Posts

Showing posts from October, 2020

इच्छा आणि क्रोध

Image
रागाचं मानसशास्त्र पहा. आपल्याला काही तरी हवं असतं. कोणीतरी ते प्राप्त करण्यात आपल्याला आडकाठी करतं. कशाचातरी अडथळा निर्माण होतो, काहीतरी आपल्या मार्गात शिळा होऊन उभं ठाकतं. पाहिजे ते हाती येत नाही. ही वैफल्यग्रस्त ऊर्जाच क्रोधाचं रूप घेते. इच्छापूर्तीची शक्यता खुंटवणाऱ्या व्यक्तीचा, वस्तूचा, परिस्थितीचा आपल्याला राग येतो. रागाला प्रतिबंध करता येणार नाही, तो स्वाभाविकपणे उद्भवतो. पण एक गोष्ट ध्यानात घ्या: अतिगांभिर्याने, जीवन-मरणाचा प्रश्न होण्याइतक्या तीव्रतेने कशाचीच इच्छा धरू नका. खेळकर व्हा. इच्छाच करू नका, असं मी म्हणत नाही. तसं करणं म्हणजे स्वतःतलं काहीतरी दाबून टाकण्याचा प्रयत्न. मी म्हणतो, इच्छा खेळकरपणे बाळगा. जर पूर्ण झाली तर चांगलंच आहे. जर पूर्ण झाली नाही, तर कदाचित ती योग्य वेळ नव्हती. जाऊ दे, पुन्हा कधीतरी.  आपण इच्छांशी, अपेक्षांशी इतके तादात्म पावतो, की जर त्या सफल झाल्या नाहीत तर आपल्या ऊर्जेची आग होते, ती आपल्यालाच जाळत रहाते. या माथेफिरू अवस्थेत हातून वाटेल ते घडू शकतं. नंतर पश्चात्ताप होतो. यातून एक वर्तनसवय निर्माण होते, तुमची सगळी ऊर्जा तीत गुंतून पडते. ज्ञानी लोक

आध्यात्मिक समतोल

Image
आध्यात्मिक, आतल्या प्रवासाला निघालेली, स्वतःच्य अंतरंगाकडे वळलेली व्यक्ती काहीशा विचित्र समतोलात जगते.   जे मिळालंय त्यात समाधानी असली तरी ती असंतुष्टतेची भावना बाळगते. हे विसंगत वाटेल. माणूस एकतर समाधानी असेल, नाहीतर असमाधानी असेल असं आपल्याला वाटतं. पण आध्यात्मिक व्यक्ती दोन्ही असते. आयुष्याने जे दिलं आहे त्यात ती समाधानी असते पण ‘त्यापलिकडे आणखी खूप काही आहे’ ही जाणीव असल्याने ती आत्मसंतुष्ट होत नाही.  तिची तहान जागी असते म्हणूनच तिला क्षणा-क्षणाला काही नवीन गवसत राहतं. - रजनीश (ओशो)      

भावना: उथळ आणि खोल

Image
 प्रश्न: मी आतून कधी शांत नसतोच. कसलासा अनाकलनीय राग आजही माझ्या आत आहे. ओशो: राग दडपून ठेवू नकोस. आत जे काही आहे ते बाहेर येऊ पहातंय, त्याला बाहेर येऊ दे. खरोखर शांत व्हायचं असल्यास एवढा एकच मार्ग आहे. ज्वालामुखी सुप्त दिसतो तेव्हा सारंकाही निश्चल वाटतं पण कित्येकदा आतमध्ये उद्रेकाची तयारी सुरू असते. थोडा क्रोध बाहेर पडतो, थोडा आत शिल्लक उरतो.    क्रोधाचा काही भाग कळण्याजोगा असतो - तो परिस्थितीशी, लोकांशी निगडित असतो. क्रोधाची कारणं स्पष्ट असतात. पण क्रोधाचा हा वरवरचा स्तर बाहेर फेकला जातो अन् कधी अकस्मात तुमचा सामना क्रोधाच्या स्रोताशी होतो. तुम्ही बावचळता. या क्रोधाचा बाह्य जगाशी संबंध नसतो. हा राग तुमचाच अंश असतो. कोणत्याही कारणाविना अस्तित्वात असलेला हा क्रोध, हा संताप समजावून घेणं फार कठीण असतं, कारण त्याकरता कोणीच जबाबदार नसतं. हा राग तुमच्या आत असतो.  व्यक्तीला प्रथम जगासंबंधित क्रोध बाहेर फेकावा लागेल आणि मग ती क्रोधाच्या खोलातल्या, असंबद्ध स्रोताशी पोहोचू शकेल. हा राग घेऊनच आपण जन्मलेले असतो परंतु त्याकडे आपण बघितलेलं नसतं. खरंतर त्याला जाणून घेण्याचीदेखील गरज नाही. त्याला के

शिथिलता

Image
 क्रियाकलापाचं (activity) स्वरूप, त्याचे छुपे प्रवाह समजून घेतल्याशिवाय शिथिल होणं, तणावमुक्त होणं शक्य नाही. तुम्हाला शिथिल व्हायचं असेल तर तुम्ही आपल्या क्रियाकलापाचं निरीक्षण करायला हवं, तो समजून घ्यायला हवा, कारण क्रियांचा हा गुच्छ म्हणजे साधीसुधी गोष्ट नव्हे. दोन शब्द:  कृती (action) आणि क्रियाकलाप (activity). action म्हणजे activity नव्हे. दोहोंचं स्वरूप पूर्णतः भिन्न आहे. कृती ही परिस्थितीच्या अनुषंगाने घडते, परिस्थितीला स्वाभाविक प्रतिसाद दिला जातो, बस्स. क्रियाकलाप हा प्रतिसाद नसतो, तुम्ही कृतीशील राहण्यासाठी तडफडता, अतिशय बेचैन असता. अनेक लोकांना मोकळं व्हायचं असतं पण ते शिथिल होऊ शकत नाहीत. शिथिल होणं फुलण्यासारखं आहे,  जबरदस्तीने घडवून आणता येणार नाही. बारकाईने लक्षात घ्या - तुम्ही क्रियाकलापात इतके मग्न का? इतका प्रचंड अट्टहास कशाकरता? क्रिया ही शांत, स्वस्थ मनातून उमटते. क्रियाकलाप हा अस्वस्थ मनाचा उद्रेक असतो. तुम्ही क्रिया (act) करा, कृती करा, त्यातून क्रियाकलाप (activity) आपोआप घडू दे. शिथिल होणं, निवांत असणं म्हणजे क्रियाकलापाची आस न उरणं. शिथिलता म्हणजे मेल्यागत पडून

गुलाब कमळ होण्याकरता धडपडत नाही

Image
 ‘Be yourself’, ‘जे आहात, जसे आहात तसे रहा' - यथार्थाने समजावून घेतल्यास हे पाच-सहा शब्द मानवजातीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुरे आहेत,  या शब्दांत गहन अर्थ भरून राहिला आहे. मानवाचा समस्त भूतकाळ 'आपण जे नाही' ते होण्यासाठी अखंड धडपडण्यात व्यतीत झाला आहे.  आपल्याला सतत त्याकरता उद्युक्त केलं गेलंय. ‘ख्रिस्त व्हा, बुद्ध व्हा’. दुसरा ख्रिस्त झाला नाही, दुसरा बुद्ध झाला नाही, होणारही नाही कारण तो निसर्गधर्मच नाही. इतिहासाची पुनरावृत्ती होते, अस्तित्वाची पुनरावृत्ती कदापि होत नाही. अस्तित्व म्हणजे सृजनाचा आविष्कार. सृजनाची पुनरावृत्ती होऊ शकत नाही. सृजनशील व्यक्ती नेहमी अज्ञाताच्या दिशेने पावलं टाकतात. ....ख्रिस्ताला जाणून घेणं, लाओ त्झूला समजून घेणं, बुद्धावर प्रेम करणं खूप सुंदर आहे. मात्र त्यांसारखं होण्याचा प्रयत्न करणं हे निरर्थक, केविलवाणं आहे. शतकानुशतकं माणसाच्या मनाची घडण दुसऱ्यांचं अनुकरण करण्यास अनुकूल करण्यात आली आहे. तुम्हाला स्वतःजोगतं राहू न देण्यात पुष्कळांचे हितसंबंध, भयं गुंतलेली असतात. तुम्ही खरोखर जसे आहात, तुम्हाला खरोखर जे वाटतं तसे वागलात तर काय होईल याची

अवलंबिता की मुक्तेच्छा?

Image
जगात दोन प्रकारच्या विचारधारा अस्तित्वात आहेत. एक म्हणते, स्वतःच्या इच्छेनुसार, संकल्पानुसार वाट्टेल ते करण्याचं स्वातंत्र्य – free will - माणसाला लाभलं आहे. ही कल्पना मुळातच असत्य असल्याने तीविरोधात युक्तिवाद होऊ शकतो,  तसा तो केलाही जातो अन् मग पूर्णतः विरोधी भूमिका घेतली जाते, जी म्हणजे ‘ कोणीही स्वतंत्र नाही. आपण कळसूत्री बाहुल्या आहोत, आपली सूत्रं अज्ञाताच्या हातात आहेत. आपण तर केवळ गुलाम आहोत’. दोन्ही विचारधारा असत्य आहेत. आपण गुलाम नसतो व स्वतंत्रदेखील नसतो. ...समजून घ्यायला जरा कठीण आहे. कारण आपण ‘आपण’ नसतोच, मी केवळ ‘मी’ नसतो, तर पूर्णत्वाचा (wholeness) एक अंश असतो. तुम्ही स्वत:ला पूर्णत्वापासून तोडू पहाल, पृथक करू पहाल, तर तुम्ही व सृष्टी यांमध्ये संघर्ष निर्माण होईल; तुम्हाला कशाच्यातरी आधीन असल्यासारखं वाटेल, एकाकी, असहाय वाटेल. तुम्ही स्वत:ला पूर्णत्वाचा एक भाग म्हणून समजून घेतलंत तर तुम्ही स्वामी असाल, मात्र पूर्णत्वा‘सह’ स्वामी -  पूर्णत्वा‘चे’ स्वामी नव्हे. मुक्तेच्छा, संकल्पशक्ती (free will) असं काही नसतं, आणि प्राक्तन  (fate) असंही काही नसतं. अवलंबिता, स्वातंत्र्य - द

पैसा

Image
बहुतांश लोकांना वाटतं की समृद्धी म्हणजे संपत्ती; भरपूर पैसा असणं, त्या पैशाचं प्रदर्शन करणं.   पैसा म्हणून जे आपल्याला दिसतं, तो पैसा नव्हे. पैशाची मुळं खूप खोलवर आहेत. पैसा म्हणजे केवळ हातात घेता येणाऱ्या चलनी नोटा नव्हेत. तुमच्या मनाशी, अंतरंगांशी, तुमच्या वृत्तींशी त्याचा अनिवार्य संबंध आहे. पैसा म्हणजे तुम्हाला वस्तूंबद्दल वाटणारी ओढ, हव्यास; पैसा म्हणजे तुमचं माणसांपासून दूर जाणं; पैसा म्हणजे मृत्यूपासून वाचवणाऱ्या सुरक्षिततेचा आभास; पैसा म्हणजे आयुष्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा तुमचा प्रयत्न....  पैसा म्हणजे केवळ नाणी-नोटा नव्हेत; तसं असतं तर गोष्टी खूप सोप्या झाल्या असत्या. पैसा म्हणजे तुमच्यातील प्रेम – मात्र वस्तूंबद्दलचं, जिवंत गोष्टींबद्दलचं नव्हे. वस्तूंवर प्रेम करणं सर्वांत सोयिस्कर. वस्तू निर्जीव असतात. तुम्ही त्या मिळवू शकता, हस्तगत करू शकता. तुम्ही बंगला विकत घेऊ शकता, राजवाडा घेऊ शकता; तुमची ऐपत असल्यास जगातील भव्यतम राजवाड्याचा मालकी हक्क मिळवू शकता, पण तुम्ही इवल्याशा तान्ह्या बाळाची मालकी मिळवू शकत नाही. छोट्टंसं मूलदेखील नकार देऊ शकतं,  आपल्या स्वातंत्र्यासाठी

अश्रू

Image
तुमच्यापाशी असलेल्या कित्येक देखण्या गोष्टींहून तुमचे अश्रू अत्यधिक सुंदर असतात, कारण अस्तित्व ओतप्रोत भरून वाहतं तेव्हा अश्रू ओघळतात.    अश्रू नेहेमी दु:खाचेच असले पाहिजेत असं नव्हे; कधी ते अतीव सुखातून येतात, कधी तर अतीव शांतीतून येतात, कधी प्रेमातून निर्माण होतात. खरंतर अश्रूंचा सुखदु:खाशी फारसा संबंध नाही. जेव्हा तुमच्या हृदयाला काहीतरी आतपासून हेलावून टाकतं, तुमचा ताबा घेतं, जेव्हा ते तुम्ही सामावून घेऊ शकाल त्याहून खूप जास्त असतं, तेव्हा ते काठोकाठ भरून वाहू लागतं, म्हणजेच अश्रू पाझरू लागतात.   अश्रू स्वीकारा, त्यांचा आस्वाद घ्या, त्यांचं स्वागत करा. अश्रूंच्या माध्यमातून तुम्हाला प्रार्थना उमगेल.  पहावं कसं, हे तुम्हाला अश्रूंद्वारे कळेल. अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांत सत्य पाहण्याची क्षमता असते.  अश्रूभरल्या डोळ्यांत जीवनाचं सौंदर्य पाहण्याची, त्यातलं वरदान जाणून घेण्याची शक्ती असते.    - रजनीश (ओशो)    

मन

Image
मन म्हणजे भीती. मन फार भित्रं आहे. त्याला कायम सुरक्षिततेची, शाश्वतीची चिंता लागून असते. मात्र प्रेमाचं, ध्यानाचं जग म्हणजे शुद्ध असुरक्षितता; हातात कोणताही नकाशा न ठेवता ते तुम्हाला अज्ञाताकडे घेऊन जातं. आपण कुठे निघालोत ते समजत नाही, नक्की कुठे पहोचणार तेही ठावूक नसतं. संभ्रमही नाही आणि निश्चितीही नाही, ही माणसाच्या आयुष्यातला सर्वात सुंदर अवस्था आहे. या क्षणात माणूस एक आरसा होऊन जातो. त्यात उमटणाऱ्या प्रतिबिंबाला दिशा नसते, उद्देश्य नसतं. काहीही करण्याची कल्पना नसते, भविष्य नसतं. ते केवळ त्या क्षणात असतं.   मन स्वभावतःच चिंतामय आहे. ‘आपण कुठे निघालोत, काय शोधतोय' असले गंमतीदार प्रश्न त्याला पडतात. मानवी मनाला सतत भरकटण्याची धास्ती वाटते. काळज्या करण्याची वृत्तीच आहे त्याची. पण 'आपल्याला पाच बोटं आहेत' हे एकदा स्वीकारलं की 'पाचच बोटं का', हा प्रश्न रोज पडत नाही.   विद्यापीठातल्या आमच्या एका प्राध्यापक महाशयांच्या हाताला सहा बोटं होती. ते कायम सहावं बोट लपवायचे. मी त्यांना सहा बोटंवाल्या हातानेच धरता येईल असा एक विशिष्ट कागद द्यायचो. वर्गात हशा पिकायचा. कागदावर

लोक जर अगदी खरंखुरं, नैसर्गिक वागू लागले तर...

Image
माणूस निसर्गत:च भावोत्कट आहे. सर्व सर्व भावनांबाबत तो उत्कट आहे. कोणीतरी विचारलं: ‘लोक जर पूर्णतः खरंखुरं, नैसर्गिक वागू लागले, स्मित करण्याचा शिष्टाचार बनावट म्हणून त्यांनी त्याला सपशेल फाटा दिला, ते रस्त्यांवरून किंचाळत, आरडाओरडा करत फिरू लागले, तर काय होईल!?’   हम्म. असं झालं तर बऱ्याच गोष्टी घडतील. पहिलं म्हणजे युद्धं होणारच नाहीत. जगात कुठेही एखादं व्हिएतनाम, इस्राईल बेचिराख होणार नाही. लोक खरं वागायला लागले तर कुणालातरी मारावं, हजारोंची कत्तल करावी इतका प्रचंड राग त्यांच्या मनात साचणारच नाही. लोक नैसर्गिक प्रवृत्तींनुसार वागू लागले तर जगात पुष्कळ फरक पडलेला दिसेल. तुम्हाला वाटतं तेवढा गोंगाट काही ते करणार नाहीत. त्यांना ओरडण्याची मोकळीक असेल, पण ओरडून ओरडून किती ओरडणार, किती काळ? जर माणसाला पूर्ण स्वातंत्र्य असेल  तर आरडाओरडा, भांडणं, शिवीगाळ, निषेध इत्यादी गोष्टी जगातून नाहीशा होऊ लागतील.   हे खरं तर दुष्टचक्र आहे. म्हणजे हे असं आहे की तुम्ही एका माणसाला उपाशी ठेवलंय आणि तुम्ही त्याला अन्नाच्या, फडताळाच्या, फ्रिजच्या आसपास फिरकू देत नाही. त्याला खाण्याची मुभा दिली तर म्हणे तो ख

प्रेम म्हणजे स्वातंत्र्य

Image
प्रश्न: मी माझ्या प्रेयसीला शक्य तेवढं स्वातंत्र्य देतो - त्यामुळे मी स्वतः अडचणीत सापडलो, मला दुःख झालं तरी. माझं स्वत:वर पुरेसं प्रेम नाही  म्हणून मी स्वत:ला दुय्यम स्थान देतोय असा याचा अर्थ होतो का?     रजनीश (ओशो) :  हे तुला वाटतं त्याहून फार गुंतागुंतीचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे तू तुझ्या प्रेयसीला स्वातंत्र्य ‘देतोस’ ही कल्पनाच चुकीची आहे. तू कोण तिला स्वातंत्र्य देणारा? तू केवळ प्रेम करू शकतोस आणि तुझ्या प्रेमातच स्वातंत्र्य अभिप्रेत आहे. ती देण्याची गोष्टच नव्हे. ते द्यावं लागत असेल, तर तुला जाणवणाऱ्या सर्व समस्या जाणवणं सहाजिक आहे. तेव्हा तू चूक करतो आहेस. तुला या नात्यात खरंखुरं स्वातंत्र्य नकोय; स्वातंत्र्य ‘द्यावं’ लागेल अशी परिस्थिती आलीच नाही तर तुला जास्त आवडेल. पण ‘प्रेम स्वातंत्र्य देतं’ असं मला पुन्हापुन्हा सांगताना तू ऐकलं आहेस, ते तू अजाणतेपणी स्वत:वर लादतो आहेस, कारण स्वातंत्र्य दिलं नाहीस तर तुझं प्रेम ‘प्रेम’च नाही असं होईल ना!    तू कात्रीत सापडला आहेस: स्वातंत्र्य दिलं नाहीस तर तुझ्या प्रेमावर प्रश्नचिह्न उभं राहील. स्वातंत्र्य दिलंस तर तुझा अहंकार मत्सरग्रस्त

मदहोशी

Image
  एके संध्याकाळी अकबर जंगलात शिकारीसाठी गेलेला असताना परतीच्या वाटेवर नमाजपठणाची वेळ झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. घोड्यावरून खाली उतरून, पालापाचोळ्यात सतरंजी अंथरून तो नमाज अदा करू लागला. नमाज करता करता एकाएकी अकबराच्या अंगाला ओझरता धक्का लागला. बेसावध अकबर नमाजी आसनातून जवळपास कोलमडलाच. समोर पाहिपर्यंत वेगाने धावत जाणाऱ्या स्त्रीची आकृती जंगलात गुडूप झाली होती. अकबराच्या मनात त्या अज्ञात स्त्रीला शासन घडवण्याची इच्छा उफाळून आली. पण करता काय, नमाज पढत असता मध्येच उठून चालत नाही. नमाजपठण झाल्यावर अकबर तिथेच खोळंबून राहिला. कदाचित ती गेल्या वाटेने परत येईल.. ही पहा आली. अल्लड युवती होती ती. अकबरानं गुश्शात तिची वाट अडवली. म्हणाला, "थांब! थांब जरा. नमाजपठण करणाऱ्या माणसाला तुझा धक्का लागला, आणि तू तशीच पुढे पळून गेलीस. माफी मागितली नाहीस, मागे वळूनदेखील पाहिलं नाहीस. काही रीतभात? नमाज अदा करणारी व्यक्ती दुसरीतिसरी कोणी नसून खुद्द सम्राट अकबर आहेत हेही तुझ्या लक्षात येऊ नये म्हणजे हद्द झाली. सोम्यागोम्यालाही नमाज करतेवेळी त्रास देऊ नये, तू चक्क सम्राटाला धक्का दिलास, लाज नाही वाटत तु

अहंकार म्हणजे बिनबुडाची रिकामी वस्तू

Image
(प्रश्नाचं उत्तर देताना-) ...देव-धर्म, व्रतं-वैकल्यं करून थकलात पण अद्याप ‘करण्या’ने थकलेला नाहीत. आता अन्य काहीतरी करून पहायचं आहे, आजमावून पहायचं आहे. आणि मला विचारताहात, की काय करू? तुम्ही ‘करण्याला’ जेव्हा विटता, ‘करत रहाणं’ जेव्हा थांबवता तेव्हा क्रांती घडून येते. धर्म म्हणजे कर्म नव्हे, धर्म म्हणजे भाव. धर्म म्हणजे अकर्म, अक्रियता. धर्म म्हणजे शून्य, ठहराव.  सक्रियता ही अहांकारोत्पन्न असते. काहीतरी करण्यातून अहंकाराला पुष्टी मिळते. अहंकार करण्यावर पोसला जातो. तुम्ही जितकं करत रहाता, कतृत्व गाजवता तितका तो बळावत जातो. काहीतरी मोठं करून दाखवता तेव्हा तोही फुगतो. गरिबाचा अहांकार छोटा, श्रीमंताचा मोठा. चपराशाचा छोटा अहंकार, राष्ट्रपतीचा मोठ्ठा अहंकार. मोठी मजल मारलीत, अहंकार वाढला. अहंकार सतत आकांक्षा बाळगतो: 'मी ह्यांव करावं - त्यांव करावं, जगाला दाखवून द्यावं, इतिहासाच्या पानांवर मुद्रा उमटवावी.' लहान मुलांच्या मनात आपण महत्त्वाकांक्षेचं विष कालवतो:  'काहीतरी कर्तृत्व गाजवा, कुणीतरी बना, इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरात तुमचं नाव लिहिलं गेलं पाहिजे..'    'निष्क

वैवाहिक जीवन सुखमय होत नाही, होऊ शकत नाही कारण..

Image
 वैवाहिक जीवन सुखमय होत नाही, होऊ शकत नाही कारण आजवर आपण माणसाला प्रेम करण्याची संपूर्ण मुभा दिलीच नाही. जिथे प्रेम बहरेल अशी व्यवस्था आपण निर्माण करू शकलो नाही. विवाहसंबंध प्रेमातून उद्भवला तरच सुखदायी ठरतो. आपला उफराटा उद्योग आहे - विवाहातून प्रेम उद्भवेल अशी आपली अपेक्षा असते. तसं घडत नाही. आपण मात्र आपलं घोडं दामटतो आहोत, आजही तेच घडवून आणण्याचा खटाटोप करतो आहोत. विवाहामधून निव्वळ सोय उद्भवू शकते, व्यवस्था उद्भवू शकते, सुरक्षितता उद्भवू शकते, प्रेम नव्हे.  पृथ्वीवर प्रेमाचं भरतं यायला हवं, आणि प्रेम म्हणजे मोठी क्रांती असते. मी त्या क्रांतीसाठी जगाला आवाहित करतो आहे. मी विवाहाविरुद्ध नाही. प्रेमातून विवाह निष्पन्न होईल अथवा होणार नाही याला काडीचं महत्त्व नाही. प्रेमातून जे काही निष्पन्न होईल ते शुभ असेल, मंगलच असेल. प्रेमात असणं, प्रेममय होणं म्हणजे थेट खळाळत्या प्रवाहात उडी – अस्थिरतेत जगणं, केवळ चालू क्षणात असणं, एकाकी असण्याच्या आंतरिक सत्याला खुशाल आलिंगन देणं. परंतु आपण सुरक्षालोलुप असतो. प्रेम ही नसती भानगड वाटते आपल्याला, त्या भानगडीत कोण पडतो! विवाहसंबंधातून मिळणारी हरतऱ्हे

'दोस्त' (नात्सु नो निवा) - पुस्तक परीक्षण*

Image
   लेखिका : काझुमी युमोतो  (जपानी पद्धतीनुसार आडनाव आधी) मराठी अनुवाद: 'दोस्त' (रोहित अक्षरसाहित्य, २०१५) अनुवादक: चेतना सरदेशमुख-गोसावी आणि मीना आशिझावा पृष्ठसंख्या: ११३ जपानी प्राथमिक शाळेच्या एकाच यत्तेत शिकणाऱ्या मित्रांचं त्रिकूट. त्यातल्या एकाची दूरगावी राहणारी आजी वारते. तो अंत्यसंस्काराला जाऊन येतो, दोघा मित्रांशी त्याबाबत सविस्तर बोलतो. मृत्यूचा अनुभव नेमका कसा असेल?? - तिघांच्या मनात जबरदस्त कुतूहल दाटतं. 'शहराच्या जुन्या भागात राहणारा एकाकी म्हातारबुवा कधीही गचकू शकतो' असं योगायोगाने ऐकिवात आल्यावर तिघे बहाद्दर चक्क त्याच्यावर पाळत ठेवू लागतात! या हेरगिरीचं पुढे काय होतं?... म्हातारबुवाचं काय होतं?...       लहान मुलांकरता लिहिणं म्हणजे आंजारागोंजारी करणं, 'तात्पर्या'ची घुटी पाजणं, आपले धार्मिक-नैतिक-राजकीय-सामाजिक-कलात्मक मताग्रह मुलांच्या गळी उतरवणं असं चित्र बव्हंशी दिसून येतं. तथापि जगभरातील काही प्रतिभावान लेखक हे वाढत्या वयाच्या व्यक्ती प्रौढांइतक्याच विचारक्षम, संवेदनक्षम असल्याचं मानतात आणि मृत्यू, लैंगिकता, हिंसा, नात्यांमधले तणाव, निसर्ग