गुलाब कमळ होण्याकरता धडपडत नाही

 ‘Be yourself’, ‘जे आहात, जसे आहात तसे रहा' - यथार्थाने समजावून घेतल्यास हे पाच-सहा शब्द मानवजातीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुरे आहेत,  या शब्दांत गहन अर्थ भरून राहिला आहे. मानवाचा समस्त भूतकाळ 'आपण जे नाही' ते होण्यासाठी अखंड धडपडण्यात व्यतीत झाला आहे.  आपल्याला सतत त्याकरता उद्युक्त केलं गेलंय. ‘ख्रिस्त व्हा, बुद्ध व्हा’. दुसरा ख्रिस्त झाला नाही, दुसरा बुद्ध झाला नाही, होणारही नाही कारण तो निसर्गधर्मच नाही.

इतिहासाची पुनरावृत्ती होते, अस्तित्वाची पुनरावृत्ती कदापि होत नाही. अस्तित्व म्हणजे सृजनाचा आविष्कार. सृजनाची पुनरावृत्ती होऊ शकत नाही. सृजनशील व्यक्ती नेहमी अज्ञाताच्या दिशेने पावलं टाकतात. ....ख्रिस्ताला जाणून घेणं, लाओ त्झूला समजून घेणं, बुद्धावर प्रेम करणं खूप सुंदर आहे. मात्र त्यांसारखं होण्याचा प्रयत्न करणं हे निरर्थक, केविलवाणं आहे. शतकानुशतकं माणसाच्या मनाची घडण दुसऱ्यांचं अनुकरण करण्यास अनुकूल करण्यात आली आहे. तुम्हाला स्वतःजोगतं राहू न देण्यात पुष्कळांचे हितसंबंध, भयं गुंतलेली असतात. तुम्ही खरोखर जसे आहात, तुम्हाला खरोखर जे वाटतं तसे वागलात तर काय होईल याची त्यांना भीती वाटते – खुद्द तुम्हालाही ती वाटतेच ना!

माणूस अजाणतेपणी प्रस्थापित व्यवस्थेचीच री ओढतो, कारण ती त्याला परिचित असते, ज्ञात असते. ख्रिस्त, बुद्ध वा कृष्ण अपरिचित वाटतो, निराळ्याच विश्वातून आल्यासारखा वाटतो. तो तुमच्याच भाषेत निराळा भाव व्यक्त करतो, नवा संदेश देतो. जनतेला अज्ञातात शिरण्याची भीती वाटते. ते भूतकाळाला घट्ट चिकटून राहतात. मृतवस्तूंची पूजा करतात, जिवंत गोष्टींचा विध्वंस करतात. ही मूर्ख जीवनसरणी अबाधित राखण्यासाठी आपल्यापुढे आदर्श ठेवले जातात, आपली इतरांशी तुलना केली जाते.

पण आदर्श अनुसरण्याच्या प्रयत्नात, अन्य कुणासारखं होण्याच्या प्रयत्नात तुमच्या आयुष्याचा बट्ट्याबोळ होतो. कारण तुम्ही ‘अन्य कुणीतरी’ होऊच शकत नाही, ते असंभव आहे. तुम्ही केवळ ‘तुम्ही’च असू शकता. दुसऱ्यासारखं होण्याच्या धडपडीत तुम्ही स्वत:पासून दूर जाता; तुमची ऊर्जा वाया जाते. तुम्ही स्वतःशीच लढत रहाता. तुमची शकलं होऊन जातात. आयुष्य मनस्ताप, ताणतणाव, विषादाने भरून जातं.

आईवडील, शिक्षक, समाज, धर्म तुमच्या कानीकपाळी सांगतात: ‘बुद्ध व्हा, कृष्ण व्हा, ख्रिस्त व्हा, अमुक व्हा, तमुक व्हा.’ हे मानसशास्त्रीय खच्चीकरण आहे. अशाने तुमच्यात स्वतःविषयी कमीपणाची भावना निर्माण होते. जेव्हा ‘तुम्ही स्वत:’ असता तेव्हाच तुम्ही आनंदी होऊ शकता. हे ध्यानात घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण, ख्रिस्ताप्रमाणं दयार्द्र होणं कुणाला आवडणार नाही! भारून टाकणारीच कल्पना आहे ती. बुद्धाप्रमाणं शांतिरूप होणं कुणाला आवडणार नाही! अत्यंत लोभस कल्पना आहेत या, पण अनुकरणाने तुम्ही दुबळे होता, दांभिक होता, दु:खी होता.

ऊन-वाऱ्यात डोलणारे, पाकळी पाकळीने गळून जाणारे गुलाब, झेंडू सुंदर आहेत,  ते कमळ होण्याची व्यर्थ धडपड करत नाहीत. कमळ, सारीच फुलं, सारी झाडंखोडं सुंदर असतात ती याच कारणानं. ती स्व-रूप असतात. गुलाबानं कमळ व्हायचा प्रयत्न केला तर त्या प्रयत्नात त्याची सगळी ऊर्जा संपून जाईल, आणि तो फिरून गुलाबदेखील होऊ शकणार नाही.

....तेव्हा सच्चेपणानं, सहजस्वभावानुसार वागा. तसं वागल्याने मोजावी लागणारी किंमत त्याक्षणी कदाचित मोठी वाटेल; पण ती कधीच तितकीशी मोठी नसते!
कोणी म्हणेल, यातून काय निष्पन्न होणार आहे कुणास ठावूक. नसेना का ठावूक! या गोष्टी कोणाला ठावूक असतात बरं? तुम्हाला प्रत्येक गोष्ट अगोदरच का कळावी? जर आधीपासूनच ठावूक झालं तर ते कमअस्सल, बनावट असेल. निसर्गनियमाप्रमाणे जे काही होतं ते कुणालाच आधीपासून, नेमकं ठावूक नसतं.

- रजनीश (ओशो)

 


Comments