इच्छा आणि क्रोध
रागाचं मानसशास्त्र पहा. आपल्याला काही तरी हवं असतं. कोणीतरी ते प्राप्त करण्यात आपल्याला आडकाठी करतं. कशाचातरी अडथळा निर्माण होतो, काहीतरी आपल्या मार्गात शिळा होऊन उभं ठाकतं. पाहिजे ते हाती येत नाही.
ही वैफल्यग्रस्त ऊर्जाच क्रोधाचं रूप घेते. इच्छापूर्तीची शक्यता खुंटवणाऱ्या व्यक्तीचा, वस्तूचा, परिस्थितीचा आपल्याला राग येतो. रागाला प्रतिबंध करता येणार नाही, तो स्वाभाविकपणे उद्भवतो. पण एक गोष्ट ध्यानात घ्या: अतिगांभिर्याने, जीवन-मरणाचा प्रश्न होण्याइतक्या तीव्रतेने कशाचीच इच्छा धरू नका. खेळकर व्हा.
इच्छाच करू नका, असं मी म्हणत नाही. तसं करणं म्हणजे स्वतःतलं काहीतरी दाबून टाकण्याचा प्रयत्न. मी म्हणतो, इच्छा खेळकरपणे बाळगा. जर पूर्ण झाली तर चांगलंच आहे. जर पूर्ण झाली नाही, तर कदाचित ती योग्य वेळ नव्हती. जाऊ दे, पुन्हा कधीतरी.
आपण इच्छांशी, अपेक्षांशी इतके तादात्म पावतो, की जर त्या सफल झाल्या नाहीत तर आपल्या ऊर्जेची आग होते, ती आपल्यालाच जाळत रहाते. या माथेफिरू अवस्थेत हातून वाटेल ते घडू शकतं. नंतर पश्चात्ताप होतो. यातून एक वर्तनसवय निर्माण होते, तुमची सगळी ऊर्जा तीत गुंतून पडते.
ज्ञानी लोक हजारो वर्षं सांगत आले आहेत: ‘इच्छा करू नका’. पण हे अमानुष आहे. ‘निरिच्छ होणं, मोक्षप्राप्ती’ हीदेखील एकतऱ्हेची कामना असते, इच्छाच असते; मोक्षप्राप्तीच्या या इच्छेत काही अडथळा आला तरी क्रोध उफाळून येणारच. कदाचित हा क्रोध अत्यंत भीषण असेल, कारण ही इच्छादेखील अत्यंत मोठी आहे. क्रोध हा इच्छेच्या प्रमाणात निर्माण होतो.
स्वत:ला फार गांभीर्याने घेऊ नका. आणि मग तुम्हाला रागाच्या शक्यताच मावळताना दिसतील. ‘आपण जिंकायलाच हवं, यशस्वी व्हायला हवं’ असल्या वेडगळ कल्पना बाळगूच नका. जग फार विशाल आहे, आपण त्याचे इवलेसे रहिवासी आहोत.
एकदा हे ध्यानात आलं की राग नाहीसा होऊ लागेल, व जाताना तो मैत्री, करुणा, प्रेमाची अमाप ऊर्जा मागे ठेवून जाईल.
- रजनीश (ओशो)
Comments
Post a Comment