झालेला प्रवास दर्शवण्यात
नाटक अपयशी ठरतं. (- हे सारं दीड-दोन तासांत मांडणं शक्य नाही, अशी तक्रार
असल्यास माझ्याशी संपर्क साधा. मी चित्रपटांची यादी पाठवेन तुम्हाला. खरंच.)
'नागरिकांनी दैनंदिन वाचा-व्यवहार १४० शब्दांत उरकावा' हा नियम धादांत मूर्खपणाचा आहे. दुःसृष्टीतील प्रशासनाच्या नख्या लोकजीवनामधे किती खोल रुतत चालल्यात, सत्ताधाऱ्यांची नियंत्रणलालसा किती नीच थराला गेलीय हे त्यातून दिसतं. परंतु
या कायद्यामागची पार्श्वभूमी, त्याच्या आवश्यकतेबद्दल सत्ताधाऱ्यांनी
केलेली जाहीर प्रतिपादनं इ.विषयी प्रेक्षकाला आणखी टिपा देणं गरजेचं होतं.
वर्चस्ववादी
वृत्ती, तीमागील भयरोग, सत्ता आणि संधीसाधू जनतेकडून तिचं केलं जाणारं
समर्थन हे वर्चस्ववादातून घडणाऱ्या कृत्यांपेक्षा अधिक भयानक असतं. माणसं
नियम-अटींमधून पळवाटा शोधतात यथावकाश. मात्र या ओघात लोकांना दुटप्पी जीवन
जगावं लागतं, मुखवटे मिरवावे लागतात. अधिकारशाहीग्रस्त जीवनामुळं आपलं
अंतःकरण भ्रष्ट होतं, आत्मा कलुषित होतो, बुद्धीचा लोळागोळा होतो,
संस्कृतीला कीड लागते - ही खरी शोकांतिका आहे. नाटकातील दुःसृष्टी बघून प्रेक्षकाला या सत्याची झळ बसत नाही, त्याची दाहकता अंगावर येत नाही. सदर
नाटक शब्दांसंबंधीच्या जाचक कायद्याभवती फिरत असलं, तरी नाटकाबाहेरील
वास्तवाचे डिट्टो संदर्भ देण्याऐवजी त्यांवर आधारित काल्पनिक संदर्भांचा
विस्तृत पट रंगवणं योग्य ठरलं असतं. पात्रांच्या जगण्यातील व भवतालातील
उद्विग्नता मग अतिशय प्रत्ययकारी वाटली असती.
सरकारनं
शब्दांच्या दैनंदिन वापरावर कायदेशीर मर्यादा आणणं दुर्दैवी आहे यात शंकाच
नाही. परंतु कुठल्याही वस्तू/व्यक्ती/क्रियेचं मोल आपल्याला ती
दुरावल्यावर जाणवतं, हे मानवी मनाचं व्यंग आहे. कायदा लागू होण्याआधी आपण
काय करत होतो? - तासन् तास एकमेकांसमोर बसून मोबाईल चाळत होतो. शब्दांच्या
'रेशनिंग'मुळं जे मौन आपल्या वाट्याला येतंय, त्याचा जाणीवपूर्वक आस्वाद
आपण घेतोय का? पूर्वी तर शांततेसाठीही आपण मरमर करत असू - त्याचं काय?
कित्येक गोष्टी शब्दांत व्यक्त करता येऊच शकत नाहीत, असा दावा करत असू -
त्याचं काय?
निःशब्दतेची,
नीरवतेची भीती वाटू लागलीय का आपल्याला आता? गोंगाट, कर्कशता, झणझणीत
प्रतिक्रिया हेच आपलं सहजीवन, समाजजीवन होऊन गेलंय का? आवाजाचं व्यसन
लागलंय का आपल्याला?
...'आदित्य-फिरोज़ा'ला
हे प्रश्न कधीच पडत नाहीत? ती याबाबत अंतर्मुख होऊ शकत नाहीत?
...अभिव्यक्तीची गळचेपी करणाऱ्या पोरकट कायद्याला आपण पोरकटपणेच विरोध
करणार का? - त्या कायद्याच्या अनाहूत परिणामांवर, त्यामुळं लाभलेल्या
अनपेक्षित संधींवर निखळ दृष्टी न टाकता?
१४०
शब्दांपलिकडे बोलता येत नाही म्हणून मनात शब्दांची ओझी साचतायत, की सतत
संभाषण साधावं लागण्याचा ताण कमी होतोय? शक्यता चाचपडण्याची क्षमता
पात्रांमधे नक्कीच आहे, परंतु नाटककार त्यास राजी नाही. म्हणूनच सर्वांगीण
मुक्तीची भीक बाह्य शक्तीकडून मागण्याची सनातन चूक 'आदित्य'देखील करतो.
स्वातंत्र्य पेलण्यास ज्यांची मनं सिद्धच झालेली नाहीत, त्यांनी आपल्या
आचार-विचाराला मान्यता द्यावी असा आग्रह धरून तो फुरंगटतो, मोर्चे काढतो,
विटा फेकतो...'फिरोज़ा'ही (बहुधा नातं टिकवण्याच्या आसोशीतून) त्याला भाबडी
साथ देते.
नाटक
तडकाफडकी संपणं ही पटकथेची अपरिहार्यता बिलकुल नव्हे. अनवट, अवलिया
शक्यतांची दारं उघडण्यास नाटककार उत्सुक नसल्यामुळे काही वेळानंतर नाटकातील
रस आटून जातो!
बाकी ढग मस्त होता.
© मुक्ता असनीकर
* लेखिकेनं 'घंटा घंटा घंटा घंटा घंटा' नाटकाचा प्रयोग २० ऑगस्ट २०२३ रोजी 'द बॉक्स', पुणे येथे पाहिला. *
Comments
Post a Comment