लोक जर अगदी खरंखुरं, नैसर्गिक वागू लागले तर...
माणूस निसर्गत:च भावोत्कट आहे. सर्व सर्व भावनांबाबत तो उत्कट आहे. कोणीतरी विचारलं: ‘लोक जर पूर्णतः खरंखुरं, नैसर्गिक वागू लागले, स्मित करण्याचा शिष्टाचार बनावट म्हणून त्यांनी त्याला सपशेल फाटा दिला, ते रस्त्यांवरून किंचाळत, आरडाओरडा करत फिरू लागले, तर काय होईल!?’
हम्म. असं झालं तर बऱ्याच गोष्टी घडतील. पहिलं म्हणजे युद्धं होणारच नाहीत. जगात कुठेही एखादं व्हिएतनाम, इस्राईल बेचिराख होणार नाही. लोक खरं वागायला लागले तर कुणालातरी मारावं, हजारोंची कत्तल करावी इतका प्रचंड राग त्यांच्या मनात साचणारच नाही. लोक नैसर्गिक प्रवृत्तींनुसार वागू लागले तर जगात पुष्कळ फरक पडलेला दिसेल. तुम्हाला वाटतं तेवढा गोंगाट काही ते करणार नाहीत. त्यांना ओरडण्याची मोकळीक असेल, पण ओरडून ओरडून किती ओरडणार, किती काळ? जर माणसाला पूर्ण स्वातंत्र्य असेल तर आरडाओरडा, भांडणं, शिवीगाळ, निषेध इत्यादी गोष्टी जगातून नाहीशा होऊ लागतील.
हे खरं तर दुष्टचक्र आहे. म्हणजे हे असं आहे की तुम्ही एका माणसाला उपाशी ठेवलंय आणि तुम्ही त्याला अन्नाच्या, फडताळाच्या, फ्रिजच्या आसपास फिरकू देत नाही. त्याला खाण्याची मुभा दिली तर म्हणे तो खूप खाईल. तुम्ही त्याला उपाशी ठेवू लागलात, आणि आता तुम्हाला भीती वाटतेय की खाण्याचं स्वातंत्र्य मिळालं तर तो अति खाईल, आजारी पडेल. म्हणून तुम्ही त्याला स्वयंपाकघराजवळही जाऊ देत नाही. तुम्ही फेकलेल्या तुकड्यांवर त्यानं मुकाट निर्वाह करावा. अशा परिस्थितीत माणूस कल्पना विणू लागतो, दिवास्वप्नं बघू लागतो: 'काय बरं करावं? या स्वयंपाकघरात कसं शिरावं, फडताळापर्यंत, फ्रिजपर्यंत कसं पोहोचावं? काय नि कसं खावं?' त्याचं सगळं जग खाण्याभोवती फिरू लागतं.
हेच घडत राहिलंय. शतकानुशतकं तुम्हाला दडपून टाकलं गेलंय, तुम्हाला ठाकून ठोकून, काटछाट करून अधिकाधिक कृत्रिम बनवण्यात आलंय. ...
माणसाला चमत्कारिक आजार जडलेला असतो : त्याला लोकांवर नियंत्रण मिळवायचं असतं, सत्ता गाजवायची असते. इतरांवर हुकूम गाजवल्याने त्याचा अहंकार सुखावतो. 'मी कोणी तरी विशेष आहे' असं त्याला वाटू लागतं - आणि दुसरीकडे त्यालाही कुणाच्यातरी, कशाच्यातरी नियंत्रणाखाली रहावंसं वाटतं. कारण तो कुणाच्यातरी कह्यात असेल, कुणाच्यातरी सल्ल्यानुसार जगत असेल तर खुद्द त्याच्यावर कसलीच जबाबदारी पडत नाही. या सगळ्याने खेळकरपणा मरतो, लोकांना स्वत:च्याच उत्स्फूर्ततेने, मिश्किलपणाने दचकायला होतं.
..तर 'नियंत्रणहीन', बेबंद होण्याची भीती वाटते. प्रश्न विचारणाऱ्याचं बरोबर आहे. आता जर लोक नैसर्गिक वृत्तींनुसार वागू लागले, तर किंचाळू लागतील, विविध चाळे करू लागतील, नेेहेमी ज्या कराव्याशा वाटत होत्या पण करायची मोकळीक नव्हती अशा साऱ्या गोष्टी करू लागतील. जग वेडं होऊन जाईल.
हो, सुरुवातीची काही वर्षं, काही दशकं जग वेडं होईल. पण हा वेडेपणा उपचारात्मक ठरेल, त्याची आपल्याला खूप मदत होईल.
कदाचित त्यानंतर कुणालाच वेड लागणार नाही. न्यूरॉसिस नाहीसा होईल, सायकॉसिस नाहीसा होईल, युद्धं नाहीशी होतील, राजकारणाला काही अर्थ उरणार नाही. राष्ट्राच्या सीमा, सुरक्षायंत्रणा, लष्कर वगैरेंना काही संदर्भ, काही प्रयोजनच उरणार नाही.
म्हणून तर राजकारण्यांना, धर्मधारण्यांना, हरतऱ्हेच्या वर्चस्ववाद्यांना जनतेला दडपून ठेवण्यात एवढा रस असतो. त्यांचं अस्तित्वच दडपशाहीवर अवलंबून असतं. युद्धं नाहीशी झालेली लष्करप्रमुखांना आवडणार नाही, लष्करातल्या अन्य लोकांनाही आवडणार नाही. व्हिएतनामसारखं काही नसेल तर त्यांच्या आयुष्याचं प्रयोजनच हरपल्यासारखं होईल. 'राष्ट्र' ही संकल्पनाच मोडीत निघाली तर पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष असले काय-नसले काय, त्याला काही महत्त्वच उरत नाही.
लोक नैसर्गिक पद्धतीने जगू लागल्यावर सरकारी यंत्रणांची कमीतकमी गरज भासेल. अर्थातच यात असंख्य लोकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यांना वाटणारी भीती योग्यच आहे, शतकानुशतकं त्यांनी लोकांना दाबलं आहे, त्यात काही गडबड झाल्यास स्फोट होईल याची त्यांना धास्ती वाटतेय.
खरंय, पहिली काही वर्षं, साधारण पिढीभराचा कालखंड खूप मोठाले स्फोट होतील. मग या गोष्टी हळूहळू विरून जातील.
आपण अधिक नैसर्गिकरित्या, सहजरित्या जगलं पाहिजे. मग भयगंड, काळज्या, नैराश्य सारंकाही कमी होत जाईल. स्फोटक कालखंड सरला की सारं स्थिरस्थावर होईल. हा धोका आपण पत्करला पाहिजे. मानवता वाचवण्यासाठी हा धोका पत्करणं एवढा एकच मार्ग शिल्लक आहे.
अन्यथा, प्रत्येक जण वेडा होत चालला आहेच.
- रजनीश (ओशो)
Comments
Post a Comment