'नाही' म्हणणारी मुलगी
* I do not
make financial gain out of this post. No copyright infringement
intended. *
* ईमेल-खातं बदलल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. मजकुराद्वारे आर्थिक लाभ मिळवण्याचा अथवा स्वामित्व हक्कांचं उल्लंघन करण्याचा माझा हेतू नाही. *
'नाही' म्हणणारी मुलगी
( फ्रिय्द्रीक बाकमान् लिखित माय ग्रँडमदर आस्क्ड मी टु टेल यू शी इज सॉरी या स्वीडिश कादंबरीतून )
‘नाही म्हणणारी मुलगी’ - ‘जवळपास जागं असणाऱ्यांच्या देशा’तील गोष्टींपैकी एल्सानं ऐकलेली अगदी सुरुवातीची गोष्ट. ‘मिओदासास’च्या राणीची गोष्ट:
मिओदासास
प्रांताची राजकन्या धाडसी होती, निर्व्याज होती. साऱ्यांची लाडकी होती.
दुर्दैवानं मोठेपणी ती भित्रुड बनली. (मोठी माणसं जाम भेदरट.) सारंकाही
सुरळीत, बिनबोभाट पार पाडण्याला अतोनात महत्त्व देऊ लागली. राणीला
व्यवहारकुशलता आवडू लागली, ती वादविवाद कटाक्षानं टाळू लागली - अगदी मोठ्या
माणसांसारखी.
परिणामी
तिनं मिओदासासमधे हरतऱ्हेच्या वादावादीवर बंदी घातली. प्रजाजनांना
रात्रंदिवस एकमेकांशी खेळीमेळीनं वागण्याची सक्ती करण्यात आली. बहुधा
प्रत्येक भांडणाची सुरुवात कुणाच्यातरी नकारामुळे होते. म्हणून राणीनं ‘नाही’ हा शब्दच अवैध ठरवून टाकला. कायदा मोडणाऱ्या व्यक्तीची रवानगी थेट ‘नाहीवाद्यां’साठीच्या प्रचंड तुरुंगात होत असे.
‘होपाई’
नावाचे काळ्या चिलखतातील शेकडो सैनिक कुठे मतभेद, बाचाबाची घडत नाही ना,
हे पाहण्याकरता राज्यभर गस्त घालत असत. मात्र एवढ्यानं राणीचं समाधान झालं
नाही. ‘नाही’ शब्दाप्रमाणे तिनं ‘कदाचित’, ‘बहुतेक’, ‘अं...’
वगैरे पुष्कळ शब्द बेकायदेशीर ठरवले. यातला एकही शब्द उच्चारल्यास त्या
व्यक्तीला काळकोठडीत टाकलं जाई. इथं येऊन पडलात तर सूर्याचा उजेड दिसण्याची
शक्यता कायमची संपली म्हणून समजा.
पुढे ‘शक्यतो’, ‘जर’, ‘काय होतं बघू या’ इत्यादी शब्दही बंदीच्या कचाट्यात सापडले. आता कुणाची फारसं काही बोलण्याची छातीच होत नसे. राणीच्या मनात आलं, बोलण्यावरच बंदी घालू या, कारण बहुधा प्रत्येक भांडण हे कुणीतरी काहीतरी म्हणायला गेल्यामुळे सुरू होतं.
यानंतर कित्येक वर्षं मिओदासास प्रांतावर शांततेची उदासकळा पसरली.
एके दिवशी एक मुलगी राज्यातील रस्त्यावरून जाऊ लागली - रमत गमत आणि गाणं म्हणत! लोक डोळे फाड-फाडून, असहायपणे बघत राहिले तिच्याकडे. मिओदासासमधे गायन हा अत्यंत गंभीर गुन्हा होता. कारण कुणालातरी गाणं आवडणार, कुणालातरी आवडणार नाही - मोठा धोका असतो त्यात!
होपाई
ताबडतोब मुलीला थांबवण्यास सरसावले मात्र ती त्यांच्या हाती लागेना. ही
मुलगी पळून जाण्यात तरबेज होती. होपायांनी घंटा बडवून आणखी कुमक गोळा केली.
राणीचं विशेष दळ त्यांच्या मदतीस आलं. या दळाला ‘रेखुष्ट्रे’
म्हटलं जाई, कारण ते जिराफ व रेघी वहीचा संकर असलेल्या खास प्राण्यांवर
स्वार होत असत. रेखुष्ट्रेसुद्धा त्या मुलीला रोखू शकले नाहीत. शेवटी खुद्द
राणी राजवाड्यातून धावत आली. चढ्या आवाजात तिनं त्या मुलीला गाणं
थांबवण्याची ताकीद दिली.
मुलगी गर्रकन् वळली, नि राणीच्या नजरेला नजर देऊन चक्क ‘नाही’ म्हणाली.
मुलीच्या तोंडून हा उद्गार बाहेर पडताच तुरुंगाभवतीच्या तटबंदीचा काही भाग ढासळला. मुलगी पुन्हा ‘नाही!’ म्हणाली. आणखी भिंती कोसळल्या. काही क्षणांत फक्त मुलगीच नव्हे, तर राज्यातील सारी प्रजा, होपाई, रेखुष्ट्रेसुद्धा ‘नाही! नाही! नाही!’ असा घोष करू लागले. बघता बघता अवघा तुरुंग जमीनदोस्त झाला.
अशाप्रकारे मिओदासास-वासीयांच्या ध्यानात आलं, की जोवर प्रजा वादविवादांना घाबरत राहील तोवर राजेराण्यांची मनमानी चालते - निदान एल्सालातरी हेच गोष्टीचं तात्पर्य आहेसं वाटलं.
मुलगी गर्रकन् वळली, नि राणीच्या नजरेला नजर देऊन चक्क ‘नाही’ म्हणाली.
मुलीच्या तोंडून हा उद्गार बाहेर पडताच तुरुंगाभवतीच्या तटबंदीचा काही भाग ढासळला. मुलगी पुन्हा ‘नाही!’ म्हणाली. आणखी भिंती कोसळल्या. काही क्षणांत फक्त मुलगीच नव्हे, तर राज्यातील सारी प्रजा, होपाई, रेखुष्ट्रेसुद्धा ‘नाही! नाही! नाही!’ असा घोष करू लागले. बघता बघता अवघा तुरुंग जमीनदोस्त झाला.
अशाप्रकारे मिओदासास-वासीयांच्या ध्यानात आलं, की जोवर प्रजा वादविवादांना घाबरत राहील तोवर राजेराण्यांची मनमानी चालते - निदान एल्सालातरी हेच गोष्टीचं तात्पर्य आहेसं वाटलं.
Comments
Post a Comment