नाटक नाटकी असलंच पाहिजे का?
* ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय.
कलाकृतीबद्दल बोलताना कोणाचाही रसभंग व्हावा असा हेतू नसतो पण दुर्दैवाने तो होऊ शकतो.*
नाटकांच्या नाटकीपणाचा एखाद्याला वैताग येत असेल तर? - एखाद्याला म्हणजे मला.
होय,
नाटकाच्या सादरीकरणातील, विशेषतः अभिनयातील नाट्यातिरेकाचा मला वीट येतो.
नाटकांच्या गावी फारशी जात नाही मी. (प्रस्तुत लेखनाला किती महत्त्व
द्यायचं, हे वाचणाऱ्यानं स्वतः ठरवावं!)
परंतु नाटक लिहीण्याची हुक्की आली म्हटल्यावर तंबूत शिरायलाच हवं.
आजवर पुण्यातच पाहिलेल्या मोजक्या प्रायोगिक नाटकांपैकी (- व्यावसायिक नाटकांमुळे मेंदूचं आरोग्य बिघडण्याचा धोका वाटतो -) मानव कौलची नाटकं वगळता बहुतांश नाट्याविष्कार संहितेत कच्चे व (म्हणूनच की काय) सादरीकरणात कर्कश, छापपाडू वाटले. (गोळीबंद
संहिता, तडाखेबाज सादरीकरणातून काळजाला भिडलेलं परंतु काळजात भिनू न शकलेलं एक नाटक म्हणजे 'दि कंपनी थिएटर'चं 'टेकिंग
साइड्स'.)
'दि ट्रायलॉग स्टुडिओ' निर्मित 'तानसेन' नाटकाचा समावेश माझ्यामते दुर्दैवानं या जंत्रीत होतो.
'दुर्दैवानं'
म्हणण्याचं कारण: नाटकभर बऱ्याच शक्यता उमलू पाहतात, कल्पनाबीज खणखणीत
आहे; गायक/कलाकार सक्षम आहेत, कष्टाळू आहेत, परंतु ज्या गोष्टींचा
सहजप्रत्यय नाटकातून यायला हवा, त्या गोष्टी आपापल्या पात्रातून वारंवार
बाहेर पडून ही मंडळी प्रेक्षकांना थेट सांगत बसतात. नाटकाद्वारे
प्रेक्षकाशी संवाद साधणं, जीवन-मरणाच्या तारा छेडणं म्हणजे प्रेक्षकांशी
गप्पा मारणं नव्हे!
ही
participative थेरं कशासाठी? तुमच्यासमोर या खुर्चीत बसले याचाच अर्थ
रंगमंचावर चाललेल्या एकूणेक हकीकतीत मी participate केलंय. आता नाटकातून जे सांगायचं ते खुद्द नाटकाला सांगू द्या.
संहितेला
बोलू द्या, संगीताला बोलू द्या; नेपथ्याला, वेशभूषेला, पात्रांच्या
मंचावरील अस्तित्वाला बोलू द्या नं माझ्याशी. गप्पा मारू हवं तर
प्रयोगानंतर.
संवाद
असो वा संगीत, आवाजाचा मारा केल्याने जर काही साध्य होत असेल, तर ते
म्हणजे प्रेक्षकाला बसणाऱ्या कानठळ्या व होणारी डोकेदुखी. हल्ली
प्रेक्षकांनाही त्याचं काही वाटत नसावं... सर्वांचीच इंद्रियं संवेदन-बधिर
होताहेत. शिवाय चालू प्रयोगात कुठे सूचना करा!
तर
ध्वनिचा कहर झाल्यामुळे नाटकातील पात्रांचं गाणं कितीदातरी अंगावर आलं.
संगीताचा माझ्यावर प्रभाव पडण्याऐवजी मी वारंवार त्यातून बाहेर फेकली गेले -
बुक्की मारताच उडून पडावं, तशी. तानसेनचं गाणं ऐकून तत्कालीन श्रोत्यांची
ही अवस्था नक्कीच होत नसावी.
गायकीसुद्धा
किती आक्रमक! ध्रुपद की काय ते... मला शास्त्राचा गंध नाही. पण त्यात
जराही मार्दव नसावं? छे. खरं म्हणजे अमाप यश-कीर्तीपायी तानसेनला झालेला
गर्व दर्शवण्याकरता या गोष्टीचा उत्तम वापर करता आला असता. त्याच्या गायकीत
सूक्ष्म बदल घडवता आले असते, आवाजाला कोरडी धार आणता आली असती.
पण
कलाकार आमच्यावर प्रभाव पाडण्याच्या आटापिट्यात गुंतले होते...
प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा एवढा अट्टहास? कशासाठी? - ठोस प्रतिक्रिया
मिळवण्यासाठी? प्रेक्षागह सुन्न झालं, मूक आसवं ढाळू लागलं, आनंदानं स्तब्ध
झालं; अस्वस्थ, रिकामं झालं तर बिघडलं कुठे? नाहीतरी तुमचा-आमचा संवाद हा
नेणिवेचा संवाद आहे. जाणिवेच्या नौकेत बसलोत आपण इतकंच.
तानसेन स्वतः performng artist असल्यामुळे नाटकाद्वारे याही मुद्द्यात शिरता आलं असतं.
'कलाकार
कशाच्या शोधात असतो नेमका?' हा प्रश्न थेट उपस्थित करूनदेखील नाटक या
प्रश्नात खोल बुडालं नाही, असं मला वाटतं. लिहा-ऐकायला बऱ्या वाटतात असल्या
गोष्टी.
लेखक-दिग्दर्शक-अभिनेत्यांनी
स्वतः या प्रश्नाचा पुरेसा वेध घेतल्याची अनुभूती मला आली नाही. त्यांच्या
आवाजात थकवा जाणवला. सततच्या दौऱ्यांमुळे, जागरणांंमुळे असेल. याच तर
निरीक्षण करण्यालायक गोष्टी आहेत! यातच तर मजा आहे. जिला फुलापरी जपायची
त्या कलेचं अखंड प्रदर्शन करत आपण तना-मनाची हेळसांड करतो...जरा म्हणून
विश्रांती नाही.. जगण्यात नसेल, तर ती नाटकातही दिसणार नाही. मग तानसेनच्या
लकेरींमुळे हवेत पसरलेला आर्द्र गारवा आम्हाला जाणवेलच कसा? त्याची झलक
मिळेलच कशी?
तोंडाने म्हणायचं, 'तानसेनच्या गाण्याने खरोखर दीप पाजळले की नाही, कुणास ठावूक!'
मनातल्या
मनात म्हणायचं, 'शक्यच नाही. ही तर शंभर टक्के दंतकथा'. बघणाऱ्याला हा
दुटप्पीपणा जाणवतो! 'आपलं अंतःकरण इतरांना दिसत नाही', या भ्रमात
प्रत्येकजण डोळे मिटून दूध पीत असतो. दिसत नसलं तरी जाणवतं ते.
'खरंचच
दीप पाजळले का हो?' या प्रश्नाचं उत्तर देण्याची जबाबदारी नाटककारावर
नाही. श्रोत्यांचं अंधश्रद्धा निर्मूलन करण्याची जबाबदारीदेखील त्याची
नव्हे. पण ज्या व्यक्तीच्या गायनाबाबत अशा कथा प्रसृत होतात, ती व्यक्ती
कशी असेल? तो देह, ते मन, ते जीवन, ती अदाकारी कशी असेल?
या रहस्यात नाटकानं डुंबणं, प्रेक्षकाला डुंबवणं अपेक्षित होतं.
तसं घडलं नाही.
गाण्यामुळे
खरंच पाऊस पडू शकेल का? ज्योती उजळू शकतील का? - या प्रश्नांची गूढरम्यता
अनुभवायची, तर मन परीकथा वाचणाऱ्या बालमनाइतकं हलकं, निर्भार हवं. काहीही
सिद्ध करण्याचा / खोडून काढण्याचा आग्रह नको. प्रेक्षकांच्या बुद्धीविषयी
कोणतीही गृहितकं नकोत - यारितीनं कला करण्याची आपल्याला आस आहे का, हा खरा
प्रश्न.
मोजक्याच
नटांनी आळीपाळीने विविध पात्रं साकारणं ही कल्पना रंजक होती. यातून
द्वैत-अद्वैताचा प्रत्ययकारी खेळ मांडता आला असता, मात्र संहितेतील
दुर्लक्षामुळे ही गोष्ट गंमतीच्या पातळीवरच राहिली.
सांसारिक
स्थैर्य मिळाल्यावर तानसेन सुस्तावला म्हणजे काय? कलात्मक बस्तान
बसवल्यावर तानसेनला गर्व झाला म्हणजे काय? - 'स्थैर्य, पदप्रतिष्ठा, वैभव,
व्यासंग म्हणजे परिपूर्णता, श्रेष्ठता' या भ्रमाच्या जाळ्यात माणूस कसा
अडकतो? याच परिपूर्णतेच्या शोधात असतो का तो - मदांधता, उन्मत्तता व ऱ्हास
हेच तिचं फलित असूनसुद्धा? ...कथनाऐवजी या बाबी घटना-प्रसंगांतून दाखवल्या
जाणं अत्यावश्यक होतं.
बैजू बावरा आणि तानसेन यांनी भिन्न काळी एकच गुरु केले होते. दोन्ही सामान्य कुटुंबातील मुलं.
दोघांचा इतिहास समांतर पद्धतीने मांडता आला असता - एक पर्याय सुचला सहज.
© मुक्ता असनीकर
Comments
Post a Comment