वैवाहिक जीवन सुखमय होत नाही, होऊ शकत नाही कारण..

 वैवाहिक जीवन सुखमय होत नाही, होऊ शकत नाही कारण आजवर आपण माणसाला प्रेम करण्याची संपूर्ण मुभा दिलीच नाही. जिथे प्रेम बहरेल अशी व्यवस्था आपण निर्माण करू शकलो नाही. विवाहसंबंध प्रेमातून उद्भवला तरच सुखदायी ठरतो. आपला उफराटा उद्योग आहे - विवाहातून प्रेम उद्भवेल अशी आपली अपेक्षा असते. तसं घडत नाही. आपण मात्र आपलं घोडं दामटतो आहोत, आजही तेच घडवून आणण्याचा खटाटोप करतो आहोत. विवाहामधून निव्वळ सोय उद्भवू शकते, व्यवस्था उद्भवू शकते, सुरक्षितता उद्भवू शकते, प्रेम नव्हे. 

पृथ्वीवर प्रेमाचं भरतं यायला हवं, आणि प्रेम म्हणजे मोठी क्रांती असते. मी त्या क्रांतीसाठी जगाला आवाहित करतो आहे. मी विवाहाविरुद्ध नाही. प्रेमातून विवाह निष्पन्न होईल अथवा होणार नाही याला काडीचं महत्त्व नाही. प्रेमातून जे काही निष्पन्न होईल ते शुभ असेल, मंगलच असेल. प्रेमात असणं, प्रेममय होणं म्हणजे थेट खळाळत्या प्रवाहात उडी – अस्थिरतेत जगणं, केवळ चालू क्षणात असणं, एकाकी असण्याच्या आंतरिक सत्याला खुशाल आलिंगन देणं. परंतु आपण सुरक्षालोलुप असतो. प्रेम ही नसती भानगड वाटते आपल्याला, त्या भानगडीत कोण पडतो! विवाहसंबंधातून मिळणारी हरतऱ्हेची सुरक्षितता, आरामदायकता आपल्याला हवी असते. त्या चौकटीला, त्या बंधनाला आपण शरण जातो. 

...जी संतती प्रेमातून पैदा झाली तिलाच औरस मानावं. उर्वरित सगळी पैदास अनौरसच म्हणायला हवी. मुलं वैवाहिक संबंधांतून झाली असली म्हणून काय झालं? त्यांच्या उत्पत्तीत प्रेमाचा अभाव असेल तर – तुमचं तुमच्या पत्नीवर प्रेम नाही, तिचं तुमच्यावर प्रेम नाही. फक्त एका छताखाली रहाता, सवयीने एका बिछान्यात झोपता, नाईलाजाने एकमेकांसोबत दिवस काढता, आणि असे दिवस काढता काढता मुलं पैदा होतात. प्रपंच-पसारा वाढत जातो. मग त्यांचं संगोपन करा, त्यांना शिक्षण द्या.. तुम्ही खोल, खोल रुतत जाता. 

आता तर या गर्दीचं काय करावं, लोकसंख्येचा लोंढा कसा थोपवावा ही समस्या आपल्यापुढे आ वासून उभी आहे. आकाशातून बरसत असल्याप्रमाणे माणसांची रीघ लागतेय, सर्वत्र गर्दी दाटतेय. कोणी कोणावर अणूबॉम्ब, हायड्रोडजन बॉम्ब फेकण्याची गरजच उरणार नाही. आपल्या लोकसंख्येचा विस्फोटच आपल्याला उध्वस्त करेल. आपण कितीही प्रगती साधली, साधनसामग्री निर्माण केली तरी ते व्यर्थ आहे, कारण त्याहून चौपट वेगाने आपण माणसं पैदा करतो. मग समस्या सुटणार तरी कशा?

माणसाने मृत्यूशी युद्ध आरंभलं आहे. तो मृत्यूला टक्कर देतो आहे, दूर करतो आहे. आपण विविध व्याधींवर मात केली, महारोगांचा निपटारा केला, जवळजवळ प्रत्येक माणसाला आरोग्य लाभेल, जन्मलेली बहुतांश बालकं जिवंत रहातील याची खबरदारी घेऊ लागलो. पण मृत्यूशी झुंज दिल्यास जन्माशीही झुंजावं लागेल हे आपण पुरतं विसरलो. ही एकांगी लढाई किती महागात पडते आहे याचं आपल्याला भान नाही. आपण मृत्यूचं दार घट्ट लावून घेऊ पहातो, जन्माचा दरवाजा सताड उघडा ठेवू पहातो. परंतु अशाने नैसर्गिक संतुलन ढासळतं. जितके जीव व्यवस्थित पोसले जाऊ शकतात तितक्यांनाच जगवायचं ही निसर्गाची साधीसोपी व्यवस्था असते.

तुम्ही पाल पाहिली असेल. पाल हा कीटक पृथ्वीवरील अतिप्राचीन पशूचा वंशज आहे. हत्तीहूनही पाच-दहापटीने मोठ्या आकाराच्या, अवाढव्य पाली एकेकाळी पृथ्वीवर अस्तित्वात होत्या. हे प्राणी लोप पावण्यामागचं मुख्य कारण म्हणजे पोसता येणार नाही इतकी प्रचंड पैदास त्यांनी केली.

 माझी व्यक्तिगत समजबुद्धी म्हणते, की संततिनियमन अनिवार्य केलं जावं. शिक्षण अनिवार्य केलं जाऊ शकतं, तर मग... मुळात शिक्षण अनिवार्य करण्याची तितकीशी आवश्यकता नसते. 

अविवाहित व्यक्तीला विवाहित व्यक्तीहून जास्त कर भरावा लागतो अशी आज परिस्थिती आहे. मुलंबाळं असतील तर करात आणखी सूट. काय उफराटा कारभार आहे! लोकसंख्येला आवर घालायचा असल्यास अविवाहित व्यक्तीला करातून सूट मिळायला हवी. विवाहित व्यक्तीवर कर लादला जावा आणि मुलंबाळं झाल्यास करात वाढ केली जावी.

- रजनीश (ओशो)


Comments