भावना: उथळ आणि खोल
प्रश्न: मी आतून कधी शांत नसतोच. कसलासा अनाकलनीय राग आजही माझ्या आत आहे.
ओशो: राग दडपून ठेवू नकोस. आत जे काही आहे ते बाहेर येऊ पहातंय, त्याला बाहेर येऊ दे. खरोखर शांत व्हायचं असल्यास एवढा एकच मार्ग आहे.
ज्वालामुखी सुप्त दिसतो तेव्हा सारंकाही निश्चल वाटतं पण कित्येकदा आतमध्ये उद्रेकाची तयारी सुरू असते. थोडा क्रोध बाहेर पडतो, थोडा आत शिल्लक उरतो.
ओशो: राग दडपून ठेवू नकोस. आत जे काही आहे ते बाहेर येऊ पहातंय, त्याला बाहेर येऊ दे. खरोखर शांत व्हायचं असल्यास एवढा एकच मार्ग आहे.
ज्वालामुखी सुप्त दिसतो तेव्हा सारंकाही निश्चल वाटतं पण कित्येकदा आतमध्ये उद्रेकाची तयारी सुरू असते. थोडा क्रोध बाहेर पडतो, थोडा आत शिल्लक उरतो.
क्रोधाचा काही भाग कळण्याजोगा असतो - तो परिस्थितीशी, लोकांशी निगडित असतो. क्रोधाची कारणं स्पष्ट असतात. पण क्रोधाचा हा वरवरचा स्तर बाहेर फेकला जातो अन् कधी अकस्मात तुमचा सामना क्रोधाच्या स्रोताशी होतो. तुम्ही बावचळता. या क्रोधाचा बाह्य जगाशी संबंध नसतो. हा राग तुमचाच अंश असतो. कोणत्याही कारणाविना अस्तित्वात असलेला हा क्रोध, हा संताप समजावून घेणं फार कठीण असतं, कारण त्याकरता कोणीच जबाबदार नसतं. हा राग तुमच्या आत असतो.
व्यक्तीला प्रथम जगासंबंधित क्रोध बाहेर फेकावा लागेल आणि मग ती क्रोधाच्या खोलातल्या, असंबद्ध स्रोताशी पोहोचू शकेल. हा राग घेऊनच आपण जन्मलेले असतो परंतु त्याकडे आपण बघितलेलं नसतं. खरंतर त्याला जाणून घेण्याचीदेखील गरज नाही. त्याला केवळ बाहेर टाका, मात्र कुणावर काढू नका.
आता असला क्रोध कसा टाकावा, कुठे फेकावा, त्याचा वर्षाव कुणावर करावा - आपल्याला काहीच कल्पना नसते. तो इतरांवर काढला, तर आपल्याला अपराधी वाटेल कारण तशात इतरांवर अन्याय होतो. हीच तर या गहन रागाची गंमत आहे. हा आतला क्रोध आपल्याला अतिशय अस्वस्थ करून सोडतो.
प्रत्येक भावनेला अशा दोन बाजू असतात. तिचा वरवरचा स्तर आपल्या नातेसंबंधामध्ये काही भूमिका बजावत असतो आणि तिची अजाणती बाजू केवळ आपल्यापाशी उरते. प्रेमाचा बाह्य भागसुद्धा कुणाशीतरी संबंधित असतो. पण एखादवेळी अनपेक्षितरित्या तुम्ही खोलवर जाता, आणि इतर कुणाशीही, कशाशीही संबंध नसलेला प्रेमाचा स्रोत तुम्हाला आढळतो. या मौल्यवान आंतरिक खजिन्याचं भान नसलेले लोक सदैव उथळ राहतात.
रागाचं, कोणत्याही भावनेचं विश्लेषण करू नका. ही आधुनिक मनाची वाईट खोड आहे: आपण सारंकाही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, पण आयुष्य तर एक रहस्य आहे. ते जगता येईल, जाणून घेता येणार नाही. जाणून घेण्याचा आग्रह धराल तर उथळच राहाल. बुद्धी केवळ एका मर्यादेपर्यंत जाऊ शकते, त्याहून अधिक खोलवर जाऊ शकत नाही. 'खोली' (depth) हा बुद्धीचा आयामच नाही; बुद्धीचा आयाम आहे ‘रूंदी’ (width, range). बुद्धिमत्तेद्वारे तपशील (details) जाणून घेता येतील, पण ती सत्याच्या (truth) गाभ्यात शिरू शकणार नाही. तेव्हा जाणणं-बिणणं राहू दे बाजूला.
राग असतो ही जाणीव पुरेशी आहे, आणि तो बाहेर पडला पाहिजे, कारण तो तुमच्या आत राहिल्यास तुम्हाला शांत, स्वस्थ वाटणार नाही. तुम्ही तो कारणाखेरीज बाहेर काढला नाहीत, अथवा अन्य कोणावर फेकलात तर सबंध दुखणं आणखी गुंतागुंतीचं होऊन बसेल.
- रजनीश (ओशो)
Comments
Post a Comment