चमत्कार न दाखवण्याचा चमत्कार

 * ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *
 
 
एका झेन गुरुचा शिष्य दुसऱ्या झेन गुरुच्या भेटीस आला. मोठ्या अभिमानाने तो या गुरुला आपल्या गुरुची महती सांगू लागला: “आमच्या गुरुंना पुष्कळ सिद्धी अवगत आहेत. हरतऱ्हेचे चमत्कार दाखवतात ते! एकदा मला नदीतीरावर उभं रहायला सांगून आमचे गुरु पैलतीरी गेले. त्यांनी मजजवळ कोरा कागद देऊन ठेवला होता. पलिकडल्या तीरावर उभे राहून ते लेखणी चालवत असल्याप्रमाणे हवेत हात फिरवू लागले, नि अहो आश्चर्यम्! इकडे माझ्या हातातील कोऱ्या कागदावर अक्षरं उमटू लागली!! ...तुमच्यालेखी यात काय नवल म्हणा. तुम्हीदेखील सिद्धपुरुष आहात."

दुसरा झेन गुरु हसत हसत म्हणाला, "चमत्कार न दाखवण्याचा चमत्कार जर तुझा गुरु करू शकत नसेल, तर त्याच्या डोक्यात पुरता प्रकाश पडलाय असं म्हणता येणार नाही. कारण चमत्कार घडवता येत असूनही चमत्कार घडवल्याविना राहू शकणं हा परमविलक्षण चमत्कार असतो, नाही का?"
 
 
...सिद्धींच्या, शक्तींच्या मोहजालात न गुंतणं अतिकठीण. त्यांमुळे तुमचा अहंकार अस्सा फुलारतो, इतका खूष होतो....नशा चढते त्याला. बहुसंख्यांच्या क्षमतेबाहेरील कुठलीही क्रिया तुम्हाला अवगत असेल: शून्यातून वस्तू पैदा करणं, समोरच्याच्या मनातले विचार अचूक जाणणं, हवेत तरंगणं, नुसत्या स्पर्शाने लोकांना व्याधीमुक्त करणं...तर ती गोष्ट वारंवार करून दाखवण्याची हुक्की येते, चमत्कार घडवण्याची अनिवार्यता होते. अडकता तुम्ही आपल्याच सामर्थ्याच्या जाळ्यात, त्याचे गुलाम होऊन जाता.
 
 
रेखांकन: मुग्धा असनीकर

Comments