डोळ्यांदेखत आपल्या मित्रावर हल्ला झालेलं तुम्ही खपवून घ्याल का?

 * ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *
 
 
प्रश्न: हिंसेविषयी तुम्ही पुष्कळ बोलता. डोळ्यांदेखत आपल्या मित्रावर हल्ला झालेलं तुम्ही खपवून घ्याल का?    
 
जे. कृष्णमूर्ती: ...जुनापुराणा सवाल आहे. 'तुमच्या डोळ्यांदेखत कुणी तुमच्या बहिणीवर हल्ला केल्यास तुम्ही काय कराल?' 
हो की नाही? - तसलाच प्रश्न आहे हा. 
तुम्ही काय कराल?  - हो, तुम्हाला विचारतोय मी. झोडपून काढाल त्याला? गोळी माराल? कराटे कराल? 
'कराटे' शब्दाचा अर्थ माहितीय तुम्हाला? कोणीतरी मला हा शब्द उलगडून सांगितला: 'कराटे' म्हणजे 'स्व'चा अभाव. 'मी'पणाचा अभाव. स्व-संरक्षणात्मक युद्धकला नव्हे. 
शोध घ्या, लोक हो.  
तुम्ही आपल्या प्रेयसी, नवरा इत्यादीबरोबर आहात. कुणी इसम येऊन तुमच्या पती, पत्नीशी हिंसेने, क्रौर्याने वागू लागतो. सहजप्रेरणेने काय घडेल तुमच्या हातून? त्याच्यावर चालून जाल तुम्ही, हो ना? स्वाभाविक आहे. त्याला बदडून काढाल. कराटे, योगिक डावपेचांचं ज्ञान असल्यास हल्लेखोराला भुईसपाट कराल तुम्ही. 
सामान्यतः अशा परिस्थितीत माणसाची काय प्रतिक्रिया होते, आपल्याला ठावूक आहे. हिंसा. 
'तू हिंसेने वागलास तर मीसुद्धा हिंसेनेच वागणार. तू माझ्यावर संतापलास, राग काढलास तर मी तुझ्यावर दुप्पट संतापणार. तू मला मूर्ख म्हणालास तर मी तुला महामूर्ख म्हणणार...'

प्रश्नकर्त्यानं मला - वक्त्याला उद्देशून प्रश्न विचारलाय. त्यात नवीन काही नाही. याचा अर्थ वक्त्याला प्रश्नाची सवय झालीय, असं नव्हे. जुना प्रश्न नव्यानं विचारण्यात आलाय. मी सर्व प्रश्नांकडे नवलाईने, तजेल्याने पहातो. 
काय करायला हवं मी त्याप्रसंगी? ...माझ्या उत्तरासाठी खोळंबून राहिलात की काय? 
मुळात मी हिंसक आहे का? मी जर हिंसकपणे जगत असेन - माझं आयुष्य हिंसात्मक असेल, तर त्याहीप्रसंगी माझा प्रतिसाद हिंस्रच असेल. परंतु मी जर हिंसारहित जीवन जगत असेन - व्यक्तिशः मी तसा जगतो - शारीरिकच नव्हे, तर मनोवैचारिक हिंसेपासून मुक्त जीवन...जिथे आक्रमकता, चढाओढ, तुलना, अनुकरण, नियमांधतेला थारा नाही... कृष्णमूर्ती अशारितीने जगत असल्यामुळे जर कुणी माझ्या मित्रावर, बहिणीवर, पत्नीवर हल्ला केला - खरंतर ही सर्वजण, विशेषतः माझ्या बहिणी केव्हाच मरण पावलीत - मी ज्यारितीने जगत असेन, त्याचप्रकारची कृती माझ्याकडून घडेल. माझं रोजचं जगणं कसं आहे, यावर ती कृती अवलंबून असेल.
 
त्यामुळे जीवनकला ही सर्वश्रेष्ठ कला. चित्र, काव्य हीदेखील कलेचा भाग असतात, परंतु परमोच्च कला कोणती, तर जीवनकला - स्वतः शोध घेणं, उकल करणं.  
हिंसात्मकरित्या जगणारी व्यक्ती हिंसा करेल. हिंसा-रहितपणे जगणारी व्यक्ती ही प्रसंग ओढवल्यावर  यथोचितपणे त्या प्रसंगाला तोंड देईल. थोडक्यात आपण कशारितीने जगतो, यावर आपली कृती अवलंबून असेल. 

Comments