पैसा

बहुतांश लोकांना वाटतं की समृद्धी म्हणजे संपत्ती; भरपूर पैसा असणं, त्या पैशाचं प्रदर्शन करणं.
 
पैसा म्हणून जे आपल्याला दिसतं, तो पैसा नव्हे. पैशाची मुळं खूप खोलवर आहेत. पैसा म्हणजे केवळ हातात घेता येणाऱ्या चलनी नोटा नव्हेत. तुमच्या मनाशी, अंतरंगांशी, तुमच्या वृत्तींशी त्याचा अनिवार्य संबंध आहे. पैसा म्हणजे तुम्हाला वस्तूंबद्दल वाटणारी ओढ, हव्यास; पैसा म्हणजे तुमचं माणसांपासून दूर जाणं; पैसा म्हणजे मृत्यूपासून वाचवणाऱ्या सुरक्षिततेचा आभास; पैसा म्हणजे आयुष्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा तुमचा प्रयत्न.... 

पैसा म्हणजे केवळ नाणी-नोटा नव्हेत; तसं असतं तर गोष्टी खूप सोप्या झाल्या असत्या.

पैसा म्हणजे तुमच्यातील प्रेम – मात्र वस्तूंबद्दलचं, जिवंत गोष्टींबद्दलचं नव्हे. वस्तूंवर प्रेम करणं सर्वांत सोयिस्कर. वस्तू निर्जीव असतात. तुम्ही त्या मिळवू शकता, हस्तगत करू शकता. तुम्ही बंगला विकत घेऊ शकता, राजवाडा घेऊ शकता; तुमची ऐपत असल्यास जगातील भव्यतम राजवाड्याचा मालकी हक्क मिळवू शकता, पण तुम्ही इवल्याशा तान्ह्या बाळाची मालकी मिळवू शकत नाही. छोट्टंसं मूलदेखील नकार देऊ शकतं,  आपल्या स्वातंत्र्यासाठी आपल्यापरीने लढू शकतं. एक लहानगं पोर, लहानसं पाखरू - मग ते किती का लहान असेना - मालकी गाजवू इच्छिणाऱ्या माणसासाठी धोकादायक ठरू शकतं: ते बंड करू शकतं!

जे लोक कुणाहीवर प्रेम करू शकत नाहीत, ते पैशावर प्रेम करू लागतात. पैसा म्हणजे वाट्टेल ती गोष्ट आपल्या मुठीत ठेवण्याचं माध्यम. तुमच्याजवळ पैसा जितका अधिक, तितक्या भरमसाट वस्तू तुम्ही विकत घेऊ शकता, तितकंच अधिकाधिक तुम्ही माणसांना विसरून जाऊ शकता. पैसा बंड वगैरे करणार नाही, पण तो प्रतिसादही देणार नाही. तीच तर अडचण आहे. म्हणूनच कंजूष माणसं अत्यंत बेढब होऊन जातात. त्यांच्या प्रेमाला कधी कुणाचा प्रतिसादच मिळत नाही. तुमच्यावर फुलांप्रमाणे प्रेमाचा वर्षाव झाला नाही, तर तुम्ही कसले सुंदर? तुम्ही कुरूपच होऊन जाणार. जे लोक वस्तूंवर प्रेम करतात, ते वस्तूंसारखेच होत जातात - निर्जीव, बंद. त्यांच्यात कशाहीमुळे कंपनं निर्माण होत नाहीत, त्यांच्यातलं काहीही नाचत नाही, गात नाही. ते एक यांत्रिक आयुष्य जगतात. फरफटत रहातात, ओझं घेऊन वावरतात.
 
...ज्या लोकांना प्रेमाची भीती वाटते, त्यांच्यात आपल्या संपत्तीबद्दल, मालमत्तेबद्दल स्वामित्वाची अतितीव्र भावना असते. प्रेम करणाऱ्यांमध्ये मालकी हक्काची भावना नसते, पैसाअडक्याला त्यांच्यालेखी फारसं महत्त्व नसतं - असला तर ठीक आहे, वापरता येईल. नसला तरी ठीक.

प्रेमाचं राज्य हे कुठल्याच चलनात विकत घेता येत नाही. प्रेम म्हणजे अलोट समाधान. तुम्ही भिकारी असलात तरी तुमच्या हृदयात प्रेम असेल तर तुम्ही मजेत गाऊ शकता. तुम्ही कुणावर प्रेम केलं असेल वा कुणी तुमच्यावर प्रेम केलं असेल, तर प्रेम तुम्हाला मुकुट चढवतं, राजा बनवतं. 

माझा पैशाला विरोध नाही. ‘जा, सगळा पैसाअडका फेकून द्या’, असं मी म्हणत नाही. ते दुसरं टोक आहे. हीदेखील कोत्या मनानेच केलेली अखेरची कृती असते. जो पैशाला चिकटून राहिला, ज्याने कुणाचवर प्रेम केलं नाही, कुणालाही आपल्याजवळ फिरकू दिलं नाही त्याला अखेरीस वैफल्य इतकं जाचतं की तो धनदौलत फेकून देतो, विरक्तीचा आव आणतो, संन्यास घेतो. याही माणसाला काsही समजलेलं नसतं. 
 
- रजनीश (ओशो)




Comments