अहंकार म्हणजे बिनबुडाची रिकामी वस्तू

(प्रश्नाचं उत्तर देताना-)
...देव-धर्म, व्रतं-वैकल्यं करून थकलात पण अद्याप ‘करण्या’ने थकलेला नाहीत. आता अन्य काहीतरी करून पहायचं आहे, आजमावून पहायचं आहे. आणि मला विचारताहात, की काय करू?

तुम्ही ‘करण्याला’ जेव्हा विटता, ‘करत रहाणं’ जेव्हा थांबवता तेव्हा क्रांती घडून येते.

धर्म म्हणजे कर्म नव्हे, धर्म म्हणजे भाव. धर्म म्हणजे अकर्म, अक्रियता. धर्म म्हणजे शून्य, ठहराव.
 सक्रियता ही अहांकारोत्पन्न असते. काहीतरी करण्यातून अहंकाराला पुष्टी मिळते. अहंकार करण्यावर पोसला जातो. तुम्ही जितकं करत रहाता, कतृत्व गाजवता तितका तो बळावत जातो. काहीतरी मोठं करून दाखवता तेव्हा तोही फुगतो. गरिबाचा अहांकार छोटा, श्रीमंताचा मोठा. चपराशाचा छोटा अहंकार, राष्ट्रपतीचा मोठ्ठा अहंकार. मोठी मजल मारलीत, अहंकार वाढला. अहंकार सतत आकांक्षा बाळगतो: 'मी ह्यांव करावं - त्यांव करावं, जगाला दाखवून द्यावं, इतिहासाच्या पानांवर मुद्रा उमटवावी.'
लहान मुलांच्या मनात आपण महत्त्वाकांक्षेचं विष कालवतो:  'काहीतरी कर्तृत्व गाजवा, कुणीतरी बना, इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरात तुमचं नाव लिहिलं गेलं पाहिजे..'
 
 'निष्क्रिय व्हा' असं मी म्हणत नाही. 'न करणं', 'अकर्मकता' जेव्हा उमगेल तेव्हादेखील तुमच्या जगण्यात कृती असतील, कार्य असेल पण त्या कृतीत, अगदी साध्याशा कृतीतदेखील कायापालट झालेला तुम्हाला जाणवेल. तिला निराळाच भाव, निराळाच गंध लाभेल. ती रसपूर्ण असेल, तिची गुणवत्ताच बदललेली असेल. आता ती सहज असेल, अहेतुक असेल, लक्ष्यहीन असेल, तिच्यात आकांक्षा खदखदत नसेल. आता तुम्ही मंदिरात जाऊन निर्जीव मूर्तीपुढे डोकं टेकवलंत तरी त्यात श्रद्धाभिमान, लाचारी, कामसाधूपणा, सौदेबाजी असलं काही, काही नसेल.
याच कारणाने अनेकदा तुमची कवी, चित्रकार, मूर्तीकार, संगीतकार आदी रसिक मंडळी ही तुमच्या कोरड्याठिक्कर महंत व तपस्वींहून जास्त 'धर्ममय' असतात. वीणा वाजवणारा कुणी असा तल्लीन होतो की तारा आपसूक छेडल्या जाऊ लागतात. वाजवणाऱ्याला वाटतं की रस संगीतातून, सुरांमधून पाझरतो आहे. वीणावादकाला वाटेल हा रस वीणेतून आला, वीणेमुळे निर्माण झाला. पण रस पाझरला म्हणजे परमात्म्याशी संबंध आला, त्याला स्पर्श झाला. गोडवा, उत्कटता, ताजेपणा आला. सचैल न्हाऊन निघाल्यागत वाटलं.

करण्याप्रमाणेच शिकण्यानेही अहंकार सुखावतो. 'मला माहित आहे, मी जाणकार आहे' – झालं, अहंकार खुलला! एक लक्षात घ्या, अहंकार म्हणजे बिनबुडाची रिकामी वस्तू. तो सतत कशानेतरी भरावा लागतो - पैसा असो, पद, प्रतिष्ठा असो, यश असो, ज्ञान असो, त्याग असो - सतत काहीतरी ओता, काहीतरी भरा म्हणजे झालं. अहंकार पोकळ असतो, रिता असतो, कितीही भरलात तरी भरून पावत नाही. आणि काहीच भरलं नाही तर तो बुडबुड्यासारखा फुटून जातो. याचमुळे सतत स्वतःत काहीतरी भरून घेण्यासाठी अहंकाराची धडपड चाललेली असते. त्याचे निरंतर प्रयत्न चाललेले असतात: 'लोक माझ्याबद्दल काय बोलतात? वाईटसाईट तर बोलत नाहीत ना? लोक माझं कौतुक करतात ना? लोकांना आवडतो ना मी?' तुम्ही प्रशंसा करा, अहंकार वाट्टेल ते करण्यास राजी होईल. वाट्टेल तो माथेफिरूपणा, मूर्खकृत्य करण्यास मागेपुढे पाहणार नाही.
 
...निरर्थक गोष्टी सोडून द्याव्या लागतील , विसराव्या लागतील, 'unlearn' कराव्या लागतील. फडतूस गोष्टी असतात या, आणि फडतूस गोष्टींवरून तुमच्यात फडतूस मतभेद असतात. अशा कवडीमोल फरकांवरून, मतभेदांवरून धर्मा-धर्मात खंजीर उपसले जातात, एकमेकांवर बंदुका-तलवारी चालवल्या जातात.
 
फेकून द्या हा कचरा. बोलणं सोपं आहे, करणं कठीण. हा आतला कचरा साफ करताना जिवावर येणार, पोटात गोळा येणार. वाटेल की सगळंच केरात गेलं, पुरते नागवले गेलो. आमची विचारसंपदा, आमची परंपरा, आमचे संस्कार, आमचं ज्ञान, आमची संस्कृती - तिचं आता काय होणार!
तुम्ही ठेका घेतला आहे संस्कार वाचवण्याचा, संस्कृती वाचवण्याचा? कारण काय? तुम्ही वाचलात तरी फार झालं. स्वतःचं जीवन अनुभवलंत तरी पुरे झालं. जे सत्य असेल ते तगून राहिल, जे असत्य असेल ते वाहून जाईल. पण सत्य जगेल ते तुमच्या जिवंत अनुभवातून, बुद्धीत वा शास्त्रग्रंथांत साठवलेल्या मृत गोष्टींतून नव्हे.
कचरा टाकून द्या, अस्तित्व नितळ होऊ दे.

- रजनीश (ओशो) 



Comments